Creativity through cooking Dainik Gomantak
ब्लॉग

पाककलेतून निर्मितीशीलता

गोमन्तक डिजिटल टीम

मनस्वीनी प्रभुणे- नायक

रोज तोच तो स्वयंपाक करून बायका कंटाळून जातात. त्यात नाविन्य असं काही राहत नाही. दिवसातला त्यांचा कितीतरी वेळ स्वयंपाकघरात जात असतो. काय हे आमच्या वाट्याला आलं आहे.. असं त्यांना कधी कधी वाटतं. पण तरी देखील त्या रोज नव्या उत्साहाने स्वयंपाकघरात राबत असतात.

घरातील मंडळींना कोणते वेगळे पदार्थ करून खायला घालता येतील याचं नियोजन करत असतात. स्वयंपाकघरात किती विविध पातळीवर काम करत असतात. नुकतीच दोन वेगवेगळ्या पाककला स्पर्धांना जाऊन आले. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महिलांकडे बघून स्वयंपाक या विषयाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. रोजच्या धबाडग्यातून वेळ काढून काहीतरी नवं बनवण्याची उर्मी या साऱ्या सहभागी महिलांमध्ये दिसून येत होती.

''सीएमएम अरेना'' या गृहोपयोगी वस्तूंच्या आस्थापनाने आणि तनिष्का व्यासपीठने महिलांसाठी गोड पदार्थ बनवण्याची स्पर्धा आयोजित केली होती. तिथं पोहोचण्यापूर्वी नेहमीचे ठरलेले गोड पदार्थ बघायला मिळणार असा थोडासा पूर्वग्रह डोक्यात ठेवून गेले होते. पण सहभागी महिलांची निर्मितीशीलता बघून अक्षरशः अचंबित झाले. सहभागी चव्वेचाळीस महिलांनी प्रत्येकीने स्वतंत्र नवा पदार्थ करून आणला होता.

चव्वेचाळीस प्रकारच्या गोड पदार्थांची विविधता डोळ्याचं पारणं फेडेल अशी होती. शोभन देसाई यांनी बनवलेल्या ''मस्कमेलन'' म्हणजेच चिबुडाच्या हलव्याची अजूनही अप्रतिम चव जीभेवर रेंगाळत आहे. गोव्यात मिळणारं चिबुड फळ चवीला वेगळंच. प्रत्येक घरात हे फळ खाण्याचे वेगवेगळे प्रकार प्रचलित आहेत. शोभन देसाई यांनी कल्पकता वापरून या चिबुडचा हलवा बनवला होता.

याची अप्रतिम चव होती. झीनत शेख यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने अननसाचा शीरा बनवला होता. तर दिपल ध्रुव यांनी आमरसातली अंगूर मलई बनवली होती. स्पर्धेत भाग घेताना फक्त चविष्ट पदार्थ बनवून उपयोग नसतो. त्या पदार्थाची सजावट, सादरीकरण देखील तेवढंच आकर्षक बनवणं गरजेचं असतं. आमरसातील अंगूर मलई दिसायला इतकी सुंदर होती कि कोणीही स्वतःला ती खाण्यापासून रोखू शकलं नाही.

आंब्याचा केशरी रस, त्या रसात पांढरी शुभ्र अंगूर मलई आणि त्या अंगूर मलाईच्या छोट्याशा गोळ्यांमध्ये आंबाचा रस असं सगळं कलात्मक पद्धतीनं दिपाली ध्रुव यांनी बनवलं होतं. याशिवाय बीटपासून, तृणधान्यापासून, खजूर, फणस, आंबा, नाचणी असे वेगवेगळे पौष्टिक घटक वापरून महिलांनी गोड पदार्थ बनवले होते.

अननसाच्या शीरा सोबत अननसापासून केलेला पोपट अतिशय लक्षवेधक ठरला. एका स्पर्धक महिलेने तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थासोबत त्याची उपयुक्तता सांगणारा आकर्षक देखावा केला होता. तनिष्का गटातल्या पालयेच्या संध्या नाईक यांनी नाचणीचे सत्व करून आणले होते आणि त्याची सजावट फारच माहितीपूर्ण होती. नाचणीच्या पौष्टिक गुणधर्माची सविस्तर माहिती त्यांनी सजावट करताना वापरली होती.

संजना नेमान हिने उकडीचे मोदक आणि त्यासोबत बनवलेल्या मोदकाच्या आकारात बनवलेल्या गणपतीने देखील वाहवा मिळवली. हि फक्त चविष्ट नव्हे तर देखणी स्पर्धा होती.

याच्या पाठोपाठ ''अखिल भारतीय महिला परिषद''ने पणजीमध्ये पाककला स्पर्धा आयोजित केली होती. अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा प्रीती शेट्ये यांनी यासाठी बरेच कष्ट घेतले. त्यांनी या स्पर्धेसाठी ''उकड्या तांदुळापासून बनवलेले पदार्थ'' अशी संकल्पना ठेवली होती. उकड्या तांदळापासून बनवलेले पारंपरिक पदार्थ बघायला मिळणार असं वाटलं होतं पण प्रत्यक्षात असे एकेक पदार्थ बनवले होते कि ते बघून आश्चर्य वाटलं. या स्पर्धेमुळे उकड्या तांदुळापासून बनवलेल्या अनेक पदार्थांची नवीन नावं समजली.

''लतड'' नावाचा पदार्थ मी फक्त ऐकला होता पण या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदा बघितला. माधवी बोरकर यांनी उकड्या तांदुळाचा रवा करून, त्याला तुपात खमंग भाजून घेऊन मग त्यात कोकण दुधी (दुधी भोपळा) खिसुन घालून त्याची उकड काढली होती. पण त्यापूर्वी त्यात गूळ, वेलदोडा, खोबऱ्याचे तुकडे, मनुका - किशमिश घातलं होतं. हा पदार्थ सांगे - कुडचडे भागात बनवला जातो. शिऱ्या सारखाच पण वेगळाच पदार्थ. त्याचं ''लतड'' नाव देखील एकदम वेगळं. या स्पर्धेत मंजिरी वाटवे यांनी उकड्या तांदुळाची चक्क ''नानखटाई'' बनवली होती. मैद्यापासून बनवलेली खुसखुशीत नानखटाई आजवर खाल्ली होती.

पण उकड्या तांदुळापासून तेवढीच खुसखुशीत नानखटाई बनू शकते हे मंजिरी वाटावे यांनी दाखवून दिलं. ममता सावंत यांनी बनवलेले उकड्या तांदुळाचे ''कप केक'', सुषमा नाईक आणि शैला तळवळीकर यांनी बनवलेले फणस आणि आंबा रसातले दोणे, दुर्गा केळुस्कर आणि दीपा खेर यांनी बवलेली खांडवी, क्रांती मयेकर आणि अनुराधा नाईक यांनी बनवलेले उकड्या तांदूळ पीठाचे लाडू हे सारेच पदार्थ आगळेवेगळे होते. कोणाला बक्षीस द्यावे असा परीक्षक अमिता सलत्री यांना प्रश्न पडला होता. एकाच घटकाचे इतके सारे प्रकार बनू शकतात हे या महिलांनी दाखवून दिले.

एरवी सणावाराला आपल्याला कोणता गोड पदार्थ बनवायचा असा प्रश्न पडतो. पण इथं एवढे सारे गोड पदार्थ बघून आता प्रश्न उरला नाही. घरातल्या सर्वांसाठी रोजच स्वयंपाक बनवणाऱ्या यासाऱ्या सख्या पाककला स्पर्धेत स्वतःसाठी आल्या होत्या. आपण केलेला पदार्थ कसा असेल? त्याची चव परीक्षकांना आवडेल कि नाही याबाबत अतिशय उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

प्रत्येकीनं बनवलेल्या पदार्थाची चव घेण्यासाठी सर्वांची झुंबड उडते हे प्रत्येक पाककला स्पर्धेतील दृश्य मला फार आवडतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण स्पर्धेत भाग घेतला नाहीतरी नाविन्य असलेले पदार्थ बघण्यासाठी म्हणून या पाककला स्पर्धेत चक्कर मारायला हवी. खाद्यपदार्थांमधली महिलांची निर्मितीशीलता काय असते हे यानिमित्ताने समजतं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT