Smart City : पणजीवासीयांनी आता होड्या घ्याव्यात का; धास्ती पावसाची

Smart City : दक्षता आयोगाकडे सर्वात प्रथम इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे तत्कालीन सीईओ स्वयंदिप्तापाल चौधरी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार झाली. त्यानंतर तक्रारींचा सिलसिला कायम राहिला.
Smart City
Smart CityDainik Gomantak

Smart City :

पणजी ‘स्मार्ट सिटी’ची कामे होता होता पावसाळा जवळ आला. सर्वत्र खोदकाम केलेले पाहून पणजीवासीय चिंताग्रस्त आहेत. ३१ मे ची डेडलाईनही आज संपणार आहे. अधिकारी पाहणी करतात आणि अमुक वेळेत काम होणार असे सांगून जातात.

याचा सारा त्रास मात्र जनतेला होतोय. अनेक ठिकाणी गटारांची साफसफाई केली असली तरी शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर पाणी तुंबेल हे कोणीही सांगेल. अशावेळी पणजीकरांनी होड्या घेऊन प्रवास करायचा का, हा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. त्यानिमित्ताने शहरातील स्मार्ट कामांचा घेतलेला आढावा...

Smart City
Goa Statehood Day: 'घट्टण' नव्हे; घटक राज्यच!

‘दक्षता’कडे तक्रारी

स्मार्ट सिटीची कामे सुरू झाल्यानंतर केंद्रातून आलेल्या शकडो कोटींच्या निधीत गफला झाल्याच्या तक्रारी काँग्रेस पक्षाने दक्षता आयोगाकडे दोन ते तीनवेळा केलेल्या आहेत. स्मार्ट सिटीचे काम म्हणजे एक मोठा भ्रष्टाचार असल्याचा काँग्रेसचा सुरवातीपासूनचा आरोप आजतागायत कायम आहे.

दक्षता आयोगाकडे सर्वात प्रथम इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे तत्कालीन सीईओ स्वयंदिप्तापाल चौधरी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार झाली. त्यानंतर तक्रारींचा सिलसिला कायम राहिला.

श्‍वेतपत्रिकेचे काय?

स्मार्ट सिटीच्या कामावरून विरोधी पक्षाने पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी स्मार्ट सिटीच्या कामावरून सत्ताधाऱ्यांची पिसे काढली. काँग्रेसतर्फे आलेमाव यांनी या कामांचे ऑडिट करण्याची आणि श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणी केली होती. ती मागणी सरकारकडून काही मंजूर झाली नाही; परंतु ऑडिट होणार की नाही, हा एक प्रश्‍न आहे.

आधीची कामे सध्या सुरू!

इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडची (आयपीएससीडीएल) स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरवातीला पायाभूत सुविधा म्हणजेच सध्या सुरू असलेली रस्ता, गटार आणि मलनिस्सारणची कामे हाती घेणे आवश्‍यक होते. परंतु बॉक दी व्हॉक व ‘आयपीएससीडीएल’च्या कार्यालयाचे, आयलँड सुशोभीकरणाचे काम हाती घेतले गेले.

त्यामुळे आता पणजीत ज्या पायाभूत सुविधा तयार होत आहेत, त्यामुळे पणजीकरांना नव्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एवढा त्रास होत असला तरी काही मोजकेच लोक यावर आवाज उठवतात. बाकीचे तोंडावर बोट आणि हाताची घडी घालून पाहत असावेत.

संताप व्यक्त

स्मार्ट सिटीच्या नावाखाली पणजीत जी कामे सुरू आहेत ती अजून पूर्ण झालेली नाहीत. १८ जून रोड, एमजी रोड, पणजी मार्केट तसेच अनेक ठिकाणची कामे प्रलंबित आहेत. अजून सुमारे ३० टक्के कामे प्रलंबित आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण गरजेचे आहे. यातील अनेक कामे प्रलंबित राहतील, यात तीळमात्र शंका नाही. त्यामुळे पावसाळ्यात पणजीचे काय होईल, हे सांगता येत नाही.

- उदय मडकईकर, नगरसेवक तथा माजी महापौर

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पणजीत जी कामे सुरू आहेत ती दर्जाहीन आहेत, त्यात कोणतीच गुणवत्ता नाही. कामासाठी वापरण्यात आलेेले सिमेंट हे दर्जाहीन वापरले आहे. त्यामुळे जरी कामे घाईगडबडीत पूर्ण केली तरीदेखील पणजीकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. सांडपाणी आणि पिण्याचे पाणी एकत्र होऊन आले नाही म्हणजे मिळवले.

- अशोक दांडे

पणजीतील कामे ३१ मे पूर्वी पूर्ण होतील की नाही यापेक्षा त्यांची गुणवत्ता किती आहे, हा प्रश्न आहे. पणजीत जी कामे झाली आहेत ती हजार कोटींची आहेत का? स्मार्ट सिटीची संकल्पना या कामातून दिसत नाही. परदेशातील शहरे सोडाच; परंतु आमच्या देशातील इंदोर, नोयडा, नवी दिल्ली यांच्या तुलनेतदेखील या छोट्याशा शहराची कामे झालेली नाहीत, ही शोकांतिका आहे.

- संदीप हेबळे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com