Mapusa News : म्हापसा ता. म्हापसा हे राज्यातील अतिमहत्वाचे शहर असल्याने येथील पालिकेसाठी पूर्णवेळ मुख्याधिकारी असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मी सरकारी स्तरावर प्रयत्न करत असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. अतिरिक्त ताबा असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
या समस्यांवर तातडीने उपाययोजना हाती घ्यावी लागत असल्याने चांगल्या पूर्णवेळ अधिकाऱ्याची गरज असल्याचे महत्त्वपूर्ण विधान उपसभापती तथा स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांनी केले.
मागील सात ते आठ महिने पालिका प्रशासकीय कारभार पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांच्या अभावी प्रभावित झाला आहे. बुधवारी, उपसभापती हे म्हापशात माध्यमांशी संवाद साधताना बोलले.
सध्या पालिकांना कॉमन केडरची नितांत आवश्यकता आहे. विशेषतः राज्यातील चार प्रमुख शहरांसाठी कॉमन केडर हवाच.
पालिका क्षेत्रातील सर्व आमदार या कॉमन केडरचे समर्थनच करताहेत. जेणेकरुन, पालिका प्रशासकीय कामकाजात सुव्यवस्थितपणा येण्यास मदत मिळेले, असेही उपसभापती म्हणाले.
जोशुआ डिसोझा पुढे म्हणाले की, सध्या अनेक समस्यांमुळे म्हापसा पालिकेकडून घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. यात काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने अडथळे आलेत. कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे,असे डिसोझा म्हणाले.
कुचेली प्रकल्प पालिका घेणार
कुचेली येथील कचरा प्रकल्प पालिकेकडून ताब्यात घेतला जाणार आहे. सीएसआर तत्वाअंतर्गत प्रकल्पातील कामाची हाताळणी केली जाणार असून काही मशीन तसेच कामगारांचा वापर केला जाणार असल्याची माहिती दिली.
यामुळे कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर होण्यास मदत होईल. कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचेही जोशुआ डिसोझा म्हणाले.
रवींद्र भवन पूर्ण करणार !
गेली अनेक वर्षे म्हापसा तसेच बार्देशवासियांची असलेली रवींद्र भवनाची मागणी आपल्या कारकिर्दीत पूर्ण केली जाणार असल्याची ग्वाही उपसभापती डिसोझा यांनी यावेळी दिली.
कुचेली येथील प्रस्तावित रविंद्र भवनात तेथील कोमुनिदादने कार्यालयासाठी जागेची मागणी केली आहे. सध्या या विषयावर चर्चा सुरु असून तत्त्वतः त्यांना कार्यालयासाठी जागा देणे कोणत्याच प्रकारची हरकत नसल्याचे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.