AAF Partners with Sanquelim Municipality to Resolve Stray Dog Issue
साखळी: साखळी नगरपालिका परिसरात वाढणाऱ्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी साखळी नगरपालिकेने (सेसा वेदान्ताच्या) अनिल अगरवाल फाऊंडेशनशी (एएएफ) सामंजस्य करार केला आहे.
फाऊंडेशनच्या ‘टाको’ या उपक्रमांतर्गत श्वानांची नसबंदी तसेच मांजरांच्याही शस्त्रक्रिया केल्या जातील. साखळी नगरपालिकेतर्फे २ हजार चौ.मी. जागा ‘एएएफ’ला देण्यात येणार आहे. या जागेत ‘एएएफ’तर्फे श्वानांची संख्या नियंत्रण, हॉस्पिटल व मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
पर्वरी येथे मंत्रालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी ‘एएएफ’च्या प्रमुख प्रिया अगरवाल, साखळीच्या नगराध्यक्ष सिद्ध प्रभू पोरोब, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, नगरसेवक दयानंद बोर्येकर, यशवंत माडकर, ब्रह्मानंद देसाई, दीपा जल्मी, अंजना कामत, पालिका कनिष्ठ अभियंता सुभाष म्हाळशेकर, वेदान्ताचे सीईओ नवीन जाजू, अधिकारी मिलिंद बर्वे, लीना वेरेकर व इतरांची उपस्थिती होती.
यावेळी ‘एएएफ’च्या वतीने प्रिया अगरवाल यांनी तर साखळी पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
श्वानांच्या वाढणाऱ्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी असा करार इतरही पालिकांनीही करून आपल्या भागातील कोमुनिदाद, पालिका किंवा देवस्थानांच्या जमिनी वापरात आणाव्यात. जेणेकरून भटक्या जनावरांपासून होणारा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरेल. यातून लोकांचे जीवनही सुरक्षित होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.
समाजिक क्षेत्रात काम करताना लोकांना चांगले ते देण्याचा प्रयत्न अनिल अगरवाल फाऊंडेशनने केला आहे. पर्यावरणीय संवेदनशीलताही राखण्यासाठी फाऊंडेशन तत्पर असते. अशाच प्रकारे गोव्यात व साखळीत कार्य करण्याची संधी मिळाली असून त्यातून लोकांसाठी उपयुक्त सेवा देणार, असे ‘एएएफ’च्या प्रमुख प्रिया अगरवाल यांनी सांगितले.
साखळी पालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणासाठी पालिकेने ‘एएएफ’च्या प्रिया अगरवाल यांच्याकडे प्रस्ताव मांडला होता. त्यास त्यांनी लगेच होकार देत हा प्रकल्प करण्यासाठी पुढाकार घेतला. या प्रक्रियेत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचेही मोठे सहकार्य लाभले. असा सामंजस्य करार करणारी साखळी ही राज्यातील पहिली पालिका ठरली आहे.
सिद्ध प्रभू, नगराध्यक्ष, साखळी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.