Ranji Trophy: प्रियांकच्या दीडशतकाने गुजरातला बळ; सलामी फलंदाजाची गोव्याविरुद्ध प्रेक्षणीय नाबाद खेळी

संकटात सापडलेल्या गुजरातला बळ प्राप्त झाले आणि आता रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात गोव्यावर आघाडी घेण्याची संधी आहे.
Ranji Trophy
Ranji Trophy

Ranji Trophy

गुजरातचा फलंदाजीतील अनुभवी आधारस्तंभ प्रियांक पांचाळ याने शनिवारी पर्वरी येथील मैदानावर प्रेक्षणीय नाबाद दीडशतकी खेळी केली. त्यामुळे संकटात सापडलेल्या गुजरातला बळ प्राप्त झाले आणि आता रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात गोव्यावर आघाडी घेण्याची संधी आहे.

भारत अ संघातून खेळलेल्या आणि शैलीदार फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ३३ वर्षीय प्रियांकने रणजी स्पर्धेतील यंदाचे पहिले शतक हेरंब परबला कव्हर ड्राईव्हचा खणखणीत चौकार लगावत पूर्ण केले. त्याचे हे १२०व्या प्रथम श्रेणी सामन्यातील २७वे शतक ठरले.

दिवसअखेर तो १५० धावांवर खेळत होता. त्याने ३७६ मिनिटांत २४७ चेंडूंतील खेळीत १५ चौकार व ४ षटकार मारले. प्रियांकने मोहित रेडकरला लगावलेला उत्तुंग षटकार जीसीए प्रशासकीय इमारतीवरून बाजूच्या रस्त्यावर गेला. त्याने रवी बिष्णोई (नाबाद ३०) याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी ६७ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे.

त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर गुजरातने पहिल्या डावात ५ बाद २८१ धावा केल्या. ते अजून ३६ धावांनी मागे आहेत. गोव्याने पहिल्या डावात कालच्या ९ बाद ३०९ वरून शनिवारी सकाळी सर्वबाद ३१७ धावा केल्या.

निर्णायक शतकी भागीदारी

टाळण्याजोग्या चुका केल्यामुळे गुजरातचे आदित्य पटेल व सनप्रीत बग्गा धावबाद झाले, त्यामुळे गोव्याची बाजू वरचढ झाली. हेत पटेल याने लक्षय गर्गच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक सिद्धार्थच्या हाती झेल दिल्यामुळे उपाहारापूर्वी गुजरातची ३ बाद ७५ अशी बिकट स्थिती झाली. उपाहाराअगोदर अखेरच्या षटकात प्रियांक धावबाद होण्यापासून थोडक्यात बचावला.

नंतर मात्र गोव्याचे गोलंदाज वर्चस्व राखणार नाहीत याची दक्षता घेताना प्रियांकने धावफलक हलता ठेवला. त्याने उमंग कुमार (३७) याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी केलेली १०९ धावांची भागीदारी गुजरातसाठी निर्णायक ठरली.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ३१७

गुजरात, पहिला डाव ः

७९ षटकांत ५ बाद २८१ (प्रियांक पांचाळ नाबाद १५०, आदित्य पटेल १३, सनप्रीत बग्गा ०, हेत पटेल १८, उमंग कुमार ३७, मनन हिंग्राजिया १७, रवी बिष्णोई नाबाद ३०, लक्षय गर्ग ९.१-१-४२-१, अर्जुन तेंडुलकर १२-२-२५-०, दीपराज गावकर १२-१-४२-०, हेरंब परब १७.५-३-६०-०, दर्शन मिसाळ १९-३-६७-१, मोहित रेडकर ९-०-३५-१).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com