Murgao Fort: मुरगाव बंदर प्राधिकरणाने (एमपीए) शिवकालीन मुरगाव किल्ल्यावर जाण्यासाठी पूर्वीचा रस्ता खुला करण्याचा आदेश पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिला. तसेच राज्यातील सर्व किल्ले राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाअंतर्गत येत असल्याने, किल्ल्यांवरील अतिक्रमणे करणे थांबवा, ती खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्यासह मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज मुरगाव किल्ल्याची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राज्य पुरातत्व संचालक वरद सबनीस, संवर्धन प्रभारी सुमेश महाले, एमपीएचे जनसंपर्क अधिकारी वेनकंटी कोलार, उपजिल्हाधिकारी भगवंत करमली,
मुरगाव तालुका पोलिस उपअधीक्षक शेख सलीम, मुरगाव पोलिस निरीक्षक एलविटो रॉड्रिगीस, नगरसेविका श्रद्धा आमोणकर, श्रद्धा महाले, माजी नगराध्यक्ष मनेष आरोलकर, रमाकांत खडपकर व नागरिक उपस्थित होते.
मुरगाव बंदर प्राधिकरणाने हेरिटेज किल्ला परिसरात अतिक्रमण केले असून तेथे स्थानिकांना प्रवेश नाकारला जात आहे. पुरातत्व विभागाची मालमत्ता असलेल्या किल्ल्यांचा जीर्णोद्धार, जतन आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
एमपीएच्या सुरक्षेचा भंग न करता किल्ल्यावर जाण्यासाठी समतोल मार्ग शोधण्याकरिता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.
मुरगावचे संकल्प आमोणकर म्हणाले की, किल्ल्याचा जीर्णोद्धार करून त्यांना तेथे प्रवेश मिळावा ही स्थानिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यामुळे हा प्रश्न विधानसभेत मांडला होता.
९ किलोमीटरच्या त्रिज्येसह अरबी समुद्रात दिसणारा हा किल्ला अद्वितीय आणि सुंदर आहे. या किल्ल्याचा सोयीसुविधांसह जीर्णोद्धार करण्याचे आश्वासन मंत्री फळदेसाई यांनी दिल्याबद्दल आमोणकर यांनी त्यांचे आभार मानले.
दरम्यान, यावेळी येथे नेमण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांनीही आपल्या समस्या मंत्री फळदेसाई यांच्यासमोर मांडल्या. त्या सोडविण्याची ग्वाही फळदेसाई यांनी दिली.
व्हाईस रिगल पॅलेसलाही दिली भेट
किल्ल्याला भेट दिल्यानंतर मंत्री सुभाष फळदेसाई आणि आमदार संकल्प आमोणकर यांनी एमपीए परिसरात व्हाईस रिगल पॅलेसला भेट दिली. फळदेसाई म्हणाले की, हेरिटेज व्हाईस रिगल पॅलेस ४०० वर्षांपूर्वी १७०५ मध्ये बांधला होता.
परंतु एमपीएने ताब्यात घेतल्यावर कोणत्याही देखभालीशिवाय ही वास्तू अत्यंत वाईट अवस्थेत आहे. एमपीएला विश्वासात घेऊन जुने वैभव पुनर्संचित करण्याची गरज आहे. तसेच भविष्यातील पिढ्यांपर्यंत गोव्याचा इतिहास पुढे नेण्यासाठी लोकांसाठी साईट खुली करू.
मुरगाव बंदर प्राधिकरणाने शिवकालीन किल्यावर जाण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध करून द्यावा. कारण पूर्वी किल्ल्यावर जाण्यासाठी रुंद रस्ता होता. पण एमपीएने तो बंद करून किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट तेवढी शिल्लक ठेवली आहे.
सुभाष फळदेसाई, पुरातत्व खात्याचे मंत्री
मंत्री सुभाष फळदेसाई हे व्हाईस रिगल पॅलेसच्या जागेला भेट देणारे पहिले मंत्री आहेत. मुरगावातील वारसास्थळांचे जतन केले पाहिजे. भावी पिढ्यांना गोव्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती होण्यासाठी जुना वारसा जपण्याची गरज आहे.
संकल्प आमोणकर, मुरगावचे आमदार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.