पेडणे, जीएमआर कंपनी व इतरांनी पेडणे तालुका आपल्या नियंत्रणाखाली ठेवला असून पेडणे तालुका हा जीएमआर नगर केला जात आहे, स्थानिकांना त्यांच्या हक्कांसाठी डावलले जात आहे. नियोजना अभावी हे झालेले आहे.
पेडण्यातील जमिनीवर भूमाफियांचा डोळा असून वेळीच त्यावर आवर घातला पाहिजे, काही उपाय योजना न केल्यास येत्या काही दिवसात पेडणेकर आपल्याच गावात अल्पसंख्याक होण्याची शक्यता आहे, असे मत आमदार विजय सरदेसाई यांनी पेडणे येथे बोलताना केले.
इंडिया युतीतर्फे येथील सरकारी विश्राम धामात लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर गोवा फॉरवर्ड पक्षाचे उत्तर गोवा अध्यक्ष दीपक कळंगुटकर, कॉंग्रेसचे ॲड. जितेंद्र गावकर, मांद्रेचे सरपंच प्रशांत नाईक , पालयेचे माजी सरपंच उदय गवंडी, आपचे देवेंद्र प्रभु देसाई, प्रसाद शहापूरकर उपस्थित होते.
सरदेसाई पुढे म्हणाले, पेडण्यातील सद्यःस्थिती पाहता, मोपासारख्या विमानतळामुळे येत्या काही वर्षात परराज्यातील लोकांची संख्या वाढणार असून गावातील सरपंच हे तेलुगू भाषकही असतील. मोपा विमानतळावर स्थानिकांना टॅक्सीसाठी काउंटर मिळत नाही, ही चुकीचे आहे.
यावेळी दीपक कळंगुटकर, प्रशांत नाईक यांचीही यावेळी भाषणे झाली. सुदेश सावंत उपेंद्र देशप्रभू, भास्कर नारुलकर, संदीप कांबळी, उदय महाले, महेश तुळसकर, हरमलचे माजी सरपंच डॅनियल डिसोझा आदींनी विविध विषयावर सूचना केल्या.
दोन्ही आमदार गप्पच!
पेडणे तालुक्यातील दोन्ही आमदार सत्ताधारी पक्षात असून वस्तुस्थितीबाबत बोलण्यास ते धजत नाहीत. पेडणेच्या विकासाबाबत बोलले पाहिजे, तसेच चुकीच्या पद्धतीने व्यवहार होत असेल, धोरणे राबविले जात असतील, तर विरोध केला पाहिजे.
पण दोन्हीही आमदार काहीही करीत नाहीत. दक्षिण गोव्यात सनबर्न सुरू करण्यासंबंधीची घोषणा हा हवेत सोडलेला बाण आहे. पेडण्यात सनबर्न सुरू करण्याचा प्रयत्न झाला, तर तुमच्या आमदारांनी त्याला विरोध करायला हवा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.