Goa Loksabha: गोव्यात लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार कोण? गूढ कायम, उत्कंठा वाढली

Loksabha Election 2024 : पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह राष्ट्रीय अध्यक्षांची सलग पाच तास चर्चा
Goa Loksabha Election
Goa Loksabha ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

Loksabha Election 2024 :

कधी नव्हे, ती भाजपचे लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार कोण, ही उत्सुकता गेले दोन दिवस ताणलेलीच राहिली आहे. दिल्लीत आज (गुरुवारी) रात्री ११.३० वाजेपर्यंत गोव्यातील उमेदवारीविषयक कोणताही निर्णय झाला नव्हता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भाजप मुख्यालयातील एका कक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आदी वरिष्ठांची पाच तासांहून अधिक काळ बैठक सुरू होती. या तिन्ही नेत्यांच्या प्रतीक्षेत बैठकीसाठी दिल्लीला गेलेले भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दुसऱ्या कक्षात होते.

पहिलीच बैठक लांबल्याने दुसरी बैठक रात्रीचे पावणे अकरा वाजले. मात्र, त्या बैठकीतील निर्णय रात्री ११.३० पर्यंत समजू शकला नव्हता. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे सायंकाळी दिल्लीत पोचले आहेत. दिल्लीतील भाजप मुख्यालयात बुधवारी पक्षाच्या गाभा समितीची बैठक झाली होती.

पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या त्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. त्यात गोव्यातील दोन जागांचाही समावेश होता. त्यानंतर आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार होते.

मात्र, ते रात्री ११.३० वाजेपर्यंत होऊ शकले नव्हते. भाजप गुरुवारी उमेदवार जाहीर करेल, असे मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी म्हटले होते. मात्र, बैठक लांबल्याने उमेदवारांची घोषणा रात्री ११.३० वाजेपर्यंत भाजपने केली नव्हती.

भाजपचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार कोण, याची ताणली गेलेली उत्सुकता अखेर आज, गुरुवारी रात्री संपुष्टात येईल, असे दिवसभर वातावरण होते.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक की माजी आमदार दयानंद सोपटे आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार नरेंद्र सावईकर की माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना उमेदवारी देण्यात येईल याविषयी राजकीय वर्तुळातच नव्हे, समाज माध्यमांवर जनतेकडूनही चर्चा करण्यात येत होती. त्यातच कवळेकर हे दिल्लीत पोचल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पाठीवर थाप मारल्याचे

छायाचित्र व्हायरल झाल्यावर चर्चेने काही वेळ कवळेकर यांना उमेदवारी मिळणार की काय, असा रोख घेतला होता.

लोकसभा निवडणूक एप्रिलमध्ये होणार असे गृहित धरून राजकीय पक्ष उमेदवार निश्चितीच्या खटाटोपात गेले काही दिवस होते. भाजप यंदा वेगळा निर्णय घेईल, अशी चर्चा माध्यमांत होती. खुद्द भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांतही त्याविषयी उत्सुकता होती.

त्यातच उत्तर गोव्यातून माजी मंत्री दिलीप परुळेकर व माजी आमदार दयानंद सोपटे यांनी उमेदवारीवर दावा केल्याने रंगत निर्माण झाली होती. श्रीपाद नाईक यांच्यावर मध्यंतरी पक्षातूनच टीका झाली होती. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटन सोहळ्यात नाईक यांना स्वयंपूर्ण गोवा बग्गीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत स्थान न दिल्याने भाजप त्यांना डावलणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

या ना त्या कारणाने ती चर्चा सुरूच राहीली होती. नाईक यांनाच उमेदवारी मिळणार, असे भाजपचा कोणताही स्थानिक नेता छातीठोकपणे सांगू शकत नव्हता. खुद्द नाईकही पक्षाचा जो निर्णय असेल तो आपणास मान्य असेल अशी बोटचेपी भूमिका घेत राहिले होते. त्यातच उमेदवार निश्चितीसाठी दिल्लीत एकदा झालेल्या बैठकीत निर्णय न झाल्याने भाजप वेगळा विचार करत असल्याची शंका बळावली होती. त्याआधारे सोपटे यांचे नाव चर्चेत आणले गेले. त्यांची आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याशी असलेली मैत्री लक्षात घेता ते सोपटे यांच्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे शब्द टाकतील आणि त्यांना निवडून आणण्याची हमी घेतील, अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती.

नाईक यांना उमेदवारी दिली नाही, तर त्यांना राज्याच्या राजकारणात सामावून घ्यावे लागेल. पुढे मुख्यमंत्री पदावरही त्यांचा दावा निर्माण होईल. किमान तूर्त प्रदेशाध्यक्षपद तरी त्यांच्याकडे सोपवावे लागेल, असा राजकीय चर्चेचा आज सूर होता.

आधीच बाहेरून आलेले आमदार आणि त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते यांनी मूळ भाजपमधील कार्यकर्त्यांवर विविध पदांवरील नियुक्तीत वरचष्मा दाखवल्याने एक सुप्त नाराजी कार्यकर्त्यांत आहे. पक्षशिस्तीमुळे ती उफाळून येत नाही.

तरीही त्याला खतपाणी घालणारी कृत्ये टाळण्याकडे सध्या भाजपचा भर आहे. त्यामुळे ‘जैसे थे’ परिस्थितीसाठी नाईक यांचा विचार उमेदवारीसाठी करण्यात येईल, असेही काहीजणांचे म्हणणे होते.

सासष्टीत पूरक वातावरण : दक्षिण गोव्यात सासष्टीतून भाजपला मतदान होणार नाही, अशी भीती व्यक्त केली जाते. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे सध्या भाजपसोबत आहेत. मडगावचे आमदार दिगंबर कामत, नुव्याचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सिक्वेरा तर मंत्रिमंडळात आहेत.

नावेलीत भाजपचे उल्हास नाईक तुयेकर आमदार आहेत. यामुळे भाजपला सासष्टीतही पूरक असे वातावरण असल्याचे दिसते. त्यामुळे सावईकर यांच्या नावाचा विचार भाजप करेल, असा युक्तिवाद केला जात आहे.

१८० जणांच्या नावांवर भाजपचे शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत आज देशभरातील १८० लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावावर विचार करण्यात आला. यात काही व्हीआयपी मतदारसंघ, तर काही पराभूत झालेल्या संघांचा समावेश आहे.

रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत जवळपास १८० लोकसभा मतदारसंघांतील नावांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्या नावांची घोषणा एक किंवा दोन मार्च रोजी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Goa Loksabha Election
Goa Fire Case: होंडा येथे कपड्याच्या गोदामाला आग लागून दोन लाखांचे नुकसान

भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष दिल्लीत

ॲड. नरेंद्र सावईकरांना संधी शक्य

दक्षिण गोव्यातून ॲड. सावईकर यांना पुन्हा जनमत आजमावण्याची संधी भाजप देईल, असेही काहीजणांना वाटते. तशी भावना त्यांनी आज समाज माध्यमावर व्यक्त केली होती.

गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा ९ हजार ७५५ मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी फोंडा तालुक्यावर राजकीय पकड असलेले सुदिन ढवळीकर भाजपसोबत नव्हते. आता ते भाजपसोबत आहेत. याशिवाय फोंडा तालुक्यातून सुभाष शिरोडकर (शिरोडा), रवी नाईक (फोंडा) हे दोघेही मंत्री आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com