पणजीहून मडगावला जाणाऱ्या रस्त्यावर आगशी नावाचं गाव आहे. झुआरी नदीच्या काठावर वसलेल्या या गावात, अगदी झुआरी नदीच्या काठावर अँथनी रॉड्रिगीस राहतो. याच भागात त्यांचं 'सरिना बार आणि रेस्टोरंट' आहे. इतके दिवस अँथनीची ओळख सरिना बारचे चालक-मालक अशी होती पण गेल्या काही वर्षांपासून ती ओळख पुसली जाऊन आता त्याच्या नावापुढे 'स्टार मॅन' अशी उपाधी लागली आहे.
झुआरी पूल सुरु होताना डाव्या हाताला हा सरिना बार दिसतो. एरवी या बारकडे फारसं लक्ष जात नाही. आपण मडगावच्या दिशेनं प्रवासात आपल्याच विचारात असतो. पण डिसेंबर महिना आला कि आपोआपच आपले लक्ष त्या दिशेला जातं. एरवी शांतता असणाऱ्या सरिना बारच्या समोरच्या गल्लीत एक प्रकारची धावपळ सुरु असलेली दिसते.
धावपळ करणारा अँथनी नजरेस पडतो. शिडीवर उभं राहून 'नक्षत्र' (चांदणीच्या आकाराचा आकाशकंदील जो ख्रिसमसच्या काळात दारात लावला जातो) लावण्याच्या कामात गुंगून गेलेला असतो. दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने तो सरिना बारची गल्ली नक्षत्रांनी सजवून टाकतो. एक आणि दोन नव्हे तर शेकडो नक्षत्रं तो यानिमित्ताने लावतो आणि ही सगळी नक्षत्रं अँथनीने स्वतः हाताने बनवलेली असतात.
गेल्या वर्षी अँथनीने लावलेली नक्षत्रं बघून मी मुद्दाम तिथे थांबले. तो संपूर्ण भाग चमकत्या नक्षत्रांनी व्यापून गेला होता. आजूबाजूला अनेकजण नक्षत्रांबरोबर सेल्फी, फोटो, व्हिडीओ काढत होते. अँथनी तिथेच होता मग अर्थातच त्याच्याशी गप्पा झाल्या. सतरा वर्षांपूर्वी पहिल्यांदा अँथनीने बाजारातून नक्षत्रं विकत आणून लावली आणि त्यावर्षी नेमका जोरदार पाऊस झाला. सगळी नक्षत्रं पावसात भिजून खराब झाली. ही गोष्ट त्याच्या मनाला लागली. पुढच्या वर्षी त्याने स्वतःच नक्षत्रं बनवायला घेतली.
बांबूपासून ढाचा बनवून, त्याला विविध रंगाचे कागद लावून स्वतःच्या हाताने त्याने 100 नक्षत्रं तयार केली आणि सरिना बारच्या गल्लीत लावली. ख्रिसमसच्या काळात तो उजळलेला परिसर बघायला लोकांची गर्दी झाली. अँथनीने अपेक्षा केली नव्हती इतके लोक त्याची ही नक्षत्रांची आरास बघायला येऊन गेले. त्यानंतर, दरवर्षी नक्षत्रांची संख्या वाढत गेली. दरवर्षी 15 ऑगस्ट या दिवशी तो नक्षत्रे बनवायला सुरुवात करतो.
15 डिसेंबरपर्यंत त्याचे हे काम चालत राहते. यावर्षी अँथनी आणि त्याची पत्नी सुकोरीन यांनी मिळून सुमारे 700 नक्षत्रं बनवली आहेत. त्या नक्षत्रांनी हा सगळा परिसर किती सुंदर बनला असेल याची कल्पना करू शकता.
चमकणारी ही नक्षत्रे बघताना आपणदेखील वेगळ्याच जगात जातो. पण मला मात्र त्यावेळी सरिना बारचा विचार सतावत होता. अँथनी शेजारीच होता. त्याला विचारलं, ख्रिसमसपासून पुढे दहा दिवस या गल्लीत नक्षत्रं बघायला लोक प्रचंड गर्दी करतात. तुम्ही स्वतः त्यांच्यासोबत व्यस्त असता, मग या काळात सरिना बारचं काय? तिथं चांगली 'फिश थाळी' मिळते. याकाळात सरिना बारकडे कोण लक्षं देतं? यावर त्याचं उत्तर होतं - 'याकाळात आम्ही बार बंद ठेवतो.
ख्रिसमस म्हणून आम्हीदेखील सुट्टी घेतो आणि नक्षत्रं बघायला येणाऱ्या लोकांसाठी वेळ द्यावा लागतो.' त्याचं हे उत्तर ऐकून आश्चर्य वाटलं. हा कसला अवलिया माणूस आहे! याकाळात गोव्यात पर्यटक भरपूर असतात. बार अगदी मुख्य रस्त्याच्या लगत आहे. याचा फायदा करून घ्यायचा की बार बंद ठेवायचा! ही नक्षत्र तयार करण्यासाठी तो आपल्याच खिशातले पैसे वापरतो. खिशातले पैसे खर्च करून, व्यवसाय बंद ठेवून, लोकांना आनंद देणारा हा माणूस आहे.
अँथनीने बनवलेली नक्षत्रं बघण्यासाठी सध्या गोव्याच्या कानाकोपऱ्यातून लोक गर्दी करत आहेत. यावर्षी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील ही नक्षत्रआरास बघायला मुद्दाम गेले होते. अँथनी हा खरंच 'स्टार मॅन' आहे. हा स्टार मॅन या दिवसात, म्हणजे 25 डिसेंबरपासून पुढे नवीन वर्ष सुरु होईपर्यंत एखाद्या चमकत्या ताऱ्याप्रमाणे चमकत असतो. ही चमक त्याच्या डोळ्यात बघायला मिळते. या दिवसात तुम्ही पणजी ते मडगाव असा प्रवास करत असाल तर मुद्दाम आगशी गावात झुआरी पुलाच्या अलीकडे अँथनीच्या सरिना बारजवळ थांबा. याकाळात त्याच्या त्या गल्लीत नक्षत्रांच्या रूपाने आकाशगंगा अवतरलेली असते.
-मनस्विनी प्रभुणे नायक
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.