INDW vs AUSW ODI Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने 190 धावांनी जिंकला. यासह कांगारु संघाने भारताचा धुव्वा उडवत मालिका 3-0 अशी जिंकली. भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाला एकमेव कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, कांगारु संघाने एकदिवसीय मालिका 3-0 अशी जिंकून दमदार पुनरागमन केले. आता दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
दरम्यान, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 339 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघ 148 धावांवर गारद झाला आणि सामना 190 धावांनी गमावला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्डने 119 धावा केल्या. त्याचवेळी, स्मृती मंदानाने भारताकडून सर्वाधिक 29 धावा केल्या.
दुसरीकडे, 339 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. चार षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या एकही विकेट न गमावता 27 धावा होती. यानंतर यास्तिका भाटिया 14 चेंडूत 6 धावा करुन बाद झाली. मेगन शुटने तिला क्लिन बोल्ड केले. शूटने मंदानालाही बाद केले. मंदानाने 29 चेंडूत 29 धावा केल्या. कर्णधार हरपनप्रीतही 10 चेंडूत तीन धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतली. ऋचा घोषने 29 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले. जेमिमाह रॉड्रिग्ज 27 चेंडूत 25 धावा करुन बाद झाली.
त्याचवेळी, अमनजोत कौर आठ चेंडूत तीन धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतली. पूजा वस्त्राकर 14 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतली. श्रेयंका पाटील 10 चेंडूत दोन धावा करुन बाद झाली. तर रेणुका ठाकूरला खातेही उघडता आले नाही. मन्नत कश्यप आठ धावा करुन बाद झाली तर दीप्ती शर्मा 25 धावा करुन नाबाद राहिली. ऑस्ट्रेलियाकडून जॉर्जिया वेरहॅमने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. मेगन शुट, अलाना किंग आणि अॅनाबेल सदरलँडने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. अॅशले गार्डनरला एक विकेट मिळाली.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर फलंदाज फोबी लिचफिल्ड आणि अॅलिसा यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी केली होती. मात्र, कर्णधार अॅलिसा हिलीचे शतक हुकले. 85 चेंडूत 82 धावा करुन ती बाद झाली. हीलीने आपल्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार मारले.
29व्या षटकातील पाचव्या चेंडूवर पूजा वस्त्राकरने तिला क्लीन बोल्ड केले. यानंतर फलंदाजीसाठी आलेली अॅलिस पेरी मात्र विशेष काही करु शकली नाही आणि नऊ चेंडूत 16 धावा काढून अमजोत कौरची शिकार झाली. ताहलिया मॅकग्रा (0 धावा) आणि बेथ मुनी (3 धावा) यांना एकाच षटकात बाद करुन श्रेयंका पाटीलने भारताला दोन विकेट्स मिळवून दिल्या होत्या.
दुसरीकडे, लिचफिल्ड शतक झळकावून बाद झाली. दीप्तीने तिची विकेट घेतली. तिने 125 चेंडूत 119 धावा केल्या. अॅनाबेल सदरलँड 23 धावा करुन बाद झाली आणि अॅशले गार्डनर 30 धावा करुन बाद झाली. अखेरीस, अलाना किंगने 14 चेंडूत 26 धावांची नाबाद खेळी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 338 धावांपर्यंत नेली होती. भारतीय संघाकडून श्रेयंका पाटीलने तीन आणि अमनजोत कौरने दोन गडी बाद केले. पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.