डिचोली: श्री लईराई देवीच्या जत्रेवेळी धोंड भक्तगण शुचीर्भुत होतात, त्या पवित्र ‘धोंडांच्या तळी’चा विस्तार कधी होणार याची प्रतीक्षा शिरगाववासीयांसमवेत तमाम भक्तगणांना आहे. या तळीचा विस्तार ही काळाची गरज आहे. दरवर्षी श्री लईराई देवीच्या धोंड भक्तगणांचा वाढणारा आकडा लक्षात घेता भविष्यात मोठी समस्या आणि अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तळीचा विस्तार होणे आवश्यक आहे.
स्थानिक पंचायतीने या तळीचा विस्तार आणि सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव जलसंसाधन खात्याकडे पाठविला आहे. यंदाच्या जत्रेपूर्वी या प्रस्तावाला चालना मिळणार अशी अपेक्षा होती. मात्र, यंदाच्या जत्रेपूर्वी भक्तगणांची स्वप्नपूर्ती होऊ शकली नाही. निदान पुढील वर्षाच्या जत्रेपर्वी तरी या तळीचा उध्दार व्हावा अशी भक्तगणांची अपेक्षा आहे.
धोंडांच्या तळीचा आवाका जवळपास १०० चौरस मीटर एवढा आहे. गोव्यासह अन्य राज्यात मिळून सद्यस्थितीत श्री लईराई देवीच्या व्रतस्थ धोंड भक्तगणांचा आकडा चाळीस हजारांहून अधिक आहे. दरवर्षी त्यात वाढ होत असते. जत्रेच्या दिवशी श्री लईराई देवीच्या चरणांकडे येणारे हजारो धोंड भक्तगण या पवित्र तळीत स्नान करतात. धोंडांबरोबर येणारे अन्य भक्तगणही या तळीत हातपाय धुवून शुचीर्भुत होतात. जत्रेच्या दिवशी तळीवर उसळणारी गर्दी यामुळे ही तळी अपुरी पडत आहे. त्यामुळे धोंड भक्तगणांची मोठी गैरसोय होत असते.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिक मुकुंद शांताराम घाटवळ यांनी तळीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. या तळीचा 15 मीटर विस्तार आणि सौंदर्यीकरण करण्याचा प्रस्ताव आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.