Loksabha Election : काणकोण तालुक्‍यात भाजपचा वरचष्‍मा; पण…!

Loksabha Election : काँग्रेस टक्कर देणार? : तवडकर, इजिदोर, पै खोत, भंडारी, पागी यांची भूमिका ठरणार महत्त्‍वपूर्ण
loksabha Election
loksabha Election Dainik Gomantak

सुभाष महाले

Loksabha Election :

काणकोण मतदारसंघात सध्‍या तरी‌ भाजपचा प्रभाव दिसतोय. तरीसुद्धा ‘अंडर करंट’ वेगळा असल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटते. त्यासाठी ते गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा हवाला देतात.

त्‍या निवडणुकीत कधी नव्हे एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने मतांचे ध्रुवीकरण झाले होते. भाजप उमेदवार रमेश तवडकर हे केवळ ३०५१ मताधिक्य घेऊन निवडून आले होते.

त्यांना ९०६३ मते मिळाली. तर, प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार इजिदोर फर्नांडिस (६०१२), काँग्रेसचे जनार्दन भंडारी (५३५१), अपक्ष उमेदवार विजय पै खोत (४७९१), रिव्होल्‍युशनरी गोवन्सचे प्रशांत पागी (१५९९) यांच्या मतांची एकत्रित बेरीज केल्यास ती १७,७५३ आहे.

त्यामुळे काणकोण मतदारसंघावर पूर्णपणे भाजपचे वर्चस्व आहे असे म्हणणे आजच्या घडीला धाडसाचे ठरेल.

सध्‍या काणकोणात भाजपचे एकेकाळचे तीन बलाढ्य नेते आहेत. त्यात रमेश तवडकर हे आमदार आहेत. पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे इजिदोर फर्नांडिस, विजय पै खोत यांची भूमिकाही महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. मात्र त्‍यांनी अजूनपर्यंत तरी आपापले पत्ते उघड केलेले नाहीत.

काणकोणला सभापतिपद मिळाले, मात्र मंत्रिपद मिळाले नाही याची खंत पूर्वी रमेश तवडकर यांच्या समर्थकांना होती. मात्र तवडकर यांच्या कामांचा धडाका बघून त्यांची नाराजी दूर झाल्याचे दिसते.

कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, सभापती तवडकर व ‘उटा’चे प्रकाश वेळीप यांची एकमेकांवरील कुरघोडी लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जमातीच्या मतदारांमध्ये काही प्रमाणात उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या समाजाच्‍या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे.

खासदार निधीतून म्‍हणावी तशी विकासकामे झालीच नाहीत!

खोतीगाव पंचायतीच्या अनुसूचितबहुल मतदार असलेल्या क्षेत्रात खासदार योजनेखाली एकही विकासकाम झालेले नाही, असे खोतीगावचे सरपंच आनंदु देसाई व माजी सरपंच दया ऊर्फ उमेश गावकर यांनी सांगितले.

लोलये पंचायतीला खासदार योजनेतून व्‍यायामशाळा उभारण्‍यात आली आहे. तसेच काणकोणमधील काही दिव्यांगांना दोनचाकी वाहने देण्यात आली आहेत. खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांनी आत्तापर्यंत दोनवेळा या मतदारसंघाला अधिकृत भेट दिली आहे. लोलये पंचायत क्षेत्रातही खासदार योजनेतून एकही विकासकाम झाले नसल्याचे काही पंचांनी सांगितले. पैंगीणमध्येही विकासकाम झाल्‍याची नोंद नाही.

मतांचे ध्रुवीकरण होण्याची अधिक शक्यता

रमेश तवडकर यांचे प्रतिस्पर्धी इजिदोर फर्नांडिस, एकेकाळचे भाजपचे आमदार विजय पै खोत व काँग्रेसचे जनार्दन भंडारी यांची काणकोणात काही खास मते आहेत.

त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. तवडकर यांनी ख्रिश्‍‍चनबहुल‌ मतदार असलेल्या आगोंद पंचायत क्षेत्रावर आपले विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

loksabha Election
Goa Bjp: भाजपचे ‘मिशन दिल्ली’; सरकार आणि पक्षाच्या कामाची सांगड

मतदारांची संख्या

काणकोण मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदार संख्येने जास्त आहेत. पुरुष मतदारांची संख्या १६,६९१ तर महिला मतदारांची संख्या १७,६६७ आहे. एकूण मतदारांची संख्या ३४,३५८ आहे.

loksabha Election
Goa News 18 Feb 2024: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विजयी उमेदवार फ्रान्‍सिस सार्दिन यांना काणकोण मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे या मतदारसंघात भाजपला मताधिक्य मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांना बराच घाम गाळावा लागणार आहे.

मतदार‌संघातील सहा पंचायतींपैकी लोलये, पैंगीण, खोतीगाव, श्रीस्थळ व आगोंद या पाच पंचायतींवर सध्‍या भाजपचा झेंडा आहे. शिवाय काणकोण पलिकेतही भाजपप्रणित सत्ताधारी गट आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत या पंचायती व पालिका किती सक्रिय होते, त्यावरच मताधिक्यांची गणिते अवलंबून आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com