काही आठवड्यांपूर्वी सोशल मीडियावर पणजीतील एका सत्संग कार्यक्रमाची पोस्ट ‘व्हायरल’ झाली. ती ज्या वेगाने व्हायरल झाली त्याच वेगाने ती पोस्ट ‘ट्रोल’देखील झाली. म्हणजे त्यावर बरीच टीकात्मक किंवा उलटसुलट चर्चादेखील झाली.
पणजी मिरामार इथे एका समाजाने भल्या सकाळी सत्संगचा कार्यक्रम आयोजित केला होता. पण यात ‘ट्रोल’ होण्यासारखे काय होते? सत्संगचा कार्यक्रम भल्या सकाळी होता त्यामुळे साहजिकच आयोजकांनी सत्संगला पणजीबाहेरून येणाऱ्या लोकांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली होती.
आता गोवा-पणजी म्हटल्यावर इथल्या सवयीप्रमाणे आयोजकांनी ‘सत्संगानंतर भाजीपावचा नाश्ता दिला जाईल’ असे त्या आमंत्रणात जाहीर केले होते. गोव्यातील लोकांनी सोडून सोशल मीडियावरील बाकीच्या अनेकांनी यावर यथेच्छ विनोदनिर्मिती करून मनोरंजन करून घेतले.
जसे एरवी ‘पुणेरी पाटी’ म्हणून अनेकदा काहीही पुणेकरांच्या नावाने खपवले जाते तसेच हे प्रकरण विनोदी अंगाने कुठेही गेले होते.
कोणी त्यावर हास्याचे फवारे उडवणाऱ्या ‘ईमोजी’ टाकल्या, तर कोणी ‘भाजी जरा बघून घ्या... नाहीतर त्यातही मासळी असणार’, असे उगाच नेहमीच्या पठडीतले बोलून गेले. आणखी एकाने ‘तरी बरं भाजीपाव ठेवले आहे.
नाहीतर ‘मासळी आणि भात द्यायचे’ अशीही टिप्पणी केली होती. सत्संगाची पत्रिका बघून आणि भाजीपाव नाश्ता आहे हे वाचून मला अजिबात काही गैर वाटले नाही. गोव्यात नाश्ता म्हटले की ‘भाजीपाव’ हाच पदार्थ अधिकृतपणे डोळ्यांसमोर येतो.
गोवेकरांचा नाश्ता त्याच्याशिवाय अपूर्ण आहे. इथे कोणताही कार्यक्रम असू दे. तिथे भाजीपाव असणार. गोव्यात नाश्ता म्हणून भाजीपाव देणार नाहीत तर काय इडली वडा -सांबर थोडाच मिळणार आहे.
उद्या चेन्नईला जाऊन नाश्त्याला ‘आलू पराठा’ दिला तर काय होईल? तिथे इडली वाडा नाहीतर उपमाच मिळणार. तसेच हे आहे. इथे नाश्त्याला भाजीपावच मिळणार आणि ही ‘पावभाजी’ (मुंबई स्टाइल) नाही तर ही अस्सल गोव्याच्या पद्धतीची ‘भाजीपाव’ असते.
कारण यात टीका करणाऱ्यांनी कधी गोव्यात येऊन भाजीपाव खाल्ला नसणार. यातील अनेकांना तर ‘पावभाजी’च देणार आहेत असे वाटले. पावभाजी आणि भाजीपाव यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
अगदी नुकतेच आमच्या ऑफिसमध्ये गणपतीच्या काळात रोज कोणी न कोणी, काहीनाकाही शाकाहारी पदार्थ घेऊन येत होते. त्यात काहीजण प्रसाद म्हणून गोड पदार्थ घेऊन यायचे तर काहीजण तिखट पदार्थ आणायचे.
यात कोणीतरी सर्वांसाठी भाजीपाव आणला. सर्वांनी मोठ्या आवडीने खाल्ला. सांगायचा मुद्दा काय? तर भाजीपावाला गोव्यात समाजमान्य दर्जा आहे आणि हे मला प्रादेशिक वेगळेपण वाटते.
जे वारंवार गोव्यात येऊन गेले असतील, ज्यांना गोवा नीट समजला असेल, त्यांना गोवेकर आणि भाजीपाव यांच्यामधला ऋणानुबंधाचे नाते समजू शकेल.
एक काळ असा होता की त्यावेळी ‘पाव’ खाणं म्हणजे ‘बाटल्या’सारखं म्हणजेच धर्म परिवर्तन झाल्यासारखं समजले जायचं.
पण आता या गोष्टीला देखील साडेचारशे वर्ष होऊन गेली आहेत. या मधल्या काळात पाव इथल्या प्रत्येक समाजातल्या घराघराने स्वीकारला असून तो रोजच्या जेवणाचा एक भाग बनला आहे.
सर्वमान्य गोमंतकीय नाश्ता
सर्वसामान्यपणे गोव्यातल्या घरात सकाळी नाश्त्याला पोळे (मऊ डोसा), भाजी, ‘तोणाक’ (प्रॉन्स घातलेलं) किंवा चपाती- भाजी बनवतात. पण सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जिथे संख्या मोठी असते अशा ठिकाणी भाजीपाव दिला जातो.
उपमा - पोहे - शिरा असले पदार्थ तर घरीदेखील फारसे बनवले जात नाहीत. पोहे तर फक्त दिवाळीच्या काळात बनवतात. गोव्याबद्दल जसे अनेक गैरसमज आहेत तसेच इथल्या जीवनशैली, खाद्यपदार्थांबाबतदेखील आहेत असे या सत्संग आणि नाश्तावाल्या पोस्टवरून जाणवले.
गोव्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा. गावातल्या छोट्याशा टपरीपासून ते व्यवस्थित चांगल्या रेस्टोरंटपर्यंत ‘भाजीपाव’ मिळतो. भाज्यादेखील वेगवेगळ्या प्रकारच्या आणि पावदेखील विविध प्रकारचे.
अळसांद्यांची भाजी (एक प्रकारचे कडधान्य जे फक्त गोव्यात मिळते), सलाड भाजी (टोमॅटो आणि कांदा असलेली), वाटण्याची भाजी, ‘बियां’ भाजी (ओल्या काजूची), आकूर भाजी, गड्ड्याची (नवलकोन) भाजी, बटाटा सुकी भाजी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि त्यासोबत ‘तोर्राद (कुरकुरीत) उंडे’ (पावाचा प्रकार), पोळी (हा देखील पावाचा प्रकार) किंवा पाव आणि गरम गरम मिरची भजी हवीच.
‘तोर्राद उंडे’ ही तर गोव्याचीच खासियत. भाजीपाव देणारी बहुसंख्य रेस्टोरंट ‘शाकाहारी’च आहेत. खूप कमी ठिकाणी प्रॉन्स घालून केलेले तोंडीलावणे, भाजी मिळते. जसजसे ग्रामीण भागात जाल तशी यातील भाजीची वेगळी चव मिळेल.
पण इथे तुम्हाला भाजीपाव सोडून तुम्हाला दुसरे काही मिळणार नाही. मग तुमच्या लक्षात येईल की ‘भाजीपाव’ हा समस्त गोमंतकीयांचा आवडता नाश्ता का आहे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.