Goa BJP State Minority President Urfan Mulla about Muslim Attacks
मडगाव: मागच्या काही दिवसांत गोव्यात मुस्लिमांच्या विरोधात धमक्यांची भाषा वापरली जाते आणि हल्ले केले जात आहेत, ही चिंतेची बाब आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकारात लक्ष घालून हे असले प्रकार थांबवावेत, अशी मागणी भाजप अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आणि हज समितीचे अध्यक्ष उर्फान मुल्ला यांनी केली.
रविवारी कुंकळ्ळी येथे झालेल्या मारहाणीत अबू बकर नावाचा युवक जखमी झाला असून त्याला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात कुंकळ्ळी पोलिसांनी बजरंग दलाचे विराज देसाई आणि अन्य दोघांवर गुन्हा नोंद केला आहे.
मुल्ला यांनी आपल्या समितीतील इतर पदाधिकाऱ्यांबरोबर जिल्हा इस्पितळात जाऊन त्या जखमी युवकाची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना सध्या गोव्यात मुस्लिमांच्या विरोधात जे काय होत आहे ते चुकीचे आहे. गोव्यातील मुस्लिम भाजपला जवळ येत आहेत. मात्र, असे प्रकार झाल्यास त्यांचा भाजपवरील विश्र्वास उडेल, असे ते म्हणाले.
काही राजकीय व्यक्ती धार्मिक सलोखा तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे पोस्ट व्हायरल करून राज्यामध्ये हिंदू व मुस्लिम बांधवामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या व्हायरल केलेल्या पोस्टची पोलिसांनी दखल घेऊन संबंधितांना गजाआड करण्याची मागणी आज पोलिस महासंचालक अलोक कुमार यांना भेटून करण्यात आल्याची माहिती भाजप अल्पसंख्याक कक्षाचे अध्यक्ष उर्फान मुल्ला यांनी दिली.
काही अज्ञात व्यक्तींनी जामा मशिदीच्या नावाने पोस्ट व्हायरल केला आहे. यामागे काही राजकारणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पोलिसांनी याप्रकरणी काहींना समन्स बजावून चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल झालेली आहे. राज्यात सध्या हिंदू व मुस्लिम बांधव सलोख्याने नांदत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे पोस्ट व्हायरल करून तणावाचे वातावरण तयार करण्यामागील हेतू आहे. पोलिस योग्य दिशेने तपास करत असून मुस्लिम बांधवांचा त्यांच्यावर विश्वास आहे. वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्याने मुस्लिम बांधवांमध्ये संतुलन ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुल्ला म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.