Upasana Joshi Dainik Gomantak
ब्लॉग

देसी आधुनिक असू शकते...

गोमन्तक डिजिटल टीम

उपासना जोशी

फॅशन म्हटल्यावर आपल्याला ब्रँड, स्टुडिओ, शोरूम अशा उच्चभ्रू गोष्टीच आठवतात. फॅशनला आजच्या जाहिरात व्यवस्थेने माणसाचे तथाकथित स्टेटस सांगणारे एक चिन्ह बनवले आहे, ज्याचा माणसाच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाशी कोणताही संबंध नसू शकतो. पण पेहराव, अलंकार किंवा अंगावर बाळगण्यात येणाऱ्या वस्तू याद्वारे, माणूस ओळखण्याच्या बाजारू निकषांनी जन्म दिलेल्या ब्रँडप्रणित मार्केटमुळे कित्येक स्थानिक कारागिरांना आपल्या पारंपरिक व्यवसायांना मुकावे लागले आहे.

मार्केट व्यापून राहिलेल्या अशा देशी-विदेशी ब्रँडबरोबर मुकाबला करणे सोपे नसते. पण अनेक कारागीर कलाकार स्वतःच्या उत्पादनाचा दर्जा राखून व त्यात वैविध्य आणून मार्केटमध्ये आपले स्थान राखण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांचा स्वतःवर असणारा विश्वास हीच त्यांची त्यातली भरभक्कम गुंतवणूक असते. फॅशन क्षेत्रात तर आपले पाय रोवून ठामपणे उभे राहणे हे अधिकच आव्हानात्मक आहे.

डिचोली तालुक्यातील वेळगे या छोट्याशा गावातल्या उपासना जोशी हिने हे आव्हान स्वीकारले आहे. एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये केबिन क्रू म्हणून तिचे प्रशिक्षण झाले होते पण आरोग्याच्या कारणावरून तिला ते क्षेत्र सोडावे लागले. त्यानंतर तिने हॉस्पिटलिटी क्षेत्रात नोकरी स्वीकारली. एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये प्रशिक्षण घेताना फॅशनची तिची ओळख झालीच होती.

त्यामुळे ही नोकरी चालू असताना उपासनाने ‘फॅशन आणि बॅग डिझाईनिंग’चा कोर्स पूर्ण केला. हा कोर्स केल्यानंतर योग्य मानधन देणारी आपली आठ वर्षांची नोकरी सोडून उपासनाने, डिझायनर वस्त्र प्रावरणे आणि हाताने बनवलेल्या वस्तू निर्माण करण्याच्या आपल्या छोट्या व्यवसायाला सुरुवात केली.

उपासना आपल्या हाताने साऱ्या वस्तू बनवते. वस्तू डिझाईन करण्यापासून ते बनवण्यापर्यंत साऱ्या गोष्टी ती एकहाती पार पाडते. यात कपडेच नव्हे तर बॅग, अलंकार अशा प्रकारच्या वस्तूंचाही समावेश असतो. पारंपरिक रचनांना आधुनिक वळण देऊन आपल्या उत्पादनांना ती अधिक आकर्षक बनवते. रेडिमेड’ ऐवजी आपण ‘हॅन्डमेड’ला प्राधान्य का द्यायला हवे याबद्दल सांगताना उपासना म्हणते. ‘हाताने बनवलेल्या वस्तू स्थानिक कारागिरांना रोजगार आणि प्रोत्साहन देतात त्याशिवाय आपल्या सुंदर भारतीय संस्कृतीचा त्या एक प्रकारे पुरस्कार करतात.’

रचनांच्या बाबतीत वैविध्य आणण्यासाठी उपासनाने डिझाईन, फॅब्रिक तसेच इतर साहित्यासंबंधी स्वतः संशोधन केले आहे. उत्तर भारतीय कला ‘इक्कत’ तसेच ‘जामदानी’ यांच्या खुणा तिच्या वस्त्ररचनात जाणवतात. व्यवसाय सुरू केल्यानंतर उपासनाला दोन वर्षांच्या आतच आंतरराष्ट्रीय ग्राहक लाभले. ती आपल्या उत्पादनाची विक्री मुख्यतः जरी ऑनलाइन पद्धतीने करत असली तरी पणजी तसेच मडगाव येथील महत्त्वाच्या आस्थापनात तिची उत्पादने उपलब्ध असतात. त्याशिवाय वेगवेगळ्या प्रदर्शनामधूनही ती आपली उत्पादने मांडते.

हस्तकारागिरीतून निर्माण होणाऱ्या उत्पादनांसमोर प्रस्थापित ब्रँडचे आव्हान सदोदित असले तरी उपासना आपल्या उत्पादनाचा दर्जा सिद्ध करत फॅशनच्या प्रांतात स्वतःला स्थापित करण्याचा प्रयत्न निकराने करतेच आहे. आपला स्वतःचा स्टुडिओ साखळी किंवा पणजी येथे असावा ही तिची इच्छा आहे. एका खेड्यातून आलेल्या मुलीने आपले उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करण्याचे स्वप्न पाहणे हे कौतुकास्पद आहे. तिच्या moderndesi_byupasanajoshi या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन तिने निर्माण केलेल्या विविध रचना अवश्य पहा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT