Petisco Restaurant- Pranav Dhuri  Dainik Gomantak
ब्लॉग

Restaurant: चवदार व देखणे फ्युजन फूडचे ठिकाण ‘पेतिस्को'

गोमन्तक डिजिटल टीम

मनस्विनी प्रभुणे-नायक

Restaurant गेल्या वर्षी ‘तनिष्का  व्यासपीठ’च्या  एका कार्यक्रमासाठी हॉलच्या शोधात होते. कला अकादमी  बंद असल्यापासून पणजीत कार्यक्रम करणं अवघड झालंय. पणजी चर्चच्या जवळ असलेल्या ‘वास्को द गामा क्लब’मध्ये एक हॉल असल्याचं समजलं आणि आमचा मोर्चा तिकडे वळला. हा क्लब दुसऱ्या मजल्यावर आहे; पण तिथं जाण्याआधी माझी नजर खिळून राहिली ती त्याच इमारतीमध्ये खाली मुख्य रस्त्यावर असलेल्या  ‘पेतिस्को’ या अनोख्या रेस्टोरंटवर.

हे काहीतरी वेगळं आहे हे मनानं हेरलं. त्यावेळी मनात फक्त नोंद करून ठेवली. येऊया कधीतरी असं म्हणून ज्या कामासाठी आले होते ते पहिलं केलं.  मधल्या काळात आमच्या दोन्ही मुलींकडून आसावरी आणि अदितीकडून  ‘पेतिस्को’चं कौतुक ऐकलं;  पण नंतर मी  ‘पेतिस्को’ला पुरती विसरून गेले.

कधी काळी पणजी चर्च जवळचा भाग रोजचा येण्या-जाण्याचा भाग होता. आता त्या भागात जाणं होत नाही. यावेळी मुद्दाम वाकडी वाट करून त्या भागात  ‘पेतिस्को’मध्ये गेले. एवढा वेळ  ‘पेतिस्को’चं नाव घेतेय, त्यामुळे हा  ‘पेतिस्को’ प्रकार काय आहे? याची तुम्हालाही उत्सुकता वाटली असेल ना!

तर  ‘पेतिस्को’ हे अतिशय दर्जेदार ‘फ्यूजन फूड’ देणारं रेस्टोरंट आहे. तुम्हाला कदाचित ‘वास्को द गामा’ क्लब पणजीत कुठे आहे हे माहीत नसेल; पण पणजी चर्चजवळ असणारं सर्वांत जुनं  ‘तातो’ हे रेस्टोरंट नक्कीच माहीत असणार. तर या ‘तातो’च्या शेजारीच  ‘पेतिस्को’ रेस्टोरंट असून या दोन्ही रेस्टोरंटचा एकमेकांशी अतिशय जवळचा संबंधदेखील आहे.

‘तातो’ चालवणाऱ्या धुरी कुटुंबातील युवा पिढीच्या म्हणजेच प्रणव धुरी याच्या कल्पनेतून आणि कष्टातून  ‘पेतिस्को’ आकाराला आलं. इथं पाय ठेवताना अजिबात कल्पना नव्हती की हे कुणी ‘गोंयकार’ चालवत असेल. ‘तातो आणि धुरी’ हे नाव ऐकताच  ‘पेतिस्को’देखील  एकदम आपलंस वाटून गेलं. 

‘तातो’ नावाचं मोठं वलय असताना प्रणवला हे वेगळं रेस्टोरंट का सुरू करावंसं वाटलं असेल, असा प्रश्न मनात होताच. पण, धुरी परिवारातील पुढची पिढीदेखील याच व्यवसायात आहे हे बघून छान वाटलं. नुसती ती या व्यवसायात नाही तर आपलं वेगळं अस्तित्व तयार करण्यासाठी भरपूर कष्ट घेत आहे.

आम्ही  ‘पेतिस्को’मध्ये गेलो तेव्हा प्रणव तिथंच होता, तो पूर्ण वेळ तिथंच असतो. अतिशय आपुलकीनं येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करत असतो. आमच्या टेबलपाशी येताच त्याला आम्ही मुद्दाम गप्पा मारायला बसवलं. ‘मला पहिल्यापासून अशा प्रकारचं रेस्टोरंट  सुरू करण्याची इच्छा होती’.

प्रणव त्याचा या क्षेत्रातला  प्रवास सांगत होता. प्रणवने याच विषयात  उच्च शिक्षण पूर्ण केलं आहे. स्‍वीत्‍झर्लंड आणि अमेरिकेतील वेगवेगळ्या रेस्टोरन्टमध्ये काम करून तिथला अनुभवदेखील त्याच्या पाठीशी आहे.

‘खवय्या मंडळींना मला काहीतरी वेगळ्या चवीचं द्यायचं होतं. त्यात मला स्वतःला काही वेगळे प्रयोग करायचे होते. तेच ते पारंपरिक पदार्थ नको होते. मग यासाठी ‘तातो’पेक्षा काहीतरी वेगळंच असलं पाहिजे असं वाटलं आणि म्हणून  ‘पेतिस्को’ची निर्मिती झाली’, हे प्रणव आत्मविश्वासानं सांगत होता.

‘फ्युजन फूड’ची मजा 

‘पेतिस्को’ हे फ्युजन फूडसाठी प्रसिद्ध असून इथल्या पदार्थांत वापरण्यात येणारे सगळे घटक गोमंतकीय आहेत हे त्याचं विशेषपण! घटक - जिन्नस तेच, पण मसाले आणि शिजवण्याची पद्धत मात्र वेगळी. घरी  आपण एरवी छान रवा फ्राय मोडसो खातो. त्याच मोडसोचं  अतिशय आकर्षक आणि चविष्ट रूप तुम्हाला इथं ‘हॉट फिश’ या डिशमध्ये खायला मिळेल.

मेनू लिस्टमधील पदार्थांची आगळी वेगळी नावं  वाचून पटकन कळत नाही; पण प्रणव आणि त्याचा स्टाफ आपल्या मदतीला आहेच. ते व्यवस्थित मार्गदर्शन करतात. तुम्ही फिश - चिकन - मटण खाणारे असलात किंवा अगदी शाकाहारी असलात तरी काय खावं आणि त्यांच्याकडे त्यात उत्तम असं काय मिळतं ते सुचवतात.

त्यानंतर तुमच्यासमोर जे येतं ते खावं की त्याकडे डोळे भरून बघावं, असा प्रश्न पडतो. पदार्थ कसा उत्तमरीत्या सादर करावा याचं उदाहरण आपल्यासमोर असतं. खाणं  महत्वाचं असतंच;  पण ते ‘परोसण्याची’ (पदार्थ वाढण्याची) पद्धतदेखील तेवढीच महत्त्वाची असते. खाणाऱ्याला त्यातून समाधान मिळालं पाहिजे हे त्याचं तत्त्व.

आम्ही सुरुवातीला ‘हॉट फिश’ ऑर्डर केला. मोडसो एवढ्या आकर्षक रूपात आणि वेगळ्याच चवीमध्ये येऊ शकतो याची कल्पना नव्हती. कुरकुरीत मोडसो आणि त्यासोबत आंबट-गोड सॉस अतिशय वेगळी संगती होती. हा सॉस रेडिमेड सॉस-केचप नव्हता. इथल्या प्रत्येक पदार्थासोबत एक स्वतंत्र सॉस असतो, जो त्या-त्या पदार्थासोबत बनवला जातो. ही थोडीशी युरोपियन शैली.

कुठलाही पदार्थ हा कोरडा मिळणार नाही. वेगवेगळ्या चवीचे-रंगाचे सॉस त्याची चव वाढवतात. इथं हे सॉसदेखील स्थायिक जिन्नस वापरून तयार करतात. उदाहरणार्थ बिमला, कोकम, लिंबू, चिंच, पुदिना इ. मोडसो खाण्यात अशी वेगळी मजा असू शकते हे त्या दिवशी समजलं. आम्ही आपले नेहमी मोडसो रवा फ्राय खाणाऱ्यातले.

समोर आलेला ‘हॉट’ मोडसो बघून तोंडाला पाणी सुटलं.  लिंबाच्या रसात मुरवलेल्या  आणि  अतिशय पातळ कापलेल्या तोंडलीच्या चकत्या त्या सॉसमध्ये घातलेल्या होत्या. आंबट-गोड चवीसोबत गोल गोल तोंडल्याच्या चकत्या अप्रतिम लागल्या.

एरवी तोंडलं म्हणताच नाक मुरडलं जातं; पण इथं मात्र मोठ्या चवीनं खाल्लं गेलं. इथं अशाच एका सॉसमध्ये बिमलाच्या चकत्या वापरल्या जातात. सध्या बिमला उपलब्ध नाहीत, त्यामुळे तोंडल्याच्या चकत्या वापरल्या. त्यादेखील आम्ही आवडीनं खाल्ल्या. 

प्रॉन ला प्लांका आणि रोस्ट चिकन 

‘पेतिस्को’मधली ‘सिग्नेचर डिश’ कोणती असं विचारताच प्रणवने  प्रॉन ला प्लांका आणि रोस्ट चिकन या डिश अवश्य खाऊन बघा म्हणून सुचवलं.  आंबट-गोड सॉसच्या पार्श्वभूमीवर ऑलिव्ह ऑईल-चिली प्लेक्स आणि लसूण यामध्ये शिजवलेले प्रॉन्स, त्यासोबत  बटर लावलेली पोळी (गोवन पाव) खाण्याचा अनुभव खास होता.

‘प्रॉन ला प्लांका’ नावातच या डिशचं वेगळेपण सामावलेलं आहे. ऑलिव्ह ऑईल आणि लसूण-बटरची चव त्या प्रॉन्समध्ये उतरली होती. प्रॉन्सचा  तोंड आणि शेपटीकडचा  भाग जशाचा तसा ठेवल्यामुळे  ‘प्रॉन ला प्लांका’ ही डिश अधिक चविष्ट लागली. प्रॉन्सचं हुमण करताना आम्ही बरेचदा त्याचा शेपटीकडच्या भागासहित प्रॉन्स वापरतो.

त्यामुळे त्याची चव अधिक चांगली लागते.  इथं रोस्टेड चिकन देखील असेच आगळ्यावेगळ्या पद्धतीनं  बनवलेलं  होतं. चिकन लेग पीससोबत ग्रीन सलाड आणि सोबत बखलावा (गोड नसलेला) सारखा असंख्य कुरकुरीत पापुद्रे असलेला ब्रेडचा पीस असं काहीतरी एकदम हटके रोस्ट चिकनमध्ये बनवलं होतं.

कोकम, हनी आणि चिलीमध्ये चिकन आधी मॅरीनेट करून मग ते शिजवलं असल्यामुळे त्या चिकन लेग पीसला आंबट-गोड-तिखट अशी तिहेरी चव आली होती. शिवाय ते अतिशय व्यवस्थितपणे रोस्ट केलेलं होतं. सर्व मसाले चिकनमध्ये अगदी शेवटपर्यंत मिसळले होते. चिकन खाणाऱ्यांना नेहमी मसालेदार चिकन खाण्यापेक्षा हे वेगळ्याच चवीचं चिकन नक्कीच आवडेल. 

‘पेतिस्को’मध्ये येण्यापूर्वी या जागेबद्दल मनात असणारं  मत इथं आल्यावर आणि प्रणवशी गप्पा मारल्यावर पूर्णपणे बदलून जातं. अर्थातच हे मत आधी अजिबात नकारात्मक नव्हतं; पण ‘फ्युजन फूड’ म्हणलं की समोर येणारा पदार्थ नेमका कसा असेल याबाबत साशंकता असते. तशी साशंकता इथं अजिबातच राहिली नाही.

काही विशेष पदार्थांचा आपल्यावर इतका पगडा असतो की त्या पदार्थांबाबत आपण तडजोड स्वीकारत नाही.  ‘पेतिस्को’मध्ये खाणं म्हणजे आपल्या चवीशी तडजोड करणं असं अजिबात होत नाही. गोमंतकीय खाद्य संस्कृतीमधील घटक वापरून एक नवीन चव आपल्याला देण्याची कल्पकता इथं अनुभवायला मिळते. 

इथल्या प्रत्येक पदार्थावर लिहिण्यासारखं आहे. आपला समृद्ध वारसा पुढे चालवण्याचं काम करणाऱ्या पिढीचं कौतुक नक्कीच व्हायला हवं आणि यासाठी तरी मुद्दाम  ‘पेतिस्को’मध्ये जायला हवं.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

SCROLL FOR NEXT