Congress: Sonia gandhi and P Chidambaram
Congress: Sonia gandhi and P Chidambaram Dainik Gomantak
ब्लॉग

Congressच्या अशा मनोवृत्तीला सोनिया गांधीही काही करू शकणार नाहीत

दैनिक गोमन्तक

असंख्य ताणेबाणे असलेल्या पणजी आणि ताळगावच्या राजकारणात या दोघांचे वैयक्तिक राजकीय महत्त्व काय आहे. बाबूश मॉन्सेरात नामक वृक्षावरली बांडगुळे होण्यात समाधान मानण्याची परंपरा त्यागण्याचे त्यांना अचानक का सुचले याचा विचार करण्याची आवश्यकता बेरजेच्या राजकारणाची आस लागलेल्या काँग्रेस (Congress) नेतृत्वाला भासत नाही. केवळ निवडणूक लढण्याची वैयक्तिक क्षमता याच एकमेव निकषावर माणसे जमवण्याचा धोपटमार्ग काँग्रेस पुन्हा चालू लागला आहे, हेच या आणि याआधीच्या आयातीचे मर्म. ही आयात यदाकदाचित निवडणुकीत यशस्वी झालीच तर संधी साधून परपक्षांत उडी घेण्यातही आघाडीवर असेल हेही वेगळे सांगायची आवश्यकता नाही.

अशा प्रकारचा दाहक अनुभव पक्षाने वारंवार घेतलेला आहे, तरीही निष्ठेचा निकष लावण्याची गरज नेत्यांना भासत नाही. यातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते आहे, निवडणुकीत गंभीर लढत देण्यासाठी लागणारी कोणतीही रणनिती काँग्रेसकडे अगदी या क्षणीही नाही! निव्वळ खोगीरभरतीतून आपण सहजगत्या निवडणूक जिंकू शकू, अशा फाजील आत्मविश्वासात रममाण झालेला हा पक्ष प्रत्यक्षात तोंडघशी पडण्याचीच जास्त शक्यता दिसते.

आंगतुकांना पक्षात घेताना त्यांची पत पाहिली जाईल, असे विधान प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी हल्लीच केले होते. चिदंबरम यांनी अप्रत्यक्षपणे गिरीश यांचे आसन बळकट असल्याचे सांगितल्यामुळे चोडणकरांच्या त्या वक्तव्याला पक्षाचेच अधिकृत धोरण म्हणावे काय, असा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मिकी पाशेको ते उदय मडकईकर आणि रामराव देसाई ते टोनी फर्नांडिस ही आयात कोणत्या पतप्रतिष्ठेचा निकष लावून केलेली आहे, हे सांगणे चोडणकरांनाही अवघड जाईल. ज्या ठिकाणी पक्षाकडे आधीच दमदार व सक्षम उमेदवार आहेत अशा ठिकाणी तिकिटाचे नवे दावेदार आयात करण्यामागचे राजकारण अनाकलनीय आहे. कुडचड्यात निलेश काब्राल यांचे एकेकाळचे विश्वासू असलेल्या बाळकृष्ण होडारकरांना काँग्रेसने गळाला लावले आणि मतदारसंघात राजकीय गुंतवणूक करण्यासाठी प्रेरितही केले. आता रामराम देसाईंना दारे उघडी करून त्यांनी होडारकरांची अस्वस्थता वाढवली आहे. देसाई यांना साथ द्यायची तर होडारकरांना आपल्या गुंतवणुकीबरोबरच राजकीय भविष्यावरही पाणी सोडावे लागेल, हे स्पष्ट आहे.

आपल्याला तिकीट नाकारल्याचे कळाल्यावर नाखुष झालेला दावेदार विरोधकांना मिळण्याचीच शक्यता अधिक असते हे काँग्रेसच्या नेत्यांइतके अन्य कुणालाही ज्ञात नसेल. कुडचड्यात काब्राल यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे हे राजकारण आहे, असे वाटतच नाही तर त्यांच्या फेरनिवडीचा मार्गच प्रशस्त झाल्याची चिन्हे दिसताहेत. पणजी- ताळगावात बाबूश यांचे निर्विवाद वर्चस्व काल- परवापर्यंत मान्य केलेले मडकईकर- टोनी किती काळ नव्या संसारात रमतील हादेखील लाख मोलाचा प्रश्न. मनोहर पर्रीकर असताना त्यांच्याविरोधात लुटुपुटूची निवडणूक लढवण्याची चाल बाबूश मॉन्सेरात यांनी खेळून काँग्रेसला अनेकदा अडचणीत आणले आहे. यावेळी त्यांची बाबूशच्या पथ्यावर पडणारी पुनरावृत्ती झाली तर आश्चर्य वाटू नये. तिकिटासह उमेदवाराला विकत घ्यायची क्षमता असलेल्या बाबूश यांच्या दांडगाईच्या राजकारणाला विरोध करण्याचा आव आणणारा काँग्रेस पक्ष त्याच तालमीची माती अंगाला लागलेल्यांवर कसा काय भरवंसा ठेवतो, हेच कळत नाही.

निवडणूक रणनितींत आयत्या वेळी येणाऱ्यांचा मानसन्मान गृहित धरायचा असतो हे मान्य; पण त्यासाठी निष्ठावंतांची केडर पदरी असावी लागते, अशी केडर भाजपाकडे आहे. म्हणून तो पक्ष आयत्या वेळी कोणताही- अगदी ऐन वेळी आयात केलेलादेखील- उमेदवार कार्यकर्त्यांच्या गळी उतरवू शकतो. त्यांना कार्यप्रवण करू शकतो. त्याचप्रमाणे इच्छुकांमधल्या नाराजांचेही सांत्वन करून त्यांना यथोचित बक्षिसीही देऊ शकतो. तशी काँग्रेसची परिस्थिती नाही. आपल्या महिला, युवा कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्याचे स्थानिक सुभेदारांना कधी सुचलेच नाही. निवडणुकीची चाहुल लागण्याआधीच जे व्हायला हवे होते, ते निवडणूक तोंडावर येऊनही होत नाही. समविचारी पक्षांकडे युती करण्याच्या निर्णयाचे घोंगडें भिजत टाकण्याचा दुसरा प्रमाद काँग्रेसचे स्थानिक आणि राष्ट्रीय नेतृत्वही करते आहे. यातून भाजपाला एकसंध विरोध होण्याची शक्यता दिवसागणिक रोडावते आहे. युती करायची की नाही हे आधी ठरवून टाकावे आणि मग गैरसोयीच्या मतदारसंघांत उमेदवारांची आयात करण्यावर विचार करावा, हे जगन्मान्य तत्त्व काँग्रेस का नाकारते आहे? त्या पक्षाच्या नेतृत्वाने लक्षात घ्यायला हवे की भाजपाची रणनिती लेचीपेची नाही.

आयातीचे राजकारण यशस्वी करण्याचा त्या पक्षाचा अनुभव प्रदीर्घ आहे. काँग्रेस पडेल उमेदवारांना आयात करते आहे, प्रत्युत्तरादाखल त्या पक्षातले बिनीचे नेते आम्ही एका रात्रींत आणू शकतो, ही भाजपा नेत्यांची दर्पोक्ती निश्चितच नव्हे. असे काही झाले तर काँग्रेसच्या शिडातील वारा कसा आणि कधी निघून गेला हे नेत्यांनाही कळणार नाही. भाजपाकडे राज्यांत आणि केंद्रातली सत्ता आहे, असंतुष्टांचे तुष्टीकरण करण्यासाठी लागणारी संसाधने आहेत आणि आपल्या कामी येणाऱ्यांचे राजकीय मूल्य अबाधित राखण्याची क्षमताही आहे. काँग्रेसमध्ये नेमकी याच गुणवैशिष्ट्यांची ददात जाणवते आहे. अशा मनोवृत्तीला चिदंबरम काय थेट सोनिया गांधीही काही ऊर्जा देऊ शकणार नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

United Nations: इस्रायलच्या समर्थनार्थ पहिल्यांदाच UN बैठक, अमेरिकेने दिला पूर्ण पाठिंबा; इस्त्रायली लष्कर राफाह शहरात घुसले!

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

SCROLL FOR NEXT