मोरजी : गवंडीवाडा-तांबोसे हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाल्याने तेथील नागरिकांना तसेच वाहनचालकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. शालेय मुलांना तर चिखलातून जावे लागते. गावात जाणाऱ्या भुयारीमार्गाचे काम अजूनही झालेले नाही. गणपती विसर्जनाची वाट चिखलमय व निसरडी झालेली आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी ताबडतोब पावले उचलावीत, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा तांबोसेवासीयांनी दिला आहे.
पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ वर तांबोसे येथे जो उड्डाणपूल उभारला आहे, त्यावर मधोमध खड्डे पडल्याने वाहनचालकांचा विशेषत: दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात आला आहे. शिवाय सर्व्हिस रोडचे तर तीन-तेरा वाजले आहेत. याकडे सरकारने लक्ष देऊन गणेश चतुर्थीपूर्वी हे रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांत ठिकठिकाणी चिखलाचे पाणी भरले त्यातूनच शाळकरी मुलांना ये-जा करावी लागते. त्यामुळे त्यांना बराच त्रास होत आहे.
सदर राष्ट्रीय महामार्गाचे काम एमव्हीआर या कंपनीने केले आहे. ही कंपनी आणि हा कंत्राटदार ‘सरकारी जावई’ असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्ते तयार करताना आणि रस्त्यांचे रुंदीकरण करताना निकृष्ट दर्जाचे काम कसे करावे, याचे हे एक चांगले उदाहरण आहे. परंतु सरकारने अजूनही याची दखल घेतलेली नाही. या कंत्राटदारावर का कारवाई होत नाही? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ हा पूर्णत: धोकादायक स्थितीत आहे. पावसाळ्यात तर या महामार्गावरून जाणे म्हणजे आपला जीव धोक्यात घालण्यासारखेच आहे. ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. संरक्षक भिंतीही कोसळल्या असून रस्ते खचण्याचे प्रकारही घडत आहेत. ज्या ठिकाणी उड्डाणपूल उभारले, तेथील स्थिती काय आहे, हे पाहण्याची साधी तसदीही कंत्राटदाराने घेतलेली नाही. गावात जाणारे सर्व्हिस रोड अगोदर दुरुस्त करावेत, अशी मागणी स्थानिकांनी सरकारकडे केली होती. परंतु अजूनपर्यंत दखल घेण्यात आलेली नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.
रस्ता करणाऱ्या एमव्हीआर कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे स्थानिक व वाहनचालकांना विनाकारण मन:स्ताप सहन करावा लागत आहे. तांबोसे उड्डाणपुलाच्या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि सर्व्हिस रोडची झालेली दैना याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. अन्यथा हे रस्ते आणखी बळी घेण्यासाठी टपलेलेच आहेत.
उदय महाले, तांबोसे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.