Archimedes Dainik Gomantak
ब्लॉग

Greek culture: ग्रीकांची वैज्ञानिक परंपरा

गोमन्तक डिजिटल टीम

दत्ता दामोदर नायक

मुळात ग्रीक संस्कृती ही नाविकांची संस्कृती होती. मोसमी वाऱ्याच्‍या दिशेने जहाजे हाकण्याची कला आणि शास्त्र त्यांना अवगत होते. ‘नेव्ही’ हा शब्द नाव (नौका) ह्या संस्कृत शब्दापासून निर्माण झाला असे मानतात.

पण द्वारकेला राजधानी करणारे कृष्ण, बलराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि तामिळनाडूचे चोल राजघराणे, ओडिसाचा कलिंग राजवंश सोडल्यास नाविक दलाचे महत्त्व लक्षात घेऊन आपले नौदल सांभाळणारे राजे दिसत नाहीत. एकोणिसाव्या शतकातील भारताच्या पारतंत्र्याला नौदलाकडे भारतीय राज्यकर्त्यांनी केलेले दुर्लक्ष हे महत्त्वाचे कारण आहे.

ग्रीक साहित्यात सूड, संशय, क्रौर्य, हिंसा, मृत्यूचे तांडव, नियती शरणता आणि नियती शरणता न मानणारा प्रयत्नवाद, शृंगार आणि व्यभिचार, साहस आणि भीती, दैवीप्रकोप आणि देवतांची कृपा, चमत्कार, गूढ, रहस्य अशा मानवी जीवनाच्या व्यामिश्र आयामांचे प्रतिबिंब पडते.

एस्कलस (५२३-४५६ बीसी), सॉफिक्लस (४९६-४०६ बीसी) आणि युरिपिडस (४८६-४०६ बीसी) ही शोकान्त नाटके (ट्रॅजेडी) लिहिणारे प्रख्यात नाटककारत्रय आहेत. एस्कलसने द पर्शिअन्स, सेव्हन अगेन्स्ट थेबेस, अ‍ॅगमॅनॉन, प्रॉमिथेन्स फाउंड, लिबॅटिन बेअरर्स ही नाटके लिहिली. अ‍ॅन्टिगॉन, ऑडिपस, इलेक्ट्रा ही सॉफिक्लसची प्रसिद्ध नाटके आहेत.

युरिपिडसने मेडन, ह्यूक्यूब, हेलेन, द चिल्ड्रन ऑफ हर्क्यूलस व द ट्रोजन वूमन ही नाटके लिहिली. शहरातील तारांकित हॉटेलमध्ये आपण राहतो तेव्हा आपल्याला नाव नसते. चेहरा नसतो. आपल्याला केवळ संख्येने ओळखले जाते.

उदाहरणार्थ १६१८- म्हणजे सोळाव्या मजल्या वरील १६१८ क्रमांकाची खोली एवढेच. या उलट खेड्यातल्या एखाद्या बुटिक हॉटेलमध्ये किंवा होम-स्टे देणाऱ्या घरात आपण राहतो तेव्हा आपल्याला स्थानिक संस्कृतीची जवळून ओळख होते.

मांजर हा ग्रीकांचा आवडता प्राणी असावा. इथल्या घराघरांत मांजरे असतात. भारतात रस्त्यावर भटके कुत्रे दिसावेत तशी सार्वजनिक जाग्यावर भटकी मांजरे आरामात पहुडलेली असतात. मानव आणि पाळलेले मांजर यांचे नाते १२००० वर्षांएवढे पुरातन आहे.

ग्रीक नागरिक मांजराला पवित्र प्राणी मानतात. रस्त्यावरच्या भटक्या मांजरांना ते ‘भटकी मांजरे’ अशा शेलक्या शब्दांनी संबोधत नाहीत. ग्रीसमध्ये भटकी मांजरे ‘कम्युनिटी कॅट्स’ असतात.

व्हिक्टर आणि सोफिया दोन्ही विज्ञानाची पदवीधर होती. रात्रीच्या जेवणानंतर काळोख्या रात्री लखलखत्या ताऱ्यांनी खचित आभाळाकडे पाहत आम्ही ग्रीकाच्या वैज्ञानिक परंपरेविषयी चर्चा केली. कोणत्याही शाळकरी विद्यार्थ्याने पायथागोरस, युक्लीड, आर्केमेडिस या ग्रीक गणितज्ञाची नावे ऐकली नाहीत, असे संभवणार नाही.

काटकोन त्रिकोणाच्या कर्णाचा वर्ग हा त्रिकोणाच्या अन्य दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेएवढा असतो, हा सिद्धांत जगभर पायथागोरस थियरी म्हणून ओळखला जातो.

पायथागोरसचा काळ (५७६ - ४९० बीसी) इ. स. पूर्व सहाव्या शतकातला. पायथागोरस पूर्वीही हा सिद्धांत भारतीय गणितज्ञांना माहीत होता, असे अभ्यासकांना वाटते.

शास्त्रीय संशोधनात एकच शोध एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या संशोधकांना लागतो. कॅलक्युलसचा शोध १७व्या शतकात इंग्लंडमधल्या आयझेक न्यूटनने, तर जर्मनीमधल्या लेबनीजने एकाच वेळी लावला.

उत्क्रांतीचा सिद्धांत इंग्लंडमध्ये संशोधन करणाऱ्या चार्लस डार्विनने १९व्या शतकात ज्यावेळी लावला, त्याच वेळी आल्फ्रेड रसेल वॅटसन हा वेल्स (इंग्लंड) मधला शास्त्रज्ञही त्याच निष्कर्षाकडे पोहोचला होता.

ग्रीक गणितज्ञ युक्लीडचा ‘एलेमेन्ट्स’ हा ग्रंथ हे गणितातले महाकाव्य मानले जाते. सपाट द्विमितीय पृष्ठभागावरील भूमितीचे बहुतेक सर्व सिद्धांत युक्लीडने मांडले. बिंदू, सरळ रेषा, समांतर रेषा, एकमेकांना छेदणाऱ्या रेषा, त्रिकोण, चौकोन, आयत, त्रिज्या, व्यास, परीघ, वर्तुळ, स्पर्शिका अशा अनेक भूमितीय संकल्पनांचा युक्लीडने अत्यंत तर्कशास्त्रपूर्ण अभ्यास केला.

त्यामुळे गणित म्हणजे आकडे, अक्षरे, आकृत्या आणि चिन्हे ह्यांतून व्यक्त होणारे तर्कशास्त्र ही संकल्पना पुढे आली. युक्लीडचा काळ इ. स. पूर्व तिसऱ्या शतकाचा म्हणजे प्लुटोनंतरचा आणि आर्किमेडिसच्या आधीचा.

पण, इलेमेंट ह्या युक्लीडच्या ग्रंथाचे पहिले भाषांतर प्रकाशित व्हायला सोळावे शतक उजाडावे लागले. युक्लीडची भूमिती सपाट म्हणजे शून्य वक्रता असलेल्या पृष्ठभागावरची होती. पृथ्वीच्या पृष्ठभागासारख्या वक्र पृष्ठभागासाठी पुढे नॉन युक्लीडीयन भूमिती शोधावी लागली.

आर्किमेडिस हा लिओनार्दो दी विन्सीप्रमाणे अष्टपैलू, अनेक विषयांत रस असलेला सर्जनशील ग्रीक शास्त्रज्ञ होता. आर्किमेडिसने तरफेचे (लिव्हर) वेगवेगळे उपयोग शोधून काढले. आपणास अंतराळात उभे राहण्यास जागा द्या आणि हवी तेवढी लांब तरफ द्या, मी पृथ्वी उचलून दाखवतो असे आर्किमेडिस म्हणायचा.

तरफेवर आणि आरशातील प्रकाशाच्या परावर्तनावर आधारित शस्त्रे आर्किमेडिसने राजाला बनवून दिली. महाकाय आरसे उन्हात उभे करून तो अशा रितीने फिरवायचा की शत्रूच्या जहाजावर प्रकाशकिरण केंद्रीभूत होऊन जहाजांना आगही लागायची.

पण, आर्किमेडिस म्हटला की आपल्याला ‘युरेका युरेका’ (सापडले, सापडले, उत्तर सापडले) असे म्हणत टबमध्ये आंघोळ करता करता अचानक उठून नग्न अवस्थेत राजाकडे धावणारा आर्किमेडिस आठवतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT