Goa Statehood Day: 'घट्टण' नव्हे; घटक राज्यच!

Goa Statehood Day: घटक राज्यामुळे गोव्याचे ‘घट्टण’ झाले, असे म्हणणाऱ्यांना असे सांगावेसे वाटते की, प्रशासकीय पातळीवर स्थानिक सरकारच्या अधिकारांत मोठी वाढ झाली.
Goa
Goa Dainik Gomantak

Goa Statehood Day

1980 चे आंदोलनग्रस्त दशक आठवा. 86 साली प्रदेश कॉंग्रेसने कोकणी राजभाषा ठराव संमत केला अन् मराठीप्रेमींनी एकजूट दाखवत चळवळ आरंभली. मात्र, कोकणी आंदोलनातून चर्चिल आलेमांवसारख्या आग्या वेताळाचा जन्म झाला.

त्याचबरोबर साहित्यिक पुंडलिक नायक यांचे नेतृत्वगुणही झळाळून उठले. कोकणी विरुद्ध मराठी हा संघर्ष उणेपुरे सातआठ महिने चालला होता. उत्तर विरुद्ध दक्षिण अशी उभी फूट पडते की काय, अशी भीती निर्माण झाली होती.

राज्यात प्रतापसिंह राणे यांचे तर केंद्रात राजीव गांधी यांचे सरकार होते. आजच्या भाषेत बोलायचे तर ‘डबल इंजिन’वाले. तरीही मामला लटकला होता याचे कारण खुद्द खाशा स्वाऱ्यांचा कल मराठीकडे झुकत होता.

टंगळमंगळ करीत मामला प्रलंबित ठेवायचा; लोक किती काळ म्हणून आंदोलन करतील? त्यांना पोटापाण्याचे उद्योग आहेत की नाहीत, असा त्यांचा विचार असावा. दोन्ही भाषागट इरेला पेटले होते. ‘राण्या राण्या कोकणी कर, ना जाल्यार कदेल सोड’ ही कोप्रआ (कोकणी प्रजेचो आवाजची घोषणा होती.

दुसरीकडे मराठीप्रेमींचा हिंदू कॉंग्रेस आमदारांवर दबाव वाढत चालला होता. ‘धरले तर चावते; सोडले तर पळते’ अशी पक्ष व सरकारची स्थिती झाली होती. अखेर राजीवना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी गुलाम नबी आझाद, चिंतामणी पाणिग्रही व रघुनंदनलाल भाटिया या सहकाऱ्यांना सतत गोवावाऱ्या करायला लावून मुख्यमंत्री तथा पक्ष आमदारांवर दबाव आणत कोकणी राजभाषा विधेयक बनण्यास मान्यता मिळवली.

त्याच वेळी दुसरीकडे घटक राज्याच्या मागणीने जोर धरला होता. पंतप्रधानांनी शब्द दिला: आधी राजभाषा मामला सोडवा; नंतर घटक राज्याचा विचार करू. ०४ फेब्रुवारी १९८७ रोजी कोकणी राजभाषा व मराठी सहभाषा विधेयक संमत झाले.

ज्या मराठीप्रेमी हिंदू कॉंग्रेस आमदारांवर मदार होती, त्यांनीच कच खाल्ल्याने ‘मराप्रस’ खचली आणि खलप, आठवले, नार्वेकर, मयेकर आदींचे आंदोलन थंडावले. मुद्दा हा की, गोवा घटक राज्याला ही भाषिक चळवळीची पार्श्‍वभूमी होती.

आता शब्द पाळण्याची जबाबदारी केंद्रावर पडली होती आणि कोणतीही ‘गॅरेंटी’ वगैरे दिली नसताना राजीवजींनी वचनपूर्ती केली. संसदेने घटक राज्य विधेयक मंजूर केले आणि ३० मे १९८७ रोजी गोवा घटक राज्याची स्थापना झाली.

दुर्दैवाने आदल्या दिवशी पूर्व पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचे निधन झाल्याने राष्ट्रभर दुखवटा होता. सबब, घटक राज्याचे उद्घाटन प्रत्यक्षात ०२ जून १९८७ रोजी राजीव गांधींनी कांपाल मैदानावर दमण, दीव विरहित गोव्याच्या नकाशाच्या विमोचनाने केले. घटक राज्य झाले; पुढे काय? आजही अनेकांना वाटते की, गोवा संघप्रदेश होता तोच बरा होता.

अर्थात अजून कित्येकांना गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण झाले असते तर बरे होते, असेही वाटत असेल. तेच का, ‘व्हिवा पोर्तुगीजकालीन गोंय’ असे मनात म्हणणारेही असंतुष्ट आत्मे अजून असतील. कुणी सांगावे?

घटक राज्यामुळे गोव्याचे ‘घट्टण’ झाले, असे म्हणणाऱ्यांना असे सांगावेसे वाटते की, प्रशासकीय पातळीवर स्थानिक सरकारच्या अधिकारांत मोठी वाढ झाली. नायब राज्यपालांच्या जागी राज्यपाल आले; तीस सदस्यांची विधानसभा चाळीस आमदारांची झाली.

(माझा अंदाज असा की, उद्या आदिवासींसाठी आरक्षण दिले जाईल, तेव्हा ती पन्नास जणांची होईल.) दुसरा लाभ असा की, संघप्रदेशकालीन गोव्याच्या आमदारांना राष्ट्रपती निवडणुकीत मतदानाचा अधिकार नव्हता तो हक्क घटक राज्याने मिळवून दिला.

त्याचबरोबर दमण दीवचे जोखड गोव्याच्या खांद्यावरून दूर झाले, हेही लक्षात घेतले पाहिजे. घटक राज्यामुळे गोव्याला राज्यसभेत स्थान मिळाले, याकडे दुर्लक्ष होऊ नये.

घटक राज्य मंत्रिमंडळाची शुभारंभी बैठक झाली (सरकार प्रतापसिंह राणेंचेच होते आणि डॉ. गोपाल सिंग यांना राज्यपालपदी बढती मिळाली होती).

कोणता पहिला ठराव संमत झाला, माहीत आहे? संपूर्ण गोवा एकच जिल्हा होता, त्याचे उत्तर व दक्षिण असे दोन जिल्हे बनवणे! (पुढेमागे रवी नाईक समर्थित तिसरा सेंट्रल गोवा जिल्हा झाला तर आश्‍चर्य वाटू नये) आता हे का झाले? कारण दोन जिल्ह्यांचा संघप्रदेशकालीन मंत्रिमंडळाचा ठराव केंद्राने फेटाळून लावला होता.

घटक राज्य व्यवस्थेमुळे दिल्लीवर निर्भर राहण्याचे दिवस गेले. अर्थात केंद्राकडून घसघशीत अर्थमदत व्हायची, तीही घटली हे खरे आहे. पण लग्नानंतर मुलगा नववधूसह वेगळा राहणार तर राजाराणीच्या संसाराचा भार त्यालाच वाहिला पाहिजे. त्यासाठी वडिलांकडे हात पसरणे नामुष्कीचे होय.

समजा, उद्या केंद्रात ‘इंडिया’चे सरकार आले (ते येणार नाही) तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीलाही घटक राज्य दर्जा मिळेल. पोलिस खाते स्थानिक सरकारच्या अखत्यारीत येईल. केजरीवाल खूश होतील. अर्थात त्यांच्या सुखदु:खाची चिंता आपल्याला करायची गरज नाही.

गोवा घटक राज्य असण्याला कुणाचा विरोधच उरलेला नाही. माझे असे स्वच्छ मत आहे की, घटक राज्य गोव्याला मिळाल्यामुळेच आपण गत तीन तपांमध्ये इतकी प्रगती करू शकलो!

Edited By - सुरेश वाळवे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com