Holi 2024 :  Dainik Gomantak
ब्लॉग

Holi 2024 : होळी निसर्गाचा आनंदोत्सव

Holi 2024 : म्हणूनच आपल्याकडे भान हरवणारे सहा ऋतूंचे सहा सोहळे आहेत. यातलाच वसंत ऋतूतील निसर्गविस्मयाची आनंदवार्ता देणारा सोहळा म्हणजे ’होळी’.

गोमन्तक डिजिटल टीम

प्रसन्न शिवराम बर्वे

Holi 2024 : 

आपण निसर्गपूजक संस्कृतीचे पाईक आहोत. निसर्गचक्राशी सुसंगत अशी आपली संस्कृती आहे.

मानवाचे शारीरिक, मानसिक व जीवन चक्र, निसर्गाशी समन्वय साधतच चालणे अभिप्रेत आहे. ऋतूंप्रमाणे निसर्गात व माणसाच्या जीवनात होणारे बदल यांच्याशी समन्वय साधत त्यांना साजरे करण्याला आपण ’सण’ अशी संज्ञा दिली. म्हणूनच आपल्याकडे भान हरवणारे सहा ऋतूंचे सहा सोहळे आहेत. यातलाच वसंत ऋतूतील निसर्गविस्मयाची आनंदवार्ता देणारा सोहळा म्हणजे ’होळी’.

भारतात जिथे जिथे वसंत येत जातो तिथे तिथे त्याच्या आगमनाने वातावरणात होणाऱ्या बदलांबद्दल कृतज्ञता व आनंद वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत जातो. आपल्या गोव्यात व महाराष्ट्रात होळी, धुळवड, रंगपंचमी आणि शिमगोत्सव असतो.

उत्तर प्रदेशात लठमार होली, पंजाबात होला मोहल्ला, उत्तराखंडातील खडी होली, पश्चिम बंगालमध्ये वसंतोत्सव, मणिपूरमध्ये याओसांग, केरळात मंजल कुली, बिहारात फागुआ, आसाममध्ये फालकुआ आणि राजस्थानसह इतरत्रही होळी हा सण साजरा केला जातो. यात लक्षांत घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भौगोलिक परिस्थितीप्रमाणे जरी सण साजरा करण्याच्या पद्धतीत बदल असला, तरी ऋतूशी व निसर्गाशी असलेला संबंध सर्वत्र समान आहे.

होळीचे खूप प्राचीन असणेही तितकेच विस्मयचकित करणारे आहे. उदाहरण द्यायचे तर आपण रंगपंचमीला बादलीत रंगांचे पाणी भरून ते प्लास्टिकच्या पिचकार्‍यांनी एकमेकांना भिजवतो. शिंगांतून रंगीत पाणी उडवण्यासोबतच अशाच प्रकारचे वीस खेळ वात्स्यायनाने सांगितले आहेत.

’होलाका’, ’हुताशनी’, ’पटवालविलासिनी’ अशी अनेक नावे कालौघात पडत गेली आहेत. गोवा व संपूर्ण कोकण प्रांत पाहिल्यास थोड्या फार फरकाने होळी साजरी करण्याची पद्धत सारखीच आहे. ग्रामदैवत, होळी पेटवणे, बोंबा मारणे, धुळवड, पालखी आणि पंचमीला रंग खेळणे हे प्रकार कमी जास्त प्रमाणात साजरे होतात.

अनेक प्रकारचे खेळ देशभर खेळले जातात. काही ठिकाणी होळीत पेटता नारळ बाहेरही काढला जातो. पायात चप्पल न घालता दूर उभे राहून अर्धवट पेटलेली लाकडे एकमेकांवर फेकण्याचा खेळ काही ठिकाणी मानकरी खेळतात.

मानसावर संस्कृतीचा, निसर्गाचा पडलेला प्रभाव व त्यातून झालेले परिणाम, दुष्परिणाम यांची अभिव्यक्ती सणाच्या निमित्ताने होते. मनातील किल्मिष, राग घालवल्यानंतर येणारा रंगोत्सव येण्यामागेही हेच कारण असावे. एकमेकांच्याप्रति असलेला राग जावा, सर्वांनी एकत्रित येऊन कार्य करावे, ही त्यामागची भावना आहे. निसर्गाचे जतन, संवर्धन करताना आपण त्यातील केवळ एक घटक आहोत याचे भान पदोपदी जपले जाते.

संपूर्ण भारतभर होळीचा सण साजरा होत असल्याचे अनेक प्राचीन व ऐतिहासिक दाखले आहेत. विजयनगरच्या साम्राज्यामध्ये हम्पी येथे होळी खेळली जात असल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत. आताही तिथे त्याच भग्नावशेषांच्या साक्षीने होळीचा सण साजरा होतो. आक्रमण करून वास्तूरूपात असलेल्या सांस्कृतिक खुणा पुसणे हा जसा एक प्रकार असतो, तसाच संस्कृतीच्या अभिमानाच्या जागांना कलुषित करणे हा दुसरा प्रकारही केला जातो. गंमत म्हणजे आक्रमण करून भौगोलिक दृश्य गोष्टी नष्ट करणारे आक्रमक जेवढे नुकसान करत नाहीत, त्याहीपेक्षा जास्त मोठे नुकसान, संस्कृतीसोबत विकृतीला जोडत संस्कृतीत वाढलेले त्याच संस्कृतीचे पाईक करत असतात. त्यासाठी सर्वमान्य होतील अशा पर्यावरण, पाणी, निसर्ग, प्राणी, विज्ञान या सर्वांचा ढाल म्हणून वापर होतो.

होळी किंवा आपल्या संस्कृतीतला कुठलाही सण आला की, सल्ले देण्याची एक प्रथा पडून गेली आहे. होळीचा सण आला की, ’पर्यावरणपूरक होळी साजरी करा’, असे सल्ले दिले जातात. हे म्हणजे मुळातच सुंदर असलेल्या मुलीला ’सुंदर कसे व्हावे’, याचे सल्ले, उपदेश देण्यासारखे झाले.

त्यानंतर पुढच्या होळीपर्यंत हे पर्यावरणप्रेमी ’उपदेशपांडे’ कुठे गायब होतात कोण जाणे? म्हादईचे पाणी वळवले जाणे, डोंगरकापणी, सागरी अतिक्रमण वगैरेंवर बोलण्याच्या वेळेस अशांचा आवाज येईनासा होतो. पर्यावरणप्रेम, निसर्गप्रेम, प्राणीप्रेम, पाणीप्रेम या सगळ्या प्रेमांचे भरते फक्त निसर्गपूजक संस्कृतीतील सणांच्यावेळीच येते.

निसर्गाचे रक्षण आपल्या लोकसंस्कृतीतून करणार्‍यांना सल्ले, माहिती देणे बंद करा. ईदच्या व ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना आपण स्वच्छ, निर्भेळ देतो; प्राणी वा झाडे वाचवण्याचा सल्ला त्या शुभेच्छांना जोडून देत नाही. अगदी तेच धोरण निसर्गपूजक संस्कृतीतील सणांच्या शुभेच्छा देताना वापरले पाहिजे.

दरवर्षी काही तरी नवीनच माहिती बाहेर येते. इतकी वर्षे रंगांमुळे प्रदूषण व पाण्याची नासाडी करण्यासाठी ओळखला जाणारा होळी हा सण, गेल्यावर्षी ’बायका जाळण्याचा सण’ झाल्याचे पाहून हसू आवरेना. यावर्षी होळीबद्दल कुठली नवीन माहिती बाहेर येते, याची वाट पाहतो. अगदी शुभेच्छा देतानाही त्या निर्भेळ दिल्या जात नाहीत. त्यातही सल्ला असतोच. यामागील हेतू समजून घेणे गरजेचे आहे.

यांना पर्यावरणाची, प्रदूषणाची चिंता अजिबात नसते असे नव्हे. पण, त्याचा विनियोग निसर्गपूजक संस्कृतीला हीन ठरवण्यासाठी होतोय, याचे भान त्यांना राहत नाही. एकाच पानात पंचपक्वान्न व मलमूत्र वाढले तर आपल्याला किळस पंचपक्वान्नांची येते. संस्कृतीला विकृती जोडल्याने संस्कृतीविषयी तिटकारा निर्माण होतो; विकृतीविषयी नाही, हे सूत्र अतिशय नियोजनबद्ध रीतीने राबवले गेले आहे.

संस्कृतीला वेगळे मांडा आणि विकृतीचा समाचार वेगळा घ्या. दोघांना एकत्र ठेवू नका. सातत्याने हे एकत्र ठेवून विविध माध्यमांतून बिंबवल्यामुळे आपण निसर्ग जतनाचे आपले कर्तव्यच विसरत चाललो आहोत. विकृतीला नियंत्रणात आणण्यासाठी संस्कृती अत्यावश्यक आहे. निसर्गाची हानी रोखायची असेल तर निसर्गपूजक संस्कृतीतील सणांना आदरपूर्वक आणि अभिमानाने व्यक्त करणेही गरजेचे आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: कामत, तवडकर बिनखात्याचेच; पाच दिवस उलटले, खाते वाटपास आणखी विलंब शक्य‍

Court Verdict: 4.52 कोटींच्या वीज घोटाळा प्रकरणी माविन गुदिन्हो दोषमुक्‍त, पर्रीकरांनी केले होते आरोप; तब्‍बल 27 वर्षानंतर निकाल

Rashi Bhavishya 26 August 2025: मनातील गोंधळ कमी होईल, महत्त्वाच्या कामांना गती मिळेल; वाचा तुमच्या राशीचं भविष्य

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

Money Laundering Case: धर्मांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड छंगूर बाबाच्या साम्राज्यावर ईडीचा घाला! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 13 कोटींची मालमत्ता जप्त

SCROLL FOR NEXT