Goa News : पुरुषप्रधानतेचा उगम अधोरेखित करणारे ‘काळमाया’ : सादरीकरण रंगतदार

Goa News : पण संहितेच्या मर्यादांमुळे नाटकाचा प्रभाव दिसला काहीसा कमी
Goa
Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर कला अकादमीच्या ४८ व्या कोकणी नाट्यस्पर्धेचा पडदा ओम कला सृष्टी बांदोडा फोंडा या संस्थेने सादर केलेल्या ‘काळमाया’ या नाटकाने उघडला. काळमाया हे प्रख्यात लेखिका डॉ. जयंती नायक यांचे नाटक.

नाटकाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. सुरुवातीला स्त्रीप्रधान असलेली संस्कृती नंतर पुरुष आपल्या हातात कसा घेतो, याचे चित्रण करणारे हे नाटक. साधारण दोन अडीच हजार वर्षांपूर्वीचा काळ या नाटकात दाखवला आहे.

या काळात स्त्रीप्रधान संस्कृती असायची. ज्या बाईला जास्त मुली ती बाई त्या गटाची मुखिया होत असे. त्याप्रमाणे सहा मुली असलेली म्हालमाय ही त्यांच्या गटाची मुखिया असते. या सहा मुली, तिला कन्या नावाची एक वेगळ्या प्रकारची मुलगी असते.

इतर मुली काळ्या असताना ही मुलगी मात्र गोरीपान असते. याचे कारण म्हणजे या मुलीची उत्पत्ती एका देवकुळी ऋषितूल्य माणसांकडून झालेली असते. आणि हे रहस्य तिचा नवरा म्हालबाप्पा यालाही माहीत असते. ही मुलगी कन्या वयात आल्यानंतर तिला पुरुषांचे वेध लागायला लागतात.

आणि तसे ती आपली आई म्हालमाय हिला सांगते. आता हिला नवरा म्हणजे त्यांच्या भाषेत भ्रतार कुठून आणायचा हा म्हालमायपुढे प्रश्‍न उभा राहतो. कन्याला त्‍यांच्या गटातील बंधव याच्याबद्दल आकर्षण वाटत असते. पण तो तिला योग्य नसल्यामुळे म्हालमाय हा संबंध मान्य करत नाही.

व्हडली ही गटातील सर्वात वृद्ध बाई. कन्येला भ्रतार शोधण्याकरिता गटाच्या सर्व पुरुष माणसांनी फेरी करावी, अशी सूचना करते. आणि ती सूचना मान्य करून म्हालबाप्पा व इतर सगळे भ्रताराच्या शोधार्थ बाहेर पडतात. सोबत ते कन्याला पण नेतात. पण तीन दिवसानंतर हा गट परत आल्यानंतर त्यांच्यासोबत कन्या नसते. विचारल्यावर म्हालबाप्पाने त्या कन्येचा भूयारात कोंडून जीव घेतल्याचे सांगितले जाते.

हे कळल्यावर म्हालमाय आक्रोश करीत आपला प्राण सोडते. नंतर म्हालबाप्पा सूत्रे हाती घेऊन पुरूष प्रधान संस्कृतीची बीजे रोवतो. तेव्हा मारलेल्या कन्येप्रमाणेच अजूनही मुली बायकांवरचे अत्याचार संपलेले नाहीत, असे सांगून नाटकाची इतिश्री होते.

खरे म्हणजे हा विषय ज्वलंत असल्यामुळे त्याला प्राचीन काळाची पार्श्‍वभूमी असली तरी त्याचा पाया आजच्या युगात सापडतो. पण असे असूनही संघर्षाचा विस्तार करण्यात लेखिका थोडी कमी पडल्याचे दिसून येते.

खरे म्हणजे या विषयाचा आवाका फारच मोठा असल्यामुळे. तो दोन - सव्वा दोन तासांत दाखविता येणे कठीणच. आणि यामुळेच विषयावर एक प्रकारचा अंकुश बसतो. तरीही विषयाचा गाभा मनाला भिडल्याशिवाय राहत नाही एवढे खरे. आणि अनुरुप सादरीकरणामुळे हा गाभा मनाला स्पर्श करण्यात बराच यशस्वी ठरल्याचे दिसते.

दिग्दर्शक विशाल गावडे यांनी प्रसंगानुरूप दिग्दर्शन केल्याचे जाणवले. खासकरून शेवटाला म्हालबाप्पा मोठा खडक घेऊन उभा राहतो. तो प्रसंग प्रभावी ठरला. म्हालमायच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या नियंती नाईक यांनी आपली भूमिका चांगली केली, तरी काही ठिकाणी त्यांची संवादफेक एकसाची वाटत होती.

म्हालबाप्पा झालेले सत्यजीत मुळी यांच्या आवाजामुळे भूमिकेला वेगळाच कंगोरा प्राप्त झाला. मात्र, काही ठिकाणी अडखळल्यामुळे सादरीकरणात थोडा अडसर जाणवला. व्हडली झालेल्या साईली नाईक यांनी वृद्धावस्‍थेचे बेअरिंग चांगले सांभाळले. साईली नाईक या सध्या उभरत्या कलाकार असून अनेक चित्रपट, नाटकांत त्या दिसतात. ज्याच्याबरोबर कन्या संबंध जोडायला बघते, तो बंधव योगेंद्र कुंकळ्येकर यांनी चांगला वठवला.

कन्याच्या लहान भूमिकेत तेजस्वी नाईक या उठून दिसल्या. मृग झालेले प्रणव नाईक व मादी मृग झालेल्या साईष्मा नाईक यांनी छोट्या भूमिकेतही अस्तित्व दाखवून दिले.

काही शब्द हे कोकणी शब्दकोशातील शब्दांचे उत्तम प्रकार म्हणावे लागेल. मदभार, भ्रतार, भोवंडी सारख्या शब्दांनी त्या काळाचे स्वरुप उभे केलेच, पण त्याचबरोबर कोकणी वाङ्‍मयाची नजाकतही पेश केली.

सिंधूराज कामत यांचे पार्श्‍वसंगीत रामदास कुर्पासकर यांची प्रकाशयोजना व स्वतः दिग्दर्शक गावडे यांची वेशभूषा ही प्रयोगाच्या कालरूपाला शोभेल अशीच होती. एकंदरीत प्रस्तुत नाटकाने विश्रांतीनंतर स्पर्धेची सुरूवात चांगली केली असली तरी संहितेचा आलेख हवा तेवढा न विस्तारल्यामुळे सादरीकरणावर मर्यादा दिसल्या.

Goa
Goa News: म्हापसा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षांचा राजीनामा

अजूनही गर्दी कमीच

हा स्पर्धेचा चौथा दिवस असूनसुध्दा आजही कलामंदिरात म्हणावी तशी गर्दी दिसली नाही. नाटक फोंड्यातील असल्यामुळे कलामंदिर फुल्ल होईल, असे वाटत होते. पण अर्ध्याहून अधिक कलामंदिर रिकामे असल्यामुळे रंगात बेरंग झाल्यासारखे झाले.

त्यात परत प्रेक्षकांशी बोलल्यावर हे नाटक बऱ्याच प्रेक्षकांच्या डोक्यावरून गेले असल्याचे दिसून आले. प्राचीन काळाचा सध्याच्या काळाशी घातलेली सांगड बऱ्याच लोकांच्या पचनी पडली नसल्याचे त्यांच्याशी बोलल्यानंतर समजले. पण तरीही या नाटकाला स्पर्धेची मूल्ये असल्यामुळे त्यात एक वेगळेच थ्रील होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com