पणजी: ‘म्हादई’च्या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्ये पुन्हा शेरेबाजी सुरू झाली आहे. ‘ईट का जवाब पत्थर से’ अशी भूमिका दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांनी घेतली आहे. गोमंतकीय गणरायाच्या स्वागतासाठी सजावट करण्यात मग्न असताना भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते सुनील कठवणकर यांनी म्हादईच्या मुद्यावरून वार-पलटवार केले.
काँग्रेस नेत्या डॉ. अंजली निंबाळकर यांनी म्हादई प्रश्न कर्नाटक व गोवा मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतून सुटू शकतो. त्यासाठी आपण पुढाकार घेऊ शकते, असे विधान केल्यानंतर वादाला तोंड फुटले. गिरीराज वेर्णेकर यांनी ‘जोवर कर्नाटक बेकायदेशीररीत्या पाणी वळविणे थांबवत नाही तोवर चर्चा अशक्य आहे’, अशी ठणकावून भूमिका व्यक्त करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
तद्नंतर सुनील कवठणकर यांनीही तत्काळ व्हिडिओद्वारे प्रत्युत्तर केले. ‘२८ जानेवारी २०२३’ला जाहीर सभेत गृहमंत्री अमित शहा यांनी म्हादईच्या पाण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री सहकार्य करतील, असे विधान केले होते. त्यावर भाजपने मौन बाळगले. याचा अर्थ शहा खरे बोलले. भाजप सरकारने म्हादई विकण्यास मूक परवानगी दिली आहे’, अशी खरमरीत टीका कवठणकर यांनी केली.
गेली ३० वर्षे प्रलंबित असलेला म्हादई पाणी प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बैठकीत सोडविला जाऊ शकतो. पंतप्रधानांनी अशी बैठक घेण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवावी, कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना त्या बैठकीला आणण्याची जबाबदारी आपण घेते, असे काँग्रेसच्या प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी दाबोळी येथे नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.