IFFI 2024 Tech Media Startup Expo Her Story Her Screen
विलास ओहाळ
पणजी: देशातील महिला विविध क्षेत्रांत त्यांचे हक्क आणि कर्तव्ये ठामपणे बजावत पुढे जात आहेत. महिलाकेंद्रित प्रकल्पांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे आपण पाहिले आहे, ज्याची मांडणी नेमकेपणाने आणि विचारपूर्वक झालेली आहे. आम्ही खरोखरच खूप पुढे आलो आहोत. जवळजवळ एका पिढीचे चक्र पूर्ण झाल्यासारखे दिसते. महिला कलाकारांनी रुढी-परंपरांना छेद देत सकारात्मक क्रांती घडविली आहे. सशक्त भूमिकांवर त्यांच्याकडून जोर दिला जातोय, असे मत मीनाक्षी मार्टिन्स यांनी व्यक्त केले.
इफ्फीतील ‘फिल्म बझार’मधील ‘टेक मीडिया स्टार्टअप एक्स्पो : २०२४’चा तिसरा दिवस मीडिया-टेक उद्योगातील महिलांना सशक्त करण्यासाठी समर्पित करण्यात आला. ‘तिची कथा, तिची स्क्रीन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम होता. या मुक्तप्रवाह चर्चेने उद्योगातील प्रतिष्ठित आवाज एकत्र आणले. यात गायत्री गुलियानी, जीवधा शर्मा, आकांक्षा अरोरा, मीनाक्षी मार्टिन्स यांचा समावेश होता. नवीन दृष्टिकोन सादर करून, रुळलेल्या रूढींना तोडून आणि कथनातील विविधता वाढवून महिला कथाकथनात कशी क्रांती घडवत आहेत, हा या चर्चेतून निष्कर्ष काढण्यात आला.
‘रीडिफायनिंग मीडिया : हर नॅरेटिव्ह, हर पॉवर’वर गायत्री गुलियानी यांनी संचालित केलेल्या चर्चेत जीवधा शर्मा, देबश्रीता दत्ता, निसारी महेश, गीतिका अग्रवाल, रुक्मा प्रभुदेसाई यांचा सहभाग होता. सशक्तीकरण आणि वकिलीसाठी माध्यम हे एक सशक्त साधन म्हणून कसे काम करते, नावीन्यपूर्ण सामग्री निर्मिती माध्यमांमध्ये महिलांची भूमिका परिभाषित करणे, अर्थपूर्ण प्रतिनिधित्वासाठी मार्ग तयार करणे आणि महिला-समाजाने लैंगिक भेदभावाच्या पैलूंवर कशी मात केली आहे, यासारख्या विषयांवर चर्चा झाली.
आकांक्षा अरोरा आणि वासुदेव बोस यांचा समावेश असलेल्या ‘युथ पर्स्पेक्टिव्ह पॅनल : फ्युचर व्हॉइसेस इन मीडिया’ या विषयावरील सत्राने सांगता झाली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (एआय) भविष्य आणि मीडिया आणि मनोरंजन उद्योगावर होणारे परिवर्तनात्मक प्रभाव या चर्चेचे प्रमुख आकर्षण होते.
आकांक्षा आणि वासुदेव यांनी नाविन्य आणि सत्यता यांच्यातील समतोलावर भर दिला गेल्याचे दिसून येते. तीन दिवसांच्या महिला सबलीकरणावर फोकस केल्याने सर्वसमावेशकता आणि प्रगतीसाठी इव्हेंटची वचनबद्धता वाढली असल्याचे दिसते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.