मनस्विनी प्रभुणे-नायक
कितीही नकोसे वाटले तरी उन्हाळ्याच्या या दिवसांशिवाय आपल्या स्वयंपाकघरात चवीचे वास्तव्य होणार नाही. घाम काढणारे, अंगाची लाहीलाही करणारे दमट -उष्ण वातावरण खरेच नकोसे वाटते. पण भारतीय स्वयंपाकघरासाठी आणि विशेष करून महिलावर्गासाठी हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवसांत पडणाऱ्या कडक उन्हात मिरची, कडधान्ये सुकत घातली जातात.
कुरडया, विविध प्रकारच्या पापड्या, पापड करून तेदेखील कडकडीत उन्हात ठेवायची लगबग सुरू होते. विविध प्रकारचे मसाले बनवायला सुरुवात होते. कैरीचा मुरांबा आणि आंब्याचा साखरंबा, कैरीचा तिखट-आंबट- गोड चुंदा आणि सगळ्यात महत्त्वाचे वर्षभर पुरेल असे कैरीचे लोणचे बनवणे म्हणजे तर समस्त महिलावर्गासाठी एक मोठा सोहळा असतो. या सगळ्या तोंडाला पाणी सुटणाऱ्या प्रकारांमुळे उन्हाळा त्रास देणारा असला तरी त्याच्याशिवाय आपल्या जिभेची चव टिकणार नाही हेही खरे आहे.
माझी पिढी खरेच नशीबवान आहे ज्यांना वाळवणाचे काम आणि तेदेखील सामूहिक पद्धतीने केले जाणारे काम अनुभवायला मिळाले. भल्या मोठ्या चौसोपी वाड्याच्या पुढच्या - मागच्या अंगणात हे दिवस आणि रात्र जागवण्यात एक वेगळीच मजा होती. अंगणात रोज कोणत्या ना कोणत्या काकूंचे वाळवणाचे पदार्थ ठेवले जायचे. आधी प्लस्टिकचा मोठा तुकडा अंथरला जायचा मग त्यावर स्वच्छ धुतलेले कॉटनचे कापड अंथरून त्यावर तर्हेतर्हेचे पदार्थ वाळवण्यासाठी ठेवले जायचे.
महिलांच्या जीवनात अंगणाला एवढे महत्त्व का आहे, ते आता समजतेय. वाड्यातील प्रत्येकजणीचा यात उत्साहाने सहभाग असायचा. आज जोशी काकूंचे पापड, तर उद्या रबडे काकूंचे पापड असायचे. दुपारच्या वेळेला आपापली कामे उरकून सगळ्याजणी आपापली पोळपाट लाटणी घेऊन पापड लाटायला बसायच्या. त्याआधीच पापडाचे पीठ काळ्या दगडाच्या पाट्यावर बत्त्याने भरपूर कुटून - मळून ठेवलेले असायचे. हे काम करणारीचा मग पुढे आठवडाभर हात दुखायचा. छान मळलेल्या पिठातून एक मोठा भाग काढून त्याला तेलाचा हात लावून त्याच हाताने रोल करून एका दोऱ्याने त्याचे छोटे छोटे गोळे केले जायचे. याला पापडाच्या ‘लाट्या’ किंवा बोटी म्हटले जाते.
प्रत्येकीसमोर या पापडाच्या लाट्या आणि पापडाची पिठी ठेवली जायची. जिला जितका वेळ आहे त्या वेळेत जेवढे पापड लाटून होतील तेवढे ती पापड लाटायची. मध्येच जिच्या घरचे पापड आहे, ती उठून सर्वांसाठी कैरीचे पन्हे, तोंडात टाकायला शेव चिवडा घेऊन यायची, तर कुणी गरम गरम पोहे करून आणायची. असले सगळे तोंडाला पाणी सुटणारे मिळत असल्यामुळे आपल्या आईचादेखील पापड लाटण्यात सहभाग असावा, याकडे आमचे लक्ष असायचे. वाड्यातील समस्त काकूंसोबत आपली आई पापड लाटायला गेली नाही, तर कितीतरी चविष्ट गोष्टींना आपल्याला मुकावं लागेल असे आमच्या बालमनाला छळत असायचे.
हा सगळ्याजणींनी मिळून पापड लाटण्याचा प्रकार अतिशय मनोरंजकदेखील असायचा. या सगळ्या काकूंच्या गप्पांचे आम्हांला मोठे कुतूहल असायचे आणि त्यापेक्षा त्यांच्यासोबत बसल्यावर पापडाची एखादी ‘लाटी’ मिळावी त्यावर आमची नजर असायची. पुढचा अर्धा तास तरी ती तेलाचा हात लावलेली छोटीशी लाटी हळूहळू खात बसायचो. या लाटीतील मिरे, हिरव्या मिरचीचा तिखटपणा खाताना जाणवायचा.
दाताखाली येणाऱ्या मिऱ्यांची चव मस्तकापर्यंत जायची. मध्येच पापडाचे पीठ दातात अडकून बसायचे. मग बोट तोंडात घालून ते काढण्याचा आटापिटा सुरू असायचा. ‘टूथपिक’सारखा प्रकार त्यावेळी घराघरांमध्ये सहजपणे नसायचा. मैत्रिणींसोबत गप्पा मारत पापडाची ‘लाटी’ खाणे यातली मजा काही निराळीच होती. पापड बनवणे हे अगदी बायकांचे साम्राज्य-अधिकारशाही असलेला प्रकार असला तरी पापडाच्या ‘लाटी’साठी घराघरांतील पुरुष मंडळीदेखील आसुसलेली असायची. घरातल्या बच्चे मंडळींना ‘माझ्यासाठी पण पापडाची लाटी घेऊन ये’ असे हळूच सांगायचे.
पापड सुकून -वाळवून झाले की खायला मिळणार, पण त्याआधी पापडाची लाटी खाणे म्हणजे इति कर्तव्यच जणू! पापड लाटण्याच्या कार्यक्रमाशिवाय उन्हाळ्याची सुट्टी साजरी झाल्यासारखी वाटायची नाही. हे सगळे अनुभव माझ्या पिढीतल्या सर्वांनी आपल्या बालपणात अनुभवले असणार. माझ्या सासूबाई सांगतात की त्या कितीतरी किलो पापडाचे पीठ भिजवायच्या आणि संपूर्ण कोंबवाड्यावरच्या त्यांच्या मैत्रिणी आपापले ‘लाटफळे’ घेऊन आमच्या घरी जमायच्या. मग निमित्ताने हास्यकल्लोळ, गप्पा -टप्पा, सोयरीक जमवणे हे सगळे व्हायचेच.
नेत्रावळी आदर्श ग्राम योजनेत मनोहर पर्रीकर यांनी मला त्या गावातील महिलांसाठी वेगवेगळे छोटे व्यवसाय सुरू करून देण्याचं, त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सोपवलं. ‘महिलांना कायमच पापड -लोणचे बनवण्यात का गुंतवायचं?’ अशा विचाराने मी प्रेरित होते. त्यांना नवं काहीतरी, काळाशी सुसंगत असे प्रशिक्षण द्यायला हवे असे वाटायचे आणि तशाच प्रकारचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून मनोहर पर्रीकर यांच्या समोर ठेवला. यासगळ्या प्रकल्पाकडे माझा ‘शहरी’ दृष्टिकोन बदलला.
ग्रामीण भागातील-जंगलात राहणाऱ्या महिला आहेत. सर्व प्रथम त्यांना एकत्र येऊन काम करण्याची सवय आपल्याला लावायची आहे आणि अशा कामातून त्यांना आर्थिक मोबदला देखील मिळायला हवा. यासाठी पापड व्यवसायाचे मॉडेल हे सर्वांत उपयुक्त आहे याची जाणीव त्यांनी करून दिली. यात पापड लाटण्यासाठी महिला एकत्र येतात, त्या कामात व्यस्त राहतात पण त्यासोबत त्यांच्या एकमेकींशी गप्पाटप्पा होतात हे सर्वात महत्त्वाचे. जर त्यांना एका ठिकाणी येऊन पापड लाटणे शक्य नसेल तर त्यांना तयार असलेले पापडाचे पीठ द्यायचं, त्या घरून पापड लाटून - वाळवून आपल्या सेंटरला जमा करतील. इतकं सविस्तरपणे पर्रीकरांनी सांगितले त्यांचे हे सगळं वर्णन ऐकून ‘तुम्हांला यातले एवढे बारकावे कसे माहिती?’ असे विचारले तर त्यांनी देखील त्यांच्या बालपणातल्या आठवणींचा दाखला दिला. त्यांची आई म्हापशातील त्यांच्या घरी आजूबाजूच्या सर्व बायकांना सोबत घेऊन असेच पापड बनवायची.
बालपणातील या निरीक्षणामुळे पापड लाटणे हा बायकांना एकमेकींशी जोडणारा प्रकार आहे हे त्यांच्या डोक्यात फिट्ट बसले होतं. एकदा ग्रामीण भागातील महिला एकत्र यायला लागल्या, एकत्र येऊन काम करण्याची त्यांना सवय लागली की मग तुला हवे तसे प्रशिक्षण त्यांना दे पण आधी त्यांना एकत्र येऊ दे. हा संघटनात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मंत्र त्यांनी मला दिला. पापड लाटण्याचा प्रकार मी देखील माझ्या बालपणात अनुभवलाय. पण ते ज्या पद्धतीने या कामाकडे बघत होते तसे मी बघत नव्हते. माझ्यातला शहरी- सुशिक्षितपणाचा बाणा सतत वर यायचा. याला बदलवण्यात ‘पापड उद्योग’ कारणीभूत ठरला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.