Ravindra Bhavan Margao: रवींद्र भवन, मडगावला सर्वाधिक महसूल देणाऱ्या तियात्र कलाकारांवर अन्याय करण्याचा भाजप सरकारला अधिकार नाही.
नोव्हेंबरमध्ये पाय तियात्रीस्त सभागृहाच्या अनुपलब्धतेने तियात्र कलाकारांना होणाऱ्या गैरसोयीवर तसेच त्यांना सोसाव्या लागणाऱ्या नुकसानाची भरपाई द्यावी. यासाठी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
रवींद्र भवन, मडगावने आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कारण देत नोव्हेंबरमध्ये तियात्र सादरीकरणासाठी पाय तियात्रीस्त सभागृह न देण्याच्या निर्णयावर युरी आलेमाव यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, गोव्यातील तियात्र कलाकारांना भाजप सरकार सापत्न वागणूक देत असल्याचा गंभीर आरोप केला.
कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी रवींद्र भवनच्या अधिकाऱ्यांना एकतर सभागृहाच्या दुरुस्ती कामाचे वेळापत्रक बदलण्याचे निर्देश द्यावेत किंवा सभागृह उपलब्ध नसल्यामुळे तियात्र कलाकारांचे नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक सहाय्य देऊन तियात्रीस्ताना भरपाई द्यावी, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.
तियात्र प्रयोगातून रवींद्र भवन, मडगावला जास्तीत जास्त महसूल मिळतो त्यामुळे तियात्र सादरीकरणाला नेहमीच प्राधान्य मिळणे महत्वाचे आहे. आजवरअनेक लोक तियात्र व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करतात. रवींद्र भवन, मडगाव ऐन हंगामात तियात्र कलाकारांचा तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कारण देत नोव्हेंबरमध्ये दुरुस्तीच्या काम हाती घेण्याच्या निर्णयाने रवींद्र भवनचे प्रशासन पूर्ण कोलमडल्याचे स्पष्ट होत आहे. दुरुस्तीचे काम करण्यासाठी रवींद्र भवनचे प्रशासन इतके महिने झोपले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाजप सरकारने देशी महोत्सवासारखा दर्जा केला आहे. आता तियात्रसारख्या लोकप्रिय कलाप्रकाराला धक्का पोहोचवण्याच्या व अपशकून करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना गोमंतकीयांकडून तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.