म्हापसा आज किडनीच्या आजाराला जगातील बरेच लोक तोंड देताहेत. आपल्या दैनंदिन जीवनात नियमांचे व सवयींचे पालन केल्यास किडनी निरोगी राहू शकते.
मात्र,यासाठी आठ ‘गोल्डन रुल्स’चे पालन करावेच, असे आवाहन किडनीतज्ज्ञ डॉ. अमोल महालदार यांनी ‘गोमन्तक’शी जागतिक किडनी दिनानिमित्त बोलताना सांगितले.
‘गोल्डन रुल्स’मध्ये अतिरिक्त औषधांचे सेवन विशेषतः पेन किलर खाणे टाळावे, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे, स्वतःला हायड्रेटेड (पाणी पिणे) ठेवणे, वजन नियंत्रणात ठेवणे, ध्रूमपान-मद्यपान टाळणे, रक्तदाब तपासावे, तेलकट पदार्थ टाळावे, व्यायाम करून इष्टतम वजन राखावे, या नियमांचा समावेश आहे.
किडनी शरीरातील महत्त्वाचा अवयव. शरीरात असलेले विषारी पदार्थ वॉटर प्युरीफायरप्रमाणे ती फिल्टर करते. किडनीची (मूत्रपिंड) योग्यवेळी योग्य ती काळजी न घेतल्यास ते शरीरासाठी मारक ठरू शकते.
किडनीच्या आजारांना ‘सायलेंट किलर’ असेही म्हटले जाते. बदलती जीवनशैली व खाण्यापिण्याच्या सवयीमुळे किडनी आजाराचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या आजाराबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी १४ मार्च जागतिक किडनी दिवस साजरा केला जातो.
जरी अनेकांना किडनीचे महत्त्व माहीत नसले तरी मृत्यूचे जगातील सातवे प्रमुख कारण हे मूत्रपिंडाचा आजारपण आहे. प्रत्येक दहा प्रौढ व्यक्तीमागे एकाला किडनीचा आजारपण असतोच. आणि दहापैकी चार मधुमेह रुग्णांना किडनीचा आजार असतो. यातूनच किडनी आजाराकडे दुर्लक्ष करुन चालत नाही हे अधोरेखित होते.
गोव्यातील आकडेवारी पाहिल्यास निदान तीन ते पाच हजार व्यक्ती डायलेसीसवर आहेत. विशेषतः चाळीस ते साठ वयोगटातील लोकांना किडनीचा आजार होण्याचा धोका असतो. विशेष म्हणजे, किडनीचा आजार पटकन लक्षात येत नाही.
जेव्हा समजतो तोवर मूत्रपिंडाच्या कार्याची क्षमता केवळ १० ते १५ टक्केच राहिलेली असते, अशी माहिती डॉ. महालदार यांनी दिली. जेव्हा किडनी योग्यरित्या काम करत नाही, तेव्हा क्रॉनिक किडनी डिसीज होतो. यामुळे शरीरात कचरा व अतिरिक्त पाणी जमा होते. ज्यामुळे हृदयविकारासारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात, असेही डॉ. महालदार यांनी नमूद केले.
काणकोणासारखीच स्थिती अन्य राज्यांतही
काणकोण परिसरातील लोकांना किडनीचा आजार आहे, असे म्हटले जाते त्यावर डॉ. महालदार म्हणाले की, ही स्थिती फक्त काणकोणध्येच आहे असे नाही. देशातील इतर ठराविक प्रदेशात व भागांत किडनीचे रुग्ण आढळतात.
कर्नाटक, आंध्रच्या काही विशिष्ट ठिकाणी किडनीचे रुग्ण आढळतात. तसेच वेस्ट इंडिज, श्रीलंकामधील ठराविक परिसरात किडनीचे रुग्ण आढळतात. परंतु, हे कशामुळे याचे निदान झालेले नाही. याला अज्ञात इटिओलॉजीचा क्रॉनिक किडनी रोग म्हटले जाते, असे महालदार म्हणाले.
नियमित आरोग्य तपासणी गरजेची !
किडनी फंक्शन टेस्टमध्ये किडनीशी संबंधित कोणत्याही आजाराची उपस्थिती दिसून येते. हे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, लठ्ठपणा किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी आवश्यक आहे. निरोगी जीवनशैलीचे पालन करुन निरोगी किडनीसाठी अन्नाची सर्वोतम निवड करणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.