फोंडा गेले पंधरा दिवस कोसळत असलेल्या धुवांधार पावसामुळे फोंडा तालुक्यातील शेतीची नासाडी झाली असून केवळ शेतीच नव्हे तर भाजीपिकालाही मोठा फटका बसला आहे. अजूनही शेती पाण्याखाली आहे, त्यामुळे नेमके नुकसान किती हे कळणे मुश्किल ठरले आहे.
फोंड्यातील शेतकरी आणि बागायतदारांना हा निसर्गाचा कोप असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही, एवढे हे नुकसान असून फोंडा कृषी कार्यालयातर्फे हानीची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे.
दोनच दिवसांपूर्वी पावसाने काहिशी उसंत घेतली आहे, पण अजूनही नेमका नुकसानाची आकडा समजू शकला नाही. जोरदार वाऱ्यामुळे बागायतींमधील सुपारी गळून पडली आहे. याशिवाय काकड्या, दोडकी, कारली तसेच भेंडीचीही मोठी हानी झाली आहे. मेमध्ये टँकरद्वारे पिकाला पाणी दिले जाते, पण आता हे पीक कुजल्याने बागायतदार हवालदिल आहेत.
फोंड्यात ३८५३ कृषी कार्डे
फोंडा कृषी कार्यालयाशी निगडित शेतकऱ्यांच्या कृषी कार्डचा आकडा ३८५३ वर पोचला आहे. ज्यांची कृषी कार्ड नाहीत, त्यांनीही हानीची माहिती कृषी खात्याला द्यावी.
जोरदार पावसामुळे ऐन बहरात येऊ पाहत असलेले पीक नष्ट झाले आहे. काकड्या, दोडक्यांच्या वेली कुजल्या आहेत, त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
- रमेश गावडे (प्रियोळ)
पावसाच्या कहरामुळे आमची रोजीरोटीच हरवली आहे. मेपासून लागवड सुरू केली जाते, पण आता ऐन पिकाचा मोसम खराब गेला आहे.
- सूर्यकांत गावडे (कोने - प्रियोळ)
सरकारने शेतकरी व बागायतदारांना दिलासा देण्यासाठी कार्यवाही सुरू केली ही चांगली गोष्ट आहे, पण उभे पीकच नष्ट झाल्यामुळे आम्हाला मोठे नुकसान झाले आहे.
- पांडुरंग खेडेकर (कोने - प्रियोळ)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.