goa Fish  Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्याचा राज्यमासा : शेवटा

गोवाभर लोकमानसात विशेष प्रिय असणारा हा मासा इथल्या नानाविध जाती जमातीसाठी चवीचा ठरलेला आहे. मासा पाण्याबाहेर जगणार नाही अशी आपली सर्वसाधारणपणे धारणा असते, पण माशांच्या काही जाती पाण्याबाहेर चिखलात खूप काळ जगू शकतात आणि हिंडू शकतात, त्यात शेवट्यांचा समावेश होतो.

गोमन्तक डिजिटल टीम

राजेंद्र पां. केरकर

गोव्यात मत्स्याहार हा इथल्या अन्न संस्कृतींचा महत्त्वाचा घटक आहे. आणि मत्स्याहारी खवय्यांसाठी शीतकडीचा आस्वाद जगण्यातला आनंद अभिव्यक्त करत असतो.

गोड्या पाण्याच्या नद्यांच्या पात्रातले, खारे आणि गोडे पाणी मिसळणाऱ्या खाड्यांतले आणि समुद्रातील पाणी मिसळणाऱ्या खाड्यांतले आणि समुद्रातील मासे असले तरी त्याची चव भिन्न असते. गोव्यात मत्स्याहार इथल्या अस्मितेशी निगडीत आहे.

गोव्यातल्या मत्स्याहारी लोकसमूहात विविध जातीजमातींचा समावेश असून, माशाची आमटी आणि मासे तळून खाण्याच्या प्रकारात वैशिष्ट्यपूर्ण बदल पहायला मिळतो. ताल्ले, पेडवे, बांगडे आदी मासे कशा प्रकारे शिजवायचे भाजायचे आणि खायचे याविषयी जातीजमातीप्रमाणे इथल्या अन्न संस्कृतीत बदल पहायला मिळतो.

श्री विष्णूने घेतलेल्या दहा अवतारांपैकी मत्स्यावतार म्हणजे मासा असून, जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या प्रवासातलाही पहिला मणकेधारी जीव आहे. पृथ्वीतलावर माशाने ५० कोटी इतक्या मोठ्या कालखंडात निरनिराळ्या हवामानाशी निरनिराळ्या परिसंस्थाशी जुळवून घेत प्रवास केल्याने, आज जगभरात माशांच्या सुमारे २५ ते २७ हजार जाती आढळतात. खाऱ्या आणि गोड्या पाण्यात जे मासे आढळतात.

त्यांची श्‍वसनसंस्था भिन्न असते गोव्यात गोड्या पाण्याचे नदीनाले, खारे आणि गोड पाण्याच्या संयोगाने समृद्ध असणाऱ्या खाड्या आणि प्रत्यक्ष समुद्रात आढळणाऱ्या माशांच्या प्रजातीत विपुल भिन्नता पहायला मिळते. गोवा सरकारने ३१ डिसेंबर २०१५ रोजी रितसर अधिसूचना प्रसारित करून राज्य मासा म्हणून शेवट्याला सन्मान दिलेला आहे.

गोवाभर लोकमानसात विशेष प्रिय असणारा हा मासा इथल्या नानाविध जाती जमातींसाठी चवीचा ठरलेला आहे. मासा पाण्याबाहेर जगणार नाही अशी आपली सर्वसाधारणपणे धारणा असते, पण माशांच्या काही जाती पाण्याबाहेर चिखलात खूप काळ जगू शकतात आणि हिंडू शकतात, त्यात शेवट्यांचा समावेश होतो.

माशांचे तापमान हवेच्या तापमानाप्रमाणे बदलते. गरम हवेत त्यांचे रक्त गरम तर थंड हवेत थंड होते. गोवा सरकारच्या मस्त्यखात्याने राज्यमासा अधिसूचित करण्यासाठी जे मतदान घेतले होते, त्यात सर्वाधिक मान्यताही शेवट्याला प्राप्त झाली. परंतु असे असले तरी गोव्याच्या लोकसंस्कृतीने शेवट्याला शिमग्याच्या कालखंडात सत्तरीतल्या करवल्यांच्या उत्सवातल्या जती गायनात स्थान दिलेले आहे.

ताल्ली व्हकाल। बांगडो नवरो

शेवटा जालो धेडो ।।

हुंडोन शेवटा दिवटी धरी । कुल्ली वाजाप करी ।।

या लोकगीतातून गोव्यातल्या लोकजीवनात असलेल्या शेवट्या माशाचे स्थान अधोरेखित होते. गोव्यात शेवट्याला राज्यमाशाचे स्थान लाभलेले असले तरी गोव्याच्या बाहेर हा मासा लोकांसाठी विशेष खाद्यान्न ठरलेला आहे.

तामिळनाडूत मडवा, केरळात थिरूथा किंवा कानाम्बू, अंदमानात फारसा, बंगालात पासे आदी नावांनी परिचित आहे.प्राणीशास्त्रानुसार शेवटा मासा ‘मुगील सेफालस’ या नावाने ओळखला जात असून, रूपेरी रंगाच्या शरीर कांतीवरती राखाडी पट्टे असल्याकारणाने इंग्रजीत ‘स्ट्राइप्ड ग्रे मुलेट’ असे नाव देण्यात आलेले आहे.

शेवटा मासा जगभरातल्या नदी, सागराच्या पाण्यात आढळत असून, गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांचा आवडता ठरलेला आहे. मान्सून पर्जन्यवृष्टीच्या काळात गोव्यात जेव्हा मासेमारीला बंदी असते, त्या दोन महिन्यांच्या कालखंडात होड्याद्वारे जाळे टाकून किंवा पाण्यात गळ घालून मासेमारी जेव्हा केली जाते, तेव्हा बाजारात शेवटा मासा प्रामुख्याने विक्रीला येतो आणि त्यामुळे तोंडचे पाणी पळालेल्या कालखंडात शेवट्याची प्राप्ती खवय्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरलेला मासा असतो.

गोव्यात मासेमारीला बंद असलेल्या कालखंडात बरीच मंडळी नदी, खाड्यातल्या पात्रात जेव्हा गळ टाकून बसतात, तेव्हा गळाला पावाचे तुकडे लावतात आणि ते खाण्यासाठी येणारा शेवटा मासा बऱ्याचदा बळी ठरतो.

ज्या मोसमात गोवेकरांच्या ताटात मासे दुरापास्त ठरतात त्यावेळी गळाला लागणारा शेवटा मत्स्याहारी खवय्यांची लज्जत भागवत असतो. त्यामुळे गोव्यातल्या समस्त लोकसमुहातल्या मत्स्याहारींशी त्‍याचे स्थान महत्त्वाचे ठरलेले आहे.

शेवटा मासा आज प्रामुख्याने कोरगुट भाताच्या उकड्या तांदळाच्या शिताबरोबर कडी म्हणजे आमटी बनवून आवडीने खाल्ला जातो. पूर्वीच्या काळी जेव्हा आजच्या सारखी मासे साठवून ठेवण्यासाठी वातानुकूलीत व्यवस्था उपलब्ध नव्हती, तेव्हा सूर्यप्रकाशात सुकवून, आगीची धुरी देऊन, मिठात खारवून त्याचप्रमाणे हवाबंद डब्यात ठेवले जायचे आणि पावसाळ्यात जेव्हा नदीनाल्यांना पूर यायचा, त्यावेळी अशाप्रकारे उपलब्ध होणाऱ्या शेवट्यांचा लाभ घेतला जायचा.

वेरे येथील प्रसिध्द मराठी नाट्यलेखक गोपाळकृष्ण भोबे यांनी ‘मासे आणि मी’ हे पुस्तक लिहून गोव्यातल्या मत्स्यप्रेमाची ख्याती मांडलेली आहे. आपल्या पुस्तकात त्यांनी गोव्यातल्या कोणकोणत्या प्रदेशात कोणकोणते मासे किती प्रमाणात मिळतात याविषयी रोचकपणे माहिती दिलेली आहे.

इतर माशांच्या तुलनेत शेवटात चरबीचे प्रमाण कमी असते, त्यामुळे प्रथिनाची समतोल मात्रा पुरवणाऱ्या आणि ह्रदयरोगावर गुणकारी समजल्या जाणाऱ्या शेवट्या माशाचा समावेश गोव्यातले मत्स्याहारी हमखास करायचे.

जगभरात शेवटा मासा प्रामुख्याने आढळत असला तरी गोव्याचा मत्स्याहारी समाजात या माशाविषयी बऱ्याच श्रध्दा, अंधश्रध्दा प्रचलित असून आज कारवार परिसरात वास्तव्यास असलेले कदम मंडळी ही मूळ गोव्याची असून, पोर्तुगीजांनी जेव्हा सासष्टीतल्या मंदिरांचा विध्वंस

आरंभला तेव्हा कदमांनी आपल्या देवीला गलबतात स्थानापन्न करून जेव्हा कारवारला नेत होते त्यावेळी शेवट्या माशाने देवीच्या पायाखाली उडी घेतली आणि त्यामुळे देवीने शेवट्याला अभय दिल्याची भावना कदमात प्रचलित असल्याने, कदम मंडळीने शेवटा माशाचा आजतागायत त्याग केलेला आहे.

शेवटा जालो धेडो ।।

हुंडोन शेवटा दिवटी धरी । कुल्ली वाजाप करी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: सांगेत बिरसा मुंडा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT