मुकेश थळी
आमच्या गोव्यात पुस्तकांचं गांव व्हायला हवं. ते पेडण्यात व्हावं, सत्तरीत व्हावं की काणकोणात की धारबांदोड्याला ते शासन ठरवेल. पण सुविधायुक्त असं पुस्तक ग्राम उभारलं तर ते गोव्याचं आणखीन एक भूषण ठरेल.
राष्ट्रीय पुस्तक सप्ताहा निमित्त देशभरात आणि गोव्यातही पुस्तकांचं महत्त्व अधोरेखित करणारे जागृती कार्यक्रम झाले. हल्ली पुस्तकं विकत घ्यायला बूक स्टॉलमध्ये जाणं सक्तीचं नसतं. पुस्तकांची विक्री ऑनलाईन स्तरावर सुरू झाल्यापासून खप विक्रमी प्रमाणात वाढत आहे.
कारण कुठलंही पुस्तक उपलब्ध आहे की नाही हे आपण अगोदर इंटरनेटवर तपासून ते ऑनलाईन ऑर्डर करू शकतो. पैसे भरण्याची प्रक्रियाही झटक्यात सेकंदांत डिजिटल प्रणालीद्वारे होते. पुस्तक घरपोच मिळतं.
आज आपण मोठ्या प्रमाणात पुस्तके पीडीएफ रचनेत इंटरनेटवर मोफत वाचू शकतो. किंडल प्रणाली आहे. इ बूक्स आहेत. हे साम्राज्य विस्तारतच आहे. ऑडियो बूक्स मधुर संगीत व दमदार निवेदनासहित येत आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून पुस्तकं आम्हाला खुणावत आहेत. फक्त वाचनाची भूक पाहिजे.
कितीही भिन्न माध्यमं आली तरी ग्रंथालयांचं महत्व कायम राहणार. तरीही काही दुर्मिळ जुनी पुस्तकं पाहिजे असल्यास फूटपाथवरील जुन्या पुस्तक विक्रेत्यांकडे जावं लागेल. अशा जागा कोल्हापूर, पुणे, मुंबई, दिल्ली व देशातील इतर मेट्रो शहरात आहेत. तिथं अत्यंत मौल्यवान दागिन्यासारखं पुस्तक अगदी अल्प किमतीत मिळतं.
काही वाचकांच्या मताप्रमाणे त्याचं मूल्यच ठरवता येत नाही. अशा अनेक पुस्तक ठिकाणातून मी सहसा कुठंही न मिळणारी इंग्रजी व इतर भाषेतील अमूल्य दुर्मिळ पुस्तकं आणली आहेत. पुस्तकं चाळताना उभं राहून माझे पाय दुखायला लागले तेव्हा पुण्यात एक विक्रेता पुस्तकांची दाट थप्पी होती त्याच्यावर बस म्हणून विनंती करू लागला. नाही मी बसलो. तो मात्र एका पुस्तक ढिगावर बसला होता. पुस्तकांचे ढीग तिथं पडले होते. गर्मीही खूप होती.
जगभरात फूटपाथवर वा चौकावर अशी पुस्तके विकण्याची केंद्रं आहेत. काही हरहुन्नरी लोक असा व्यवसाय अजून करत आहेत. हल्लीच एक बातमी वाचली. ७२ वर्षीय महम्मद अझीझ, मोरोक्कोच्या रबत शहरात जुनी पुस्तकं विकतात. ज्या देशात २६% लोकसंख्या अजूनही वाचू शकत नाही अशा देशात पुस्तके विकणे, हे त्याचे साहित्यावरील प्रेम आहे.
६ वर्षांचा अनाथ असताना अझीझचे जीवन कठीण होते; त्याला हायस्कूलही पूर्ण करता आले नाही कारण पाठ्यपुस्तके त्याच्यासाठी खूप महाग होती. १९६३ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी त्यानं पुस्तक विक्रेता म्हणून ९ पुस्तके घेऊन झाडाखाली फक्त गालिचा टाकून आपल्या या व्यवसायाची कारकीर्द सुरू केली.
आता त्याच्या पुस्तकांच्या दुकानात हजारो पुस्तके विकली जातात. पुस्तकांमध्ये किड्यासारखा अडकून आणि त्यातील कथा वाचण्यात व त्यात रमण्यात तो दिवस घालवतो. तो दिवसातील ६ ते ८ तास वाचनासाठी घालवतो बाकी वेळ खाणे, प्रार्थना, आराम यासाठी जातो. उरलेला वेळ तो शेजारच्या परिसरात जाऊन पुस्तकांच्या शोधात फिरतो.
ती पुस्तके तो नंतर तो त्याच्या दुकानात विक्रीसाठी ठेवतो. तो म्हणतो की हा त्याच्या बालपणीचा आणि गरिबीचा बदला आहे: “मी अरबी, फ्रेंच, इंग्रजी किंवा स्पॅनिश भाषेतील ४००० हून अधिक पुस्तके वाचली आहेत, म्हणजे मी ४००० हून अधिक जीवनं जगलो आहे.
प्रत्येकाला ती संधी मिळाली पाहिजे! तो वाचन आनंद मिळाला पाहिजे. पुस्तकांवर प्रेम मात्र हवं. माझा दिवस एन्जॉय करण्यासाठी मला फक्त दोन उशा आणि एक पुस्तक हवे आहे." त्याच ठिकाणी ४३ वर्षांहून अधिक काळ राहिल्यानंतर, तो रबतमधील सर्वात जास्त काळ पुस्तक विक्री करणारा विक्रेता ठरला आहे.
जेव्हा जेव्हा विविध मुलाखतीत त्याला विचारले गेले की पुस्तके बाहेर ठेवल्याने त्याची पुस्तके चोरीला जाऊ शकत नाही काय, तेव्हा त्याने मार्मिक उत्तर दिले की ज्यांना वाचता येत नाही ते पुस्तके चोरत नाहीत आणि ज्यांना शक्य आहे ते चोर नसतात...
अझीझनं फार समर्पक विचार इथं दिला आहे. हा विचार त्याच्या अनुभवातून, व्यासंगातून, चिंतनातून उतरला आहे. वाचनातून अंगात जी संस्कारिता व समृध्दी येते तो वाचक, पुस्तकांचा चोर असूच शकत नाही, हा विचार.
आमच्या देशात काही पुस्तकवेडे, ग्रंथांचं अक्षरधन घेऊन सायकल मारत गावोगावी फिरतात आनी ज्ञान प्रसार करण्यात हातभार लावतात. महाराष्ट्रातील अशाच एका सज्जनाची यशस्वी गाथा बीबीसी टीव्हीने प्रसारीत केली होती.
सायकलवरील फिरती लायब्ररी. कितीतरी विद्यार्थी आणि मुलं ज्ञानासाठी भुकेलेली असतात त्यांच्यासाठी ही आनंदाची, विद्येची गुहा म्हणजे एक पर्वणी ठरते. त्यांचा पाया त्यामुळे सुदृढ होतो. महाराष्ट्राची चार नवी ‘पुस्तकांची गावे’ आहेत - औदुंबर, वेरूळ, नवेगाव बांध, पोंभुर्ले.
वेल्स मधील ‘पुस्तकांचे गाव’ या संकल्पनेच्या धर्तीवर राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी ही योजना अमलात आणली.
भिलार येथे पुस्तकांचे पहिले गांव निर्माण झाले. हा सरकारी उपक्रम ब्रिटनच्या ‘हे ऑन वाय’ या पुस्तकांच्या दुकानांसाठी प्रसिद्ध असलेल्या वेल्श शहरापासून प्रेरित आहे. भिलारमध्ये २५ कलात्मकरित्या सजलेली ठिकाणे आहेत. विविध विषयांवर हजारो पुस्तकं आहेत.
१९ जून २०२१ रोजी केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील पेरुमकुलम या गावाला सरकारनं पुस्तक ग्राम (पुस्तकांचे गाव) म्हणून घोषित केलं.
पुस्तक ग्रामात एक पोषक वातावरण असतं. शिस्तीचं. वाचनाभिमुख माहोल. वाचनाचे संस्कार मुलांवर करायला त्याचा बहुमोल फायदा होतो. चिंतनभान वाढायला पुस्तक ग्रामाचा माहोल फायदेशीर ठरतो. आमच्या गोव्यात सेंट्रल लायब्ररीतर्फे अनेक उपक्रम राबवले जातात.
मोबायल लायब्ररी म्हणजे गावागावात जाणारी फिरती व्हॅन हा असाच एक उपक्रम. गोव्याचं साक्षरता प्रमाण देशात विक्रमी असं आहे. पर्यटन नकाशावर गोवा चमकत आहे. अशा आमच्या गोव्यात पुस्तकांचं गांव व्हायला हवं. ते पेडण्यात व्हावं, सत्तरीत व्हावं की काणकोणात की धारबांदोड्याला ते शासन ठरवेल.
पण सुविधायुक्त असं पुस्तक ग्राम उभारलं तर ते गोव्याचं आणखीन एक भूषण ठरेल. मोरोक्कोचा मॉडेल असो की भिलारच्या ग्रामाचं वा केरळच्या कोल्लमचं उदाहरण असो, सर्वांचा अभ्यास करून एक आदर्श पुस्तक ग्राम गोव्यात व्हावं ही आमची पुस्तकप्रेमींची हार्दिक इच्छा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.