पणजी/मडगाव: सरकारी नोकरी म्हणजे कमीत कमी काम आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेला वेतनाची हमी, आयुष्यभरासाठी निवृत्तीवेतनाची तरतूद. यामुळेच सरकारी नोकरीसाठी लाखो रुपये देण्याची तयारी दाखवली जात आहे. अलीकडे पैशांच्या बदल्यात नोकऱ्या, हा घोटाळा गाजत असताना असे का केले जात होते याचा शोध घेतला असता, वरील कारणे ठळकपणे समोर आली.
सरकारी कर्मचारी अशा घोटाळ्यांत गुंतल्याचे दिसत आहेत. काहींना अटकही झाली आहे. सरकारी नोकरीत अनेक दाम्पत्ये आहेत. त्यामुळे घरात येणारा पैसा दुप्पट, तिप्पट करण्यासाठी अशा मार्गांचा अवलंब त्यांना सुचला असावा, असेही दिसते. कनिष्ठ लिपिकपदी हजर होणाऱ्याला ४१ हजार ५८० रुपये सुरवातीला वेतन मिळते. तेच वेतन १० वर्षांनी ५४ हजार १ रुपये होते. १५ वर्षांनंतर ६२ हजार ३७२ रुपये वेतन मिळते.
त्यात कनिष्ठ लिपिकाला १० वर्षांनी वरिष्ठ लिपिकपदी बढती मिळाली तर वेतनात मोठी वाढ होते. वरिष्ठ लिपिकपदी थेट रुजू होणाऱ्याला १९ हजार ९०० रुपये मूळ वेतन, ५३ टक्के महागाई भत्ता, २० टक्के घरभाडे आणि ५३ टक्के अधिक ९०० रुपये असा वाहतूक भत्ता असे वेतन मिळते. ते वेतन ४५ हजार ५४० रुपये होते. त्यात दरवर्षी वाढ होत जाते. महागाई भत्ता १०० टक्के झाला की मूळ वेतनाएवढाच महागाई भत्ता मिळतो. यामुळे सरकारी नोकरीतील वेतनाचे आकडे हे फार आकर्षक वाटत आले आहेत.
मोठ्या वेतनामुळे सरकारी कर्मचाऱ्यांत काही सवयी निश्चितपणे बदलल्या आहेत. पती व पत्नी दोन्ही नोकरी करत असलेल्यांत बाहेरून खाणे मागवून खाण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. आठवड्याला एकदा मल्टिफ्लेक्समध्ये चित्रपट पाहण्यासाठी जाणे आणि सुट्टीत बाहेरगावी सहलीसाठी जाणे नेहमीचे झाले आहे. पूर्वी कनिष्ठ मध्यमवर्गीय म्हणून गणला जाणारा हा वर्ग आता उच्चभ्रू व श्रीमंत लोकांशी स्पर्धा करू लागला आहे. तीन-चार वर्षांनी चारचाकी गाडी बदलण्याचे प्रमाणही वाढलेले दिसते.
त्याशिवाय सदनिका घेण्यासाठी सरकारी योजनेतून कमी व्याजदरात कर्ज घ्यायचे. स्वतः सरकारी क्वार्टर्समध्ये राहायचे आणि सदनिका मोठ्या भाड्याने भाडेपट्टीवर द्यायच्या, असे उद्योगही अनेकजण करू लागले आहेत. पूर्वी कर चुकवण्यासाठी बॅॅंकेत पाच वर्षांसाठी मुदतठेव ठेवणारा कर्मचारी आता पैसे दामदुप्पट करण्यासाठी शेअर मार्केटकडेही वळू लागलेला आहे.
सरकारी नोकरी घोटाळ्यात अटक केलेल्या एका संशयिताने मडगाव न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असता, त्याच्या जामीन अर्जाला पोलिसांनी हरकत घेताना या नोकरीसाठी घेतलेले पैसे आम्हाला त्याच्याकडून वसूल करायचे आहेत, असा पवित्रा घेतला होता. त्यावर संशयिताच्या वकिलाने हे पैसे कुणाला पोहोचते केले याची माहिती आम्ही नावासकट न्यायालयात उघड करण्यास तयार आहोत. मात्र, ते नाव सांगितल्यावर त्यांना पोलिस स्थानकात बोलावून पाेलिस त्यांची चौकशी करणार का? असा सवाल केला. या वकिलाचा रोख एका मंत्र्याकडे हाेता. त्यामुळे ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याची व्याप्ती केवढी मोठी आहे याची कुणालाही कल्पना यावी.
ज्या खात्यात हा ‘कॅश फॉर जॉब’ घाेटाळा झाला असे सांगण्यात येते, त्या खात्याच्या एका माजी मंत्र्याच्या ओएसडीने हल्लीच एक दीड काेटी रुपयांची आलिशान गाडी विकत घेतल्याचे सांगितले जाते. ज्यावेळी ही नाेकरभरती सुरू झाली त्यानंतरच हा गाडी विकत घेण्याचा प्रकार झालेला आहे. त्यामुळे या दाेन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का? या चर्चेने सध्या सरकारी वर्तुळात जोर धरला आहे.
ही घटना ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याशी संबंधित नसली तरी सरकारी नाेकर अधिक पैसा कमविण्याच्या आशेने कसले कसले प्रकार करतात यावर प्रकाश टाकणारी आहे. कोकण रेल्वे पोलिस स्थानकात काम करणाऱ्या एका पोलिसाने इतर पाेलिसांकडून गुंतविलेले पैसे तीन पटीने वाढवून देतो असे सांगून पैसे घेतले होते. ही रक्कम ४० लाखांच्या आसपास असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पोलिसाने हे पैसे आणखी एका व्यक्तीकडे दिले होते. अर्थातच हे सर्व पैसे आता बुडाले आहेत. मात्र, पोलिसांनाच गंडा घातला हे कसे उघड करणार म्हणून पैसे घालवून बसलेले सर्व पाेलिस गप्प बसले असल्याची माहिती मिळाली आहे.
आपल्या आप्तांना सरकारी नोकरी मिळावी यासाठी कित्येक सरकारी नाेकरांनी लाखो रुपयांची लाच अशा कित्येक एजंटांना दिल्याचे समजते. यात काही सरकारी शिक्षक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे काही अभियंते, काही पोलिस अधिकारी यांचाही समावेश आहे. इतरांप्रमाणे त्यांचेही पैसे आता बुडाले आहेत. मात्र, हे पैसे तुमच्याकडे कसे आले याची विचारणा होऊ शकते. यासाठी हे सर्व अधिकारी मूग गिळून गप्प बसलेले आहेत.
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांपासून नोकरी मिळेल, या आशेने प्रतिक्षेत असलेल्यांनी पैसेही परत मिळण्याची शक्यता नसल्याने पोलिसांत धाव घेतली आहे. एखाद्या कामासाठी पैसे देणारा तसेच घेणारा हे दोघेही गुन्हेगार ठरतात.
मात्र, सध्या ज्यांची फसवणूक झाली आहे, ते पीडित आहेत. त्यामुळे ठकसेनांबरोबर त्यांनाही गुन्हेगार ठरवून गुन्हे दाखल केल्यास या नोकरी विक्री प्रकरणाचा पर्दाफाश होण्यास व त्याच्या मुळापर्यंत जाऊन सखोल चौकशी करण्यास अडथळे निर्माण होतील. त्यामुळे अगोदर ठकसेन व दलाल यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवून तपास करण्यात येत आहे. त्यानंतर तक्रारदारांची भूमिका तपासली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
विविध पोलिस स्थानकांत नोकरी विक्री प्रकरणांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. हा घोटाळा बराच मोठा असून त्यामध्ये अनेकजण गुंतले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही प्रकरणांमध्ये पैशांचा व्यवहार रोखीने झाला आहे. त्यामध्ये पुरावे जमा करण्यात अडचणी येत आहे. त्यामध्ये ठकसेनही पैसे घेतल्याची कबुली देत नाहीत. ज्यांनी आपल्या बँकेच्या खात्यावरून पैशांचा व्यवहार केला आहे त्याचे पुरावे मिळत असल्याने संशयितांना कबुली मान्य करण्यापासून पर्याय नाही.
काहींनी ठकसेनांचे मध्यस्थी म्हणून काम केले, त्यांच्याकडेही पीडितांनी पैसे परत करण्याचा तगादा लावल्याने तेसुद्धा वैफल्यग्रस्त झाले आहेत. पूजा नाईक, प्रीती यादव तसेच दीपश्री सावंत गावस या महिलांनी सरकारी नोकरीच्या नावाखाली गोव्यातील अनेकांना लुबाडले आहे. त्यांचा कारनामा आता लोकांसमोर आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.