आमोणकरांचे स्कूल म्हणून सर्वपरिचित असलेल्या म्हापसा येथील ‘न्यू गोवा हायस्कूल’ (सध्याचे ‘जी. एस. आमोणकर विद्यामंदिर’) (New Goa High School) या संस्थेने गोवा मुक्तिपूर्व आणि मुक्तीनंतरच्या काळात आजपावेतो गोमंतभूमीच्या शैक्षणिक क्षेत्रात अद्वितीय योगदान दिले आहे. शिक्षणमहर्षी गुंडू सीताराम आमोणकर आणि त्यांचेच सुपुत्र पद्मश्री सुरेश गुंडू आमोणकर यांच्या श्रमातून सुमारे आठ दशकांपूर्वी रोवलेल्या त्या रोपट्यांचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झालेले आहे.
गुंडू आमोणकर यांनी ही शैक्षणिक संस्था ‘अँग्लो पोर्तुगीज इन्स्टिट्युट’ या नावाने1943 मध्ये स्थापन केली होती. गोवामुक्तीनंतर ‘न्यू गोवा हायस्कूल’ असे तिचे नामांतरण झाले. गुंडू आमोणकर हे मूळचे बार्देश तालुक्यातील कोलवाळ गावचे. माध्यमिक स्तरावरचे शिक्षण घेऊन ते उच्च शिक्षणासाठी मुंबईला गेले व तेथील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन वर्ष 1924 मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्या काळात महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन महात्माजींच्या ‘युवकांनी गावांत जाऊन कार्य करावे’ या हाकेस प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने मुंबईत असलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडून ते वर्ष 2025 मध्ये गोव्यात परतले व आदर्श शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, परिवर्तनवादी नेता आणि लेखक म्हणून गोमंतकीय लोकमानसात लौकिक संपादन केला. बार्देश तालुक्यातील वेर्ला-पर्रा येथील ‘सेक्रेड हार्ट ऑफ जीझस हायस्कूल, पर्रा’ येथे सुमारे अठरा वर्षे विद्यादान केले आणि नंतर शिक्षकपदाचा राजीनामा देऊन म्हापसा शहरात ‘वर्ष 1943 मध्ये ‘अँग्लो पोर्तुगीज इन्स्टि्युट’ या एका मृतप्राय संस्थेला नवचैतन्य मिळवून देत त्याच नावाची स्वत:ची शिक्षणसंस्था स्थापन केली.
त्या काळात पोर्तुगिजांचा जबरदस्त दरारा होता व त्यामुळे पोर्तुगीज माध्यमाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही भाषेतून शिक्षण देणाऱ्या नवीन शैक्षणिक संस्था सुरूच केल्या जाऊ देत नव्हत्या. इंग्रजी आणि मराठी माध्यमातील विद्यालयांमुळे भारतीय राष्ट्रवादाचे परिपोषण होऊ शकते अशी पोर्तुगिजांना भीती होती. शिक्षक म्हणून गुंडू आमोणकर यांनी मिळवलेले नाव सर्वदूर पसरले होते व त्यामुळे त्यांच्या विद्यालयात विद्यार्थीसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली. पहिल्याच वर्षी तब्बल 184 विद्यार्थ्यांची नावनोंदणी होती. सुरुवातीच्या काळात ते विद्यालय म्हापसा शहरातील सीम-अन्साभाट येते भाडोत्री घरात कार्यरत होते. आमोणकरांच्या विद्यालयाने म्हापशातील युवकांना आणि विशेषत्वाने मुलींनाही माध्यमिक स्तरावरील शिक्षण देण्याचे कार्य अतिशय जिद्दीने केले. त्या विद्यालयामुळे म्हापशातील मुलींची चांगल्यापैकी सोय झाली होती; कारण, त्या काळात त्यांना दूरचा प्रवास करणे त्रासदायक होते. त्या विद्यालयाला पहिल्याच वर्षी अर्थात 22 मार्च 1944 रोजी ‘बॉम्बे युनिव्हर्सिटी’ची मान्यता मिळाली.
कालांतराने आल्त-म्हापसा येथे सुमारे दीड हजार चौरस मीटर भूक्षेत्रात वस्त:च्या जमिनीत विद्यालयाची वास्तू उभारण्यात आली. त्या काळात विद्यालय चालवणे हे आव्हानात्मक होते. कारण पोर्तुगीज सरकारकडून कोणतीच आर्थिक मदत विद्यालयाला मिळत नव्हती. केवळ विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या फीच्या बळावरच विद्यालय चालवावे लागायचे. कित्येकदा शिक्षकांचा पगार देण्याच्या उद्देशाने गुंडू आमोणकर यांची पत्नी स्वत:चे दागिने गहाणवट ठेवण्यासाठी पतीकडे द्यायची.
परदेशातील नोकरी सोडून सुरेश आमोणकर यांनी वडिलांच्या इच्छेनुसार गोव्यात आले व या विद्यालयाची जबाबदारी स्विकारली. वर्ष 1961 मध्ये पोर्तुगिजांच्या रावजवटीपासून गोवा मुक्त झाल्यावर सरेश आमोणकर यांनी संक्रमणावस्थातील गोव्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या हेतूने या विद्यालयाचे ‘न्यू गोवा इंग्लिश हायस्कूल’ असे नामांतरण केले. वर्ष 1994 मध्ये विद्यालयाची सर्व मालमत्ता ‘न्यू गोवा एज्युकेशनल ट्रस्ट’च्या नावावर करण्यात आली. विश्वस्त मंडळाने 15 डिसेंबर 2003 रोजी या विद्यालयाच्या माध्यमिक विभागाचे ‘जी. एस. आमोणकर विद्यामंदिर’ असे नामकरण केले. या विद्यालयात सध्या पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील अशा तिन्ही विभागांत मिळून सुमारे सोळाशे विद्यार्थी विद्यार्जन करीत आहेत.
माजी विद्यार्थी पोहोचले उच्चपदावर…
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे माजी संचालक डॉ. सतीश शेटये, तसेच कित्येक आजी-माजी मंत्री, आमदार, नगरसेवक, प्रख्यात डॉक्टर, अभियंते, वास्तुविशारद, वकील, सनदी लेखापाल, भारतीय व परदेशी विद्यापीठांतील शिक्षक व प्राध्यापक, कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रमुख अधिकारी, उद्योजक, बिशप, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत.
पद्मश्री आमोणकर यांचे योगदान…
सुरेश आमोणकर हे गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष होते. शिक्षण, सामाजिक सेवा आणि लेखन क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाची दखल घेऊन त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने 26 जानेवारी 2009 रोजी सन्मानित केले आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी झटणाऱ्या ‘आंतर भारती’चेही कार्य त्यांनी केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.