पणजी: कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवण्यासाठी नेरसे येथे जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले नसल्याचे जलसंपदा खात्याने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. याविषयी चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रवाह समितीच्या बैठकीत याविषयी चर्चा झालेली नाही. कर्नाटकला कोणतेही काम त्या परिसरात करता येणार नाही.
मध्यंतरी महाराष्ट्राकडून कर्नाटक तिळारीचे पाणी घेणार अशी अफवा पसरवण्यात आली होती. त्यात तथ्य नाही हे आम्ही सुरवातीपासून सांगत होतो. ते नंतर सिद्ध झाले. त्यानंतर कणकुंबी येथे कर्नाटक सरकार बांधकाम करत असल्याची चर्चा सुरू झाली. प्रवाहच्या पाहणीवेळी तेथे कोणतेही बांधकाम होत नसल्याचे दिसून आले. आता जलवाहिनी घातली जात असल्याची कथा सांगितली जात आहे. त्यातही तथ्य नाही. पथक पाठवून ही बाब तपासून घेतली आहे, असे बदामी म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकला म्हादई नदीचे पाणी वळवण्यासाठी कोणतेही काम करण्यास बंदी घातली आहे. राष्ट्रीय वन्य जीव मंडळाने त्यांच्या प्रस्तावावर विचार करण्यास देखील नकार दिला आहे. गोव्याच्या मुख्य वन्यजीव संरक्षकांनी बजावलेल्या नोटीशीमुळे कर्नाटक सरकार सध्या अडचणीत आले आहे. या परिस्थितीत कर्नाटक पाणी वळवण्याचा विचार करणार नाही. त्यांना समोर मार्ग दिसत नसल्यानेच कर्नाटककडून म्हादईच्या प्रकल्पाबाबत नरमाईची भूमिका घ्या मग तम्नार प्रकल्पाला मंजुरी देतो असे सांगण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.