Ponda Water Supply: फोंड्यासह परिसरात गढूळ पाणीपुरवठा

खनिज मालामुळे नदीत प्रदूषण : ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पातील फिल्टर्स होताहेत नादुरूस्त
Ponda Water Supply
Ponda Water SupplyDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda Water Supply : फोंडा व तिसवाडी तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या ओपा जल प्रकल्पाला गढूळ पाण्याचा फटका बसला असून जोरदार पावसामुळे दूधसागर नदी किनारी असलेल्या खाण कंपन्यांच्या खनिज मालाचा प्रादूर्भाव नदीत झाल्यामुळे ओपा जल प्रकल्पातील फिल्टर्स व्यवस्थित चालत नसल्याने सध्या गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी फोंडा व इतर भागातील नागरिकांनी केल्या आहेत.

कालपासून ओपा जल प्रकल्पातील पाणी जास्तच गढूळ झाले असून पाणी पुरवठा खाते आपल्यापरीने पाणी फिल्टर करून पुरवठा करीत आहे, मात्र गढूळ पाण्यामुळे साथीच्या रोगाची भीती नागरिकांच्या मनातून गेलेली नाही.

ओपा जल प्रकल्पात काल ४०० एनटीयू म्हणजेच नेफेलोमेट्रिक टर्बिडिटी युनिट नोंद झाली आहे. त्यामुळेच प्रकल्पातील फिल्टर्सवर परिणाम होत असल्याने गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे समजते.

कुळे ते खांडेपारपर्यंतच्या नदी किनारी असलेल्या टाकाऊ व इतर खनिज मालाच्या साठ्यामुळे हा प्रकार होत असल्याचे स्पष्ट झाले असले तरी कर्नाटकातून येणाऱ्या पावसाच्या लोटात डोंगर कपारीतील मातीही नदीच्या पाण्यात मिसळत असल्याने असा प्रकार होत असल्याचे समजते.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निवृत्ती पार्सेकर यांनी परिस्थिती नियंत्रणाखाली असून खाण कंपन्यांच्या खनिज मालाच्या प्रादूर्भावामुळे अशी परिस्थिती उद्भवते, असे सांगून सध्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचे नमूद केले.

Ponda Water Supply
Goa Monsoon 2023: आडपई, कासवाड्यात अद्यापही पडझड सुरूच, सत्तरीत लाखोंची हानी

सर्वांत जास्त ‘टर्बिडिटी‘ २०२१ मध्ये

ओपा जल प्रकल्पात सर्वांत जास्त ‘टर्बिडिटी’ असलेले (गढूळ पाणी) गेल्या ७ ऑक्टोबर २०२१ मध्ये नोंद झाली आहे. त्यावेळेला ५३० एनटीयूची नोंद करण्यात आली होती. गेल्या वर्षी २ ऑगस्टला २१० एनटीयू तर काल रविवारी ही नोंद ४०० एनटीयू एवढी झाली आहे.

ओपा जल प्रकल्पाच्या परिघातील खाण कंपन्यांच्या ‘मायनिंग पीट''मधील खनिज मालाचा प्रादूर्भाव होत असल्याने अशा कंपन्यांवर आधी कारवाई करायला हवी. मागच्या काळात ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती.

संदीप पारकर (आरटीआय कार्यकर्ता, खांडेपार)

काल रात्रीपासून नळांना गढूळ पाणी येत होते, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे वांदे झाले. पावसाळ्यात ही परिस्थिती कायम असते. आता पाणी काही प्रमाणात स्वच्छ झाले आहे.

वनिता नीतिन वळवईकर (गृहिणी, कुर्टी - फोंडा)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com