सुशीला सावंत मेंडीस
Goa Freedom Struggle : भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात या राष्ट्रीय कार्यासाठी गोव्याच्या योगदानाचा विचार करणे महत्त्वाचे आहे. अद्याप या पैलूवर कोणताही अभ्यास झालेला नाही आणि भविष्यातील संशोधनासाठी खूप वाव आहे. गोव्याच्या मुक्तीसाठी यातील बहुतांश स्त्री-पुरुषांनी नि:स्वार्थपणे योगदान दिले असले तरी, हा अभ्यास केवळ भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्यांच्या कार्यावर केंद्रित आहे. पोर्तुगिजांची सत्ता असलेल्या गोव्यातून भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी पाठिंबा व योगदान फार पूर्वीपासून आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू गोव्यात दि. ९ फेब्रुवारी १९३७ रोजी आले, ही त्यांची पहिली आणि शेवटची भेट होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कन्नूर येथे एका सभेला संबोधित करण्यासाठी मुंबईहून त्रिवेंद्रमला जात असताना वास्कोजवळील तत्कालीन सडा एअरोड्रोममध्ये त्यांचे विमान अर्धा तास इंधन भरण्यासाठी थांबले होते.
पोर्तुगीज सरकारने लोकांना संबोधित करण्यावर बंदी घातली होती व लोकांनाही नेहरूंना भेटण्यास मनाई केली होती. परंतु, या आदेशांना न जुमानता शेकडो गोमंतकीयांनी त्यांना पाहण्यासाठी एअरोड्रोमवर गर्दी केली होती. ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी नेहरूंना अभिवादन केले होते, त्यांना बडतर्फ करण्यात आले आणि त्यांच्या देशद्रोहाचे आरोपपत्र दाखल करण्यात आले.
जर्नल दा इंडिया, डायरो डो नोइट, ओ अल्ट्रामार, ओ हेराल्डो आणि ओ भारतच्या स्थानिक वर्तमानपत्रांत याचे वार्तांकन झाले. लोकांनी दाखवलेल्या उत्साहाचा धसका पोर्तुगिजांनी इतका घेतला होता की, नेहरू पुन्हा मुंबईला जाताना वास्कोत थांबले तर अशी गर्दी पुन्हा होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली. ११ फेब्रुवारी १९३७ रोजी शेफ डी गॅबिनेट, जोस कार्नेरो डी सौझा फारो यांनी वास्कोतील अधिकाऱ्यांना सावधगिरीचे उपाय करण्याचा इशारा दिला व तशा सूचनाही दिल्या होत्या.
१९२८साली टी. बी. कुन्हा यांनी गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना केली आणि तिला कलकत्ता अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संलग्न केले. लुइस द मिनेझिस ब्रागांझा यांच्यासोबत टी. बी. कुन्हा कलकत्ता अधिवेशनात गेले, जिथे त्यांनी महात्मा गांधींचे भाषण ऐकले. ‘अमृत बाजार पत्रिका’चे संपादक मोतीलाल घोष यांसारख्या राष्ट्रवाद्यांशी संवाद साधला. येथेच मिनेझिस ब्रागांझा यांच्या गोव्याच्या भवितव्याबद्दलच्या दृष्टिकोनात बदल झाला. स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय लढ्यात गोव्याने सामील व्हावे, या विचाराने त्यांना झपाटले.
मिनेझिस ब्रागांझा यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याची बीजे गोव्यात आणून रुजवली. त्यांच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून घरोघरी त्यांचे पोषण केले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सेनानींना गोमंतकीयांच्या हृदयात बसवले. मोतीलाल नेहरू, जी. के. गोखले, लाला लजपत राय आणि जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल लिहून त्यांनी आपल्या वाचकांमध्ये राजकीय चेतनेची ज्योत प्रज्वलित केली.
‘प्रकाश’च्या अंकाचे मुखपृष्ठ पूर्णपणे स्वामी विवेकानंद, डॉ. बी. एस. मुंजे (१९२८ मध्ये गोव्याला गेलेल्या हिंदू महासभेच्या शिष्टमंडळाचे सदस्य) किंवा इतर काही राष्ट्रीय व्यक्तींना त्यांच्या छायाचित्रांसह समर्पित केले जात असे. मिनेझिस ब्रागांझा यांना त्यांच्या गोमंतकीय आणि भारतीय असण्याचा प्रचंड अभिमान होता. त्यांनी महाभारत, कौटिल्य, पतंजली आणि अर्थशास्त्र यांसारख्या विषयांवर अनेकदा लिखाण केले होते.
खूप प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती इतर युरोपीय देशांपेक्षा अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि न्यायशास्त्र यासह इतर अनेक विषयांत किती प्रगत आहे, हे त्यांना त्यातून दाखवून द्यायचे होते. या लेखनामुळे भारताच्या समृद्ध वारशाबद्दल स्वाभिमान आणि आदराची भावना निर्माण झाली.
मुंबईत कुन्हा यांनी गोव्यातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणत, गोवा कृती समिती स्थापन केली. त्यांनी ‘गोवा विमोचन सहाय्यक समिती’(जीव्हीएसएस)ला पाठिंबा दिला, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ज्याच्या सदस्यांनी गोवामुक्तीसाठी १९५४ आणि १९५५ मध्ये सत्याग्रह केला. स्वदेशीचा अवलंब करणे आणि स्वत:वर संयम असणे, हे लेखक आणि कार्यकर्ते म्हणून त्यांच्या कार्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य होते.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी पीटर अल्वारिस यांनी पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडियामधील आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि १९४२ च्या ‘भारत छोडो आंदोलना’त सक्रिय सहभाग घेतला. त्यासाठी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ ते तुरुंगात होते. गोव्याच्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने ‘जीव्हीएसएस’ची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. या समितीने देशाच्या विविध भागांतून सत्याग्रहींना गोव्यात आणण्यासाठी समन्वय साधला. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांच्या ‘जनता आंदोलना’त सहभाग घेतला.
लुईस मेंडिस हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आणि नंतर एनसीजीचे सदस्य होते. त्यांनी ‘भारत छोडो’ आंदोलनात भाग घेतला. गोव्यात त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्याने ते मुंबईत गेले. ते भारतीय सागरी श्रमिक संघाचे संस्थापक सदस्य आणि महासचिव होते, इतकेच नव्हे तर त्यांच्या मासिकाचे संपादकही होते. भारतीय सागरी वाहकांना त्यांच्या युरोपियन समकक्षांपेक्षा कमी पगार दिला जात असे, या अन्यायाला त्यांनी ‘गोवन ट्रिब्यून’मध्ये लेख लिहून वाचा फोडली. ‘गोवा क्लब्स फेडरेशन’चे सरचिटणीस म्हणून ते दिल्लीत नेहरूंना भेटलेल्या गोव्यातील राजकीय शिष्टमंडळाचे सदस्य होते.
रेव्हरंड फादर एच. ओ. मास्कारेन्हस हे कट्टर राष्ट्रवादी आणि स्वातंत्र्य चळवळीचे खंदे समर्थक होते. १९३४साली पंथगुरू म्हणून ते नियुक्त झाले होते. ते संस्कृतचे प्रकांड पंडित होते आणि भगवद्गीता व उपनिषदे यांचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता. त्यांनी मुंबईतील महाविद्यालयांमध्ये कोकणी भाषा मंडळाच्या अनेक शाखा स्थापन केल्या.
विश्वनाथ लवंदे यांनी ‘कोल्हापूर विद्यार्थी संघा’मार्फत ‘भारत छोडो आंदोलना’त भाग घेतला होता. त्यांनी कोल्हापुरात ‘राष्ट्रीय सेवा दला’ची शाखा चालवली आणि त्यानंतर त्यांनी ‘आझाद गोमंतक दला’चे सक्रिय सदस्य म्हणून गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून दिले. श्यामराव लाड हेही
‘भारत छोडो’ आंदोलनात सहभागी होते. गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रह आंदोलनात रत्नागिरीत सत्याग्रह केल्याबद्दल यशवंत बुगडे यांना ब्रिटिशांचा लाठीमार सहन करावा लागला.
दिवाकर काकोडकर १९३५साली भारतीय कम्युनिस्ट पक्षात सामील झाले आणि मुंबईत असताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. ते ‘बॉम्बे स्टुडंट्स’ चळवळीचे सक्रिय सदस्य होते. चंद्रकांत काकोडकर हेही भाकपचे सदस्य होते. भारत छोडो आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती आणि २ वर्षे ते नाशिकच्या तुरुंगात होते.
‘गोवा युथ लीग’चे सचिव म्हणून ते आणि जोकिम डायस यांनी १९४६साली पुण्यात गांधींची भेट घेतली. गोमंतकीयांनी पोर्तुगीजांच्या अधीन राहू नये, असे गांधींनी त्यांना सांगितले आणि गोव्याच्या लढ्यासाठी संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी असेल, अशी ग्वाही दिली. डायस यांनी त्यांच्या विद्यार्थिदशेत भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्यासाठी कॅसलरॉक परिसरात आणि बेळगावमध्ये त्यांना अनेकवेळा अटक करण्यात आली होती.
देशपांड्यांचे संपूर्ण कुटुंबच राष्ट्रकार्यात उतरले होते. सिंधू देशपांडे ‘भारत छोडो’ आंदोलनात सक्रिय सहभागी होत्या. नंतर त्या ‘प्रजा समाजवादी पक्षा’च्या सदस्य होत्या आणि त्यांनी महाराष्ट्रात महिला शाखाही चालवली. दत्तात्रय देशपांडे यांनी १९४२-४५ या काळात ‘भारत छोडो’ आंदोलनात भाग घेतला. सुभाषचंद्र बोस यांनी सुरू केलेल्या ‘फॉरवर्ड ब्लॉक’मध्ये ते सामील झाले आणि त्यासाठी बंगाल, बिहार आणि ओरिसा येथे काम केले. अण्णा देशपांडे हे हैदराबादच्या निजामाविरुद्धच्या लढ्यात आणि ‘भारत छोडो’ आंदोलनात होते.
मूळ गोमंतकीय असलेल्यांना ब्रिटिशांच्या राज्यात निर्वासितांचे आयुष्य जगावे लागत असे. असे जगणे त्यांना अमान्य होते. दुसऱ्या बाजूला ‘जीवीएसएस’चे शेकडो स्वयंसेवक आपल्या जिवाचे रान करून सत्याग्रहात उतरले होते. ब्रिटिश व पोर्तुगीज हे वसाहतवादी राज्यकर्ते वेगवेगळे असले तरी सोसावा लागणारा अन्याय व पारतंत्र्याच्या वेदना समान होत्या. त्यामुळे, गोमंतकीयांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अभूतपूर्व होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.