प्रखर राष्ट्रवादी असलेल्या डॉ. गायतोंडे यांनी एडिला दी आंद्राद या पोर्तुगीज संगीतकार महिलेशी विवाह केला आणि पेनिशे या समुद्रकिनाऱ्यावर ते मधुचंद्रासाठी गेले. याच पेनिशेच्या किल्ल्यांत गोमंतकीय स्वातंत्र्यसैनिक टी.बी. कुन्हा, अॅड. फाचू लोयोला, डॉ. राम हेगडे, लक्ष्मीकांत भेंब्रे आणि पुरुषोत्तम काकोडकर यांना ठेवण्यात आले होते. त्यांनी नवविवाहित दांपत्याच्या सन्मानार्थ सोहळा आयोजित केला होता. 1948 साली गोव्यांत परतल्यावर डॉ. गायतोंडे म्हापसा येथील आझिलो इस्पितळात सर्जन- संचालक म्हणून काम पाहू लागले.
पण 1954 साली वसाहतवाद्यांच्या यशार्थ 'टोस्ट' करण्यास नकार दिला म्हणून त्यांनाच पोर्तुगालमध्ये हद्दपार करण्यात आले. 1955 साली त्यांची सुटका झाल्यावर ते नवी दिल्लींत (Delhi) स्थायिक झाले. आयर्विन हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ सर्जन म्हणून काम करताना त्यांनी तेथे कर्करोग विभाग स्थापन केला. गोवमुक्तीचा ध्यास घेतलेला हा डॉक्टर लोकसभेचा नियुक्त सदस्य झालेल्या केवळ दोन गोमंतकियांपैकी एक होता - दुसरे होते मडगावचे डॉ. आंतोनियो कुलासो.
दिल्लीतील चार दिवशीय परिषदेस ब्रम्हदेश, सिलोन, कोंगो, इथिओपिया, इंडोनेशिया, इराक, मोरोक्को, नायजेरिया, सुदान, संयुक्त अरब अमिरात अशा देशांचे स्वातंत्र्यवादी नेते उपस्थित होते. गोव्यातील सैनिकी कारवाईस जागतिक पाठिंबा मिळवण्यासाठी परिषदेचे आयोजन केल्याचे मानले जात होते. परिषदेचे निमंत्रित ब्रिटीश मजूर पक्षाचे नेते अँथनी वेजवूड बेन यानी आग्रह धरला की पोर्तुगीज वसाहतवाद हा जागतिक शांततेला असलेला धोका मानून पोर्तुगालने आपल्या वसाहतीना निश्चित कालमर्यांदेंत स्वातंत्र्य द्यावे, असा ठराव संमत करण्यात यावा.
पोर्तुगालच्या अंमलाखालील वसाहतींच्या स्वातंत्र्याची चावी गोव्यांत असल्याचे वेजवूड यांचे मानणे होते. डॉ. गायतोंडे यानी गोव्यात भारताने थेट कारवाई करावी, अशी मागणी केली व दाहोमी येथील साओ जुआंव बाप्तिस्ताच्या कारवाईचे उदाहरण दिले. आफ्रिकी (Africa) आणि आशियायी देशानी पोर्तुगीलशी राजनैतिक संबंध तोडावेत असे आवाहनही डॉ. गायतोंडे यानी केले. आफ्रिकन नेत्यांनी नेहरूंना स्पष्टच सांगितले की नेहरूंना प्रिय असलेल्या तत्त्वमीमांसेत वा उदात्त ठरावांत त्याना अजिबात स्वारस्य नाही, कारण त्यांची उभी हयात पोर्तुगीजांशी रक्तलांच्छित संघर्ष करण्यात सरली आहे.
या नेत्यांना प्रत्यक्ष कृतीच भारताकडून अपेक्षित होती, कारण कृती करताच पोर्तुगीजांचे आफ्रिकेतले साम्राज्यही कोसळले असते. परिषदेचे सूप वाजले आणि मुंबईच्या चौपाटीवर आयोजित केलेल्या महासभेंत नेहरूंनी 24 ऑक्टोबर रोजी देशाचा बदललेला नूर स्पष्ट केला. ते म्हणाले, '' गेल्या काही महिन्यात गोव्यातील अत्याचाराच्या अनेक घटना आमच्या निदर्शनास आल्या असून पोर्तुगीज तेथे माजवत असलेल्या दहशतवादाविषयीही कळले आहे. आता आम्हाला नव्याने विचार करावा लागेल. ही समस्या सोडवण्यासाठीच्या पर्यायांचा नव्याने विचार करण्यास पोर्तुगीजानीच आम्हाला उद्युक्त केले आहे. आम्ही कधी आणि कशी कृती करू, हे आताच सांगता यायचे नाही. पण अशी कृती आम्ही निश्चितपणे करू आणि गोव्याला मुक्तही करू, याबाबत माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही.''
नेहरूंच्या तोंडून त्यांच्या देशाचा निर्धारच बोलत होता.
मेजर जनरल व्ही. के सिंग आपल्या 'हिस्टरी ऑफ कॉर्प्स ऑफ सिग्नल्स' या पुस्तकात लिहितात, '' परिस्थितीचा अंदाज घेत युद्धाची योजना आखली जात असतानाच नेहरू अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्यासाठी मुंबईत आले. त्यानी सदर्न कमांडचे सरसेनापती जन. जे.एन. चौधरी याना बोलावून विचारलें की, गोवा- दमण- दीव ताब्यात घेण्यास किती दिवस लागतील. चौधरीनी उत्तर दिले, जर पोर्तुगीजांनी प्रतिकार केला तर तीन दिवस, अन्यथा त्याहून कमी काळात ताबा घेता येईल...''
'' 28 ऑक्टोबर, 1961 रोजी अहमदाबाद येथील परिषद आटोपून पुण्याला परतत असताना लेफ्ट. जन. बी.एम. कौल आणि लेफ्ट. जन. चौधरी यानी परिस्थितीचे अवलोकन करणारा अहवाल आणि युद्धाच्या योजनेवर चर्चा केली. गोव्यातील (Goa) कारवाईसाठी एचक्यू 17च्या पायदळाच्या तुकडीसह एक वा दोन ब्रिगेड्स व 50 (स्वतंत्र) पॅराशूट ब्रिगेड या कारवाईसाठी मुक्रर करायचे यावेळी ठरले. ही कारवाई पश्चिम आणि पूर्वेकडील कमांडमाद्वारे होणार होती.
''जन. चौधरी यानी आपला अहवाल 10 नोव्हेंबर रोजी मुख्यालयास सादर केला. त्याआधी एक दिवस रेडिओवरून पोर्तुगाली जनतेला संबोधित करताना सालाझारने पोर्तुगीज राष्ट्राची बहुखंडीय एकता अबाधित राखण्याचे आपले धोरण कायम राहील असे आश्वासन दिले. '' आफ्रिका आणि भारतातील आघाडीप्रमाणे आम्ही पिछाडीचेही संरक्षण करू...'' असे त्याचे उद्गार होते.
- वाल्मिकी फालेरो
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.