सासष्टी: शिरवडे येथे एका गोमंतकीय कुटुंबाची मोठी जमीन असून त्या जमिनीत काहींनी अतिक्रमण केले आहे. जमीन मालकीणीस या जागेत संरक्षण कुंपण उभारण्यास अतिक्रमण केलेले लोक विरोध करीत आहेत. यात स्थानिक लोकप्रतिनिधींचा हात असल्याचा दावा दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीत कॅप्टन झीरो अवर या लोकसंपर्क कार्यक्रमानंतर विरियातो पत्रकारांशी बोलत होते. फर्नांडिस यांनी पुढे सांगितले की, याबाबत त्या मालकिणीने जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पोलिस संरक्षण दिले आहे. परंतु अतिक्रमण केलेल्या व्यक्ती स्थानिक लोकप्रतिनिधींच्या संपर्कात असून लोकप्रतिनिधीमार्फत जमीन मालकीणीवर दबाव आणत आहेत. यात या लोकप्रतिनिधींचाही हात असल्याचा दावा विरियातो यांनी केला. हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत नेले जाईल, असेही ते म्हणाले.
कॅप्टन झीरो अवरमध्ये काही निवृत्त सैनिकांनी आपल्या समस्या मांडल्या. गोव्यात योग्य ती सेवा व सुविधा मिळत नसल्याची त्यांची तक्रार होती. याबाबत आपण विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांच्याशी बोलून त्यांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न
करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही अंध व्यक्तींनीही आपली भेट घेतली, त्यांच्या समस्या सोडविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
चिंचोणे येथील राष्ट्रीय महामार्गावरील बगल रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे बोललो आहे. योग्य तो पर्याय शोधण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.