Dainik Gomantak
ब्लॉग

गावे तीच, सरकारे बदलती

दैनिक गोमन्तक

प्राचीन ज्ञान-विज्ञान, कलाकौशल्ये, संस्कृती यांची बांधणी बऱ्याच प्रमाणात टिकून होती. त्यामुळे वसाहतवाल्या राजवटीची देशावरील पकड मजबूत होत नव्हती. म्हणून त्यांनी नवी शासनपद्धती, शिक्षणपध्दती, युरोपियन व्यवस्थेचा, शिस्तचा एक नवा दिमाख खुलवून येथील व्यवस्थेला होनत्व देण्याचा योजकतापूर्वक कार्यक्रम राबविला.

सरकारे आली ती मानवी समाजाच्या व्यवस्थापनासाठी. सृष्टीतील निरनिराळ्या जीव जातींचे समूहजीवन जातीनिहाय निरनिराळ्या प्रकारचे असते. प्रत्येक जातीच्या गटातील प्राण्यांची संख्या ही ठराविक प्रमाणात असते. काही थोड्या जातीतील प्राणी एककटे स्वतंत्र राहतात. फक्त प्रणयाच्या ऋतुकालात एकत्र येतात.

पक्षी आणि सस्तन प्राणी पिल्ले मोठी होईपर्यंत आई-वडील किंवा काही जातीत फक्त आई पिल्ला बरोबर असते. नंतर स्वतंत्र. दुसऱ्या ऋतूत दुसरी जोडी, दुसरे कुटुंब. माणसांच्या बाबतीत स्त्री-पुरुषांचे जोडपे सदैव एकत्र रहावे आणि मुले सक्षम होईपर्यंत त्यांच्याबरोबर हवी अशी व्यवस्था निसर्गाने घडवून आणलेली आहे. (हे कसे घडविले गेले यावर माझे स्वतंत्र लेखन आहे) बहुधा या व्यवस्थेची घडण मानवपूर्व वंशज एप(कपि) या बिनशेपटीच्या वानर जातीपासून सुरू झाली असावी.

एप जातीत मोठ्या संयुक्त कुटुंबाचा समूह हीच त्यांची टोळी असते. काही पक्षी थव्यात राहतात. तृणभक्षी गायी, म्हशी, हरणे, सांबर, बकऱ्या, मेंढ्या कळपात राहतात. वाळवी, मुंग्या, मधमाशा यांची राणीच्या अधिपत्याखाली एक नगरीच वसविलेली असते. कामाची शिस्तबद्ध वाटणी केलेली असते. शिकार, फळे, कंदमुळे यावर गुजराण करणारा जंगली अवस्थेतील माणूस हा टोळ्यांमध्ये रहायचा.

कुटुंब हा जिव्हाळ्याचा छोटा घटक त्या टोळीच्या अंतर्गत असायचा. पुढे तो शेती करू लागला तेव्हा गाव वसले आणि ग्रामसमूह हा टोळीहून मोठा असा बांधीव गट बनला. ही व्यवस्था काही सहस्त्रके चालली. प्रत्येक गाव हा आपल्या दैनंदिन गरजा बाबतीत स्वयंपूर्ण असायचा. गाव एका शासनाखाली आणणारी राज्यव्यवस्था नंतर निर्माण झाली. राज्य व्यवस्थेच्या अखत्यारीत संरक्षण हाच विषय प्रामुख्याने असायचा.

न्यायदानाचे विषय ग्रामपातळीवर सुटत नसल्यास राजाकडे जायचे. भारतात न्याय-नीतीने चालणाऱ्या या सुसंघटित व्यवस्थेत, एका प्रगल्भ समाजाची निर्मिती झाली, ज्ञान-विज्ञान, कलाकौशल्य, संपत्ती यातून समृध्द व प्रगल्भ असा समाज निर्माण झाला. छोटी सुंदर नगरे वसविली गेली.

आजुबाजूच्या देशातील अप्रगत, विखारी धर्मविचार, स्वार्थ, क्रौर्य यानी भारलेल्या राजवटींच्या टोळ्या हा समृध्द देश लुटण्यासाठी घुसल्या. विधिनिषेदशून्य कृती क्रौर्य, विखारी विचार यापुढे धर्माने वागणारे टिकू शकले नाहीत. बरीच शतके यांचा देशभर मोडतोड, अत्याचार, धर्माच्या नावावर अधर्माचे, विनाशाचे थैमान चालले होते.

सहस्त्रकाच्या मध्याला शिवाजी भोसले या शूर तरुणाने आक्रमाचीच कुटनीती वापरून एक वेगळाच कुशल युध्द प्रकार बनविला व प्रचंड प्रदेश व अफाट संपत्ती मिळविलेल्या शहेनशहाला जबरदस्त धक्के दिले. त्यांची सत्ता खिळखिळी केली. या सर्व विनाशकालात ग्रामसंस्था आपल्या सुदृढ बांधणीमुळे टिकून राहिली.

याच दरम्यान देशांतील प्रचंड संपत्तीच्या लोभाने युरोपांतील देशांच्या टोळघाडी व्यापाराचा मुखवटा व ख्रिस्ती धर्मप्रसाराचा अजेंडा घेऊन देशात घुसल्या. प्रगत आरमार, तोफा, बंदुका ही नवी साधने, युरोपात विकसित होत असलेले विज्ञान-तंत्रज्ञान, शिस्त आणि व्यवस्थापन यांच्या आधारे या युध्दग्रस्त देशात आपला जम बसविला. पण देशात जुनी ग्रामव्यवस्था अजून सक्षम होती.

प्राचीन ज्ञान-विज्ञान, कलाकौशल्ये, संस्कृती यांची बांधणी बऱ्याच प्रमाणात टिकून होती. त्यामुळे वसाहतवाल्या राजवटीची देशावरील पक्कड मजबूत होत नव्हती. म्हणून त्यांनी नवी शासनपद्धती, शिक्षणपध्दती, युरोपियन व्यवस्थेचा, शिस्तचा एक नवा दिमाख खुलवून येथील व्यवस्थेला होनत्व देण्याचा योजकतापूर्वक कार्यक्रम राबविला. त्या दिखाऊ झगमाटापुढे आपली थिजवून टाकलेली कलाकौशल्ये, सांस्कृतिक अधिष्ठाने यावर जळमटे चढल्यामुळे ती कळकट वाटू लागली.

कालांतराने या वसाहती राजवटीतून स्वतंत्र झाली, पण नवराष्ट्राच्या निर्मितीसाठी समोर आदर्श राहिले ते या गुलामी राजवटीचेच. असे म्हणता येईल की ती तात्कालीन अनिवार्यता होती. आपली शक्तिस्थाने शोधून काढायची होती. त्यावेळच्या व भविष्याच्या आव्हानाना तोंड देता येईल अशा बांधणीची पध्दत विकसित करायची होती. पण ते झालेच नाही. आपण या प्रगत देशांच्या बरेच मागे आहोत, आम्हाला त्यांच्या बरोबरीने यायचे आहे, या न्यूनगंडाने आपण त्यांचे अंधानुकरण करीत राहिलो.

आज त्यातील काही देश आजवरच्या त्यांच्या विकासनीतीचा पुनर्विचार करू लागले आहेत. आपण मात्र त्यांच्या आजवरच्या अशाश्‍वत विकासनीतीच्या मागे धावण्यात एवढे मश्‍गुल आहोत की त्यांच्या चुकांपासून शिकण्यास उसंतच नाही.

शेती, गांव-शहरे, उद्योग यास लागणाऱ्या पाण्यासाठी नद्यांवर धरणे हा रेडिमेड उपाय आम्ही त्यांच्याकडून उचलला. आज त्यांच्यात धरणे फोडून नद्यांना वाहते करण्याची मोहीम चालवित आहेत. अमेरिकेत दोन हजारावर धरणे फोडून टाकली आहेत. आपण उभे केलेले धरणप्रकल्प अर्ध्या शतकभरातच सदोष ठरले तरी आपण त्यांची पाठ सोडीत नाही.

त्या प्रगत देशांची दरडोई भूमी आपल्याहून जास्त आहे. त्यांच्या देशांचा विकास बऱ्याच प्रमाणात होऊन गेला आहे. लोकसंख्या वाढ कमी आहे. स्वतःच्या नैसर्गिक संसाधनाना हात न लावता इतर गरीब देशांकडून ती मिळविणे त्यांना शक्य आहे.

आपली दरडोई भूसंपदा कमी आहे. लोकसंख्यावाढीचे आव्हान जबरदस्त आहे. तेवढ्यात आपण स्वयंपूर्ण कसे होऊ व ती स्वयंपूर्णता पुढच्या पिढ्यातही कशी टिकून राहील यासाठी वेगळे पर्याय विकसित करणे हे आजचे आव्हान आहे.

या लेखाच्या सुरुवातीला आपण देशाच्या दीड सहस्त्रकांतील परिस्थितीचा आढावा घेतला. सततची परकीय आक्रमणे, युध्दे, लुटमार, अत्याचार यांत लोकांच्या दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी शासनांचे योगदान विशेष नव्हतेच. देशाच्या रक्षणासाठी सैन्य व इतर मनुष्यबळ तसेच अन्नपुरविण्याची आघाडी सांभाळली ती गावानीच.

चालू शतकाच्या सुरुवातीच्या काळात जगातील प्रगत राष्ट्रांचे अर्थकारण डगमगू लागले होते तेव्हा भारताचे स्थिर होते. त्याबद्दल येथील राज्यकर्त्यांनी पाहिजेतर आपल्या मिशाना तूप लावून घ्यावे. पण ही स्थिरता देशाला ग्रामीण भागाने मिळवून दिली होती, हे विसरता कामा नये. शेती, उद्योग व सेवा ही उत्पादक क्षेत्रे.

शहरे काहीही उत्पादन न करणारा असा परजीवी बांडगुळी घटक. या सर्वांचे व्यवस्थापन करणारे सरकार हेही आपले बांडगुळी गुणधर्म वाढवित आहे. अवाढव्य वाढलेली सरकारी यंत्रणा जनतेला सेवा देण्याऐवजी अडचणीच निर्माण करीत आहे. सर्व क्षेत्रांत प्रचंड ढवळाढवळ, रेवड्यांचे वाटप व थिल्लर लोकप्रियतेसाठी प्रचाराची रणधुमाळी चालली आहे.

देशात पैसा वाढलेला आहे. त्यापेक्षा त्याचा खुळखुळाट वाढला आहे. जीडीपी म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादनाचा निर्देशांक वाढलेला आहे. तो अजून वाढविण्याची उद्दिष्टे जाहीर केली जात आहेत. या जाहिरातबाजीत राज्यकर्ते व बाजारव्यवस्था यांना प्रचंड रस आहे. पण जागतिक विचारवंत जीडीपी हा देशाच्या सुस्थितीचा निर्देशांक म्हणून मानायला तयार नाहीत. यावर चर्चा पुढील

.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT