सभापती रमेश तवडकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणारा दुसऱ्या वर्षीचा रानभाजी महोत्सव कुठे होणार, यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तवडकर यांनी यंदाचा महोत्सव राज्य स्तरावर आयोजित करण्याचा संकल्प केला आहे. या रानभाजी महोत्सवाचे आयोजन काणकोणमधील नव्याने उभारण्यात येणाऱ्या रवींद्र भवनात करण्यावर सभापती तवडकर ठाम आहेत, मात्र २४ ऑगस्टपर्यंत त्या रवींद्र भवनाचे उद्घाटन होईल का, याबाबत सर्वांच्याच मनात शंका आहे. मात्र, तवडकर त्याबाबतीत सकारात्मक आहेत. आजपर्यंत मनात आणले ते करून दाखवण्याची धमक सभापती तवडकर यांच्याकडे आहे, हा आजपर्यंतचा इतिहास आहे, असे त्यांचे कार्यकर्ते बोलतात. मात्र, रवींद्र भवन हवे असल्यास कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडेंचे सहकार्यही लागेलच ना, आता यांच्या मनात काय आहे, हे देवालाच माहीत. त्यामुळे रानभाजी महोत्सव कुठे होणार, हा प्रश्न चर्चेला बनलाय एवढं मात्र निश्चित. ∙∙∙
‘लेकी बोले सुने लागे‘ अशी म्हण आहे... त्याचा प्रत्यय सध्या अमलपदार्थावर मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी व्यक्त केलेल्या विधानानंतर दिसून आला. सिक्वेरा यांनी अंमलीपदार्थाविषयी मत व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना त्यावर स्पष्टीकरण देत सरकारची बाजू सावरावी लागली होती. त्यानंतर सिक्वेरा यांनीही आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार शांत होतोय तोच २० लाखांचे कोकेन गोव्यात विकण्यासाठी आलेल्या युगांडाच्या दोन विद्यार्थ्यांना पकडले गेले. त्यामुळे सिक्वेरा बोलले त्यात गैर काही नाही, असे म्हणावे लागेल,अशी गत झाली. मागील काही वर्षांत अंमलीपदार्थ ग्रामीण भागातही मिळत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत, याची आठवण येथे करून देणे उचित वाटते. सर्वत्र अंमलीपदार्थांचा सुळसुळाट नक्कीच असेल, तर त्याला गोवा अपवाद कसा असेल, नाही का?∙∙∙
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना नुकताच बाऊन्सरच्या धमकीचा अनुभव घ्यावा लागला. वागातोर येथे आलेल्या मित्राकडे जाताना एका क्लबसमोरून गाडी नेत असताना तेथील बाऊन्सरनी त्यांना धमकावल्याची घटना घडली. बाऊन्सरला कोठे माहीत की, हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून. त्यानेही हा कोणीतरी स्थानिक आहे, म्हणून त्यांना धमकावले. महत्त्वाची बाब म्हणजे पाटकरांनी तत्काळ तेथून हणजूण पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांना ही बाब सांगितली. परंतु तेथील पोलिस निरीक्षकांनी म्हणे पाटकरांना पोलिस स्थानकात येऊन तक्रार देण्याची सूचना केली. काही झाले तरी हणजूण पोलिस स्थानक सध्या चर्चेत आहे, आणि आसगावच्या प्रकरणानंतर बाऊन्सरही चर्चेत आले आहेत. पाटकरांनाही बाऊन्सरने धमकावल्याचे प्रकरण आता काँग्रेस किती गांभीर्याने घेतेय, हे पहावे लागेल. ∙∙∙
पूर्वी आमदार होण्यात अभिमान वाटत असे. कुणीही आमदार म्हणून संबोधले तर गर्वाने छाती फुलून येत असे. आता परिस्थिती बदलली आहे. आमदारांचा दर्जा खालावला आहे. आमदारांची सध्याची वृत्ती पाहता कुणीही आमदार सोडा, माजी आमदार, असे संबोधले तरी भीती वाटते, असे १९८४ ते १९८९ या कालावधीत मडगावचे आमदार असलेले ॲड. उदय भेंब्रे यांनी एका कार्यक्रमात सांगितले. तसे पाहायला गेल्यास ही गोष्ट बरोबरही आहे, असे आता लोक बोलू लागलेत. काही लोकप्रतिनिधी आपले चारित्र्य, तत्वनिष्ठा घालवून बसलेत, हे खरंय नाही का?∙∙∙
लक्ष्मीकांत भेंब्रे हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी पोर्तुगीज राजवटीत गोवा मुक्तीसाठी मोठा लढा दिला होता. त्यांना कित्येक वर्षे कारावास भोगावा लागला होता. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी त्यांचे अनेक अनुयायी होते. त्यात लक्ष्मीदास बोरकर हेही होते. ॲड. उदय भेंब्रे यांनी एका कार्यक्रमात सांगितले, की एकदा सरकारी नोंदीत स्वातंत्र्यसैनिकांची नावे शोधताना त्यांना आपल्या वडिलांचे नाव आढळले नाही. त्यांनी सांगितले की, सरकारकडे स्वातंत्र्य सैनिकांच्या नावांची नोंद आहे, त्यातील सर्वच स्वातंत्र्यसैनिक होतेच, असे नाही. काही तस्करांनीही आपण स्वातंत्र्यसैनिक असल्याची नोंद करून घेतली आहे, असे भेंब्रे यांनी सांगितले. त्याचसाठी कुठल्याही घटना इतिहास जमा होण्यापूर्वी त्याची योग्य नोंद होणे गरजेचे व महत्वाचे असते नाही तर तो इतिहास वेगळेच वळण घेत असतो. त्यात चुकीची माहिती दिली जाण्याची शक्यता जास्त असते, असेही भेंब्रे सांगतात. मात्र त्यांनी स्वातंत्र्यसैनिक म्हणून नोंद झालेले नेमके तस्कर कोण हे मात्र स्पष्ट केले नाही. त्यामुळे उपस्थितांत हे तस्कर कोण, याचा मनोमन शोध सुरू झाला. ∙∙∙
खाजन शेती जमीन सध्या ज्वलंत विषय बनला असून सरकारकडून आश्वासने दिली जात आहेत, परंतु लोकांना यावर विश्वास राहिलेला नाही. २०१२ पासून भाजपचे सरकार सत्तेत असूनही खाजन शेती जमिनींची स्थिती बिकट झाली. मानशीच्या ठेकेदारांनी दादागिरी, टेनंट संघटनेंचा वाद आणि महसूल खात्याची अकार्यक्षमता, अशी कारणे या स्थितीला दिसतात. पारंपरिक शेतकरी असलेल्या कुटुंबांना मानस ठेकेदार होऊ दिले जात होते, मात्र तिसवाडीत परप्रांतीय मानस ठेकेदार होऊन बसले आहेत. मुख्य म्हणजे हेच कायद्याचे उल्लंघन करून मानशीची दारे काढून अतिरिक्त पाणी आत घेऊन खाजन शेतजमीन बुडवतात. या परप्रांतीयांना स्थानिक आमदार आणि पोलिसांचे वरदहस्त लाभल्यामुळे खुले आम कायदे तोडण्यापर्यंत त्यांची मजल पोहोचल्याची चर्चा सुरू झालीय.∙∙∙
दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी भोम गावाला भेट देऊन तेथील रस्त्याचा विषय जाणून घेतला. हा विषय आपण केंद्रीय मंत्री नीतिन गडकरी यांच्याकडे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी एक चांगले व्यक्तिमत्त्व असून सह्रदयी माणूस आहेत. लोकांच्या भावनांची त्यांना कदर आहे, अशा शब्दांत कॅप्टनसाहेबांनी गडकरी साहेबांची तारीफ केली. आता कॅप्टनसाहेब जे काही बोलले त्यात गैर असे काहीच नाही. भाजपच्या इतर नेत्यांपेक्षा गडकरी साहेब हे वेगळेच आहेत. काही लोक मात्र म्हणतील कॅप्टन विरियातो काँग्रेसचे आणि त्यांनी भाजपाचे नेते गडकरी साहेबांची स्तुती केली, तर आणखी भलताच अर्थ लावतील. बरोबर ना...!∙∙∙
पावसाळ्यात रस्त्यावर अनेक रस्त्यांवर खड्डे पडले तसेच झालेल्या खोदकामावेळी अनेक खड्ड्यांमध्ये मातीचा भराव टाकून ते बुजवण्यात आले. आता तर त्यावर सिमेंट काँक्रिट घालून बुजवले जात आहेत व त्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारले गेले आहेत. त्यामुळे लोकांना कसरत करत रस्त्यावरून जावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी हल्लीच सर्व रस्त्यावरील खड्ड्यांची तपासणी केली जाईल तसेच गणेश चतुर्थीपूर्वी हे खड्डे बुजवले जातील, अशी घोषणा केली होती. मात्र, खड्डे बुजविताना पुन्हा भ्रष्टाचार सुरू आहे. हे खड्डे बुजवताना त्या ठिकाणी कंत्राटदार किंवा संबंधित अभियंताही तिथे उपस्थित नसतो. काही मजूर सिमेंट काँक्रिटचा थर या खड्ड्यांमध्ये ओततात. तेथे बॅरिकेड्स उभारले जातात. वाहन चालक या ओल्या सिमेंट काँक्रिटमधूनच वाहने घेऊन जातात, त्यामुळे तेथे पुन्हा खडबडीतपणा येतो. त्यावरून दुचाकी वाहने घेऊन जाणे जिकरीचे होते. सरकारच्या भीतीने कंत्राटदारांनी हे खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे, मात्र कामाचा दर्जा अगदीच सुमार होत आहे. कंत्राटदाराला नोटिसा बजावल्या गेल्याने त्यांचीही घाबरगुंडी उडाली आहे.∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.