Goa Football : 'कॉर्पोरेट'च्या सहभागामुळे गोमंतकीय फुटबॉलच्या तिजोरीत भर

परिस्थितीत बदलणे अत्यावश्यक होते. गोमंतकीय फुटबॉलच्या प्रगतीचेच ध्येय बाळगून आम्ही काम करण्यास सुरवात केली.
Goa Football
Goa FootballDainik Gomantak

गेल्या वर्षी मी गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा संघटना मोठ्या आर्थिक तुटीत होती. गोव्यातील फुटबॉलचा दर्जाही घसरला होता. एकंदरीत चित्र चिंताजनक होते. फुटबॉल हा गोव्याचा राज्य खेळ, पण त्यात पीछेहाट सुरू होती. परिस्थितीत बदलणे अत्यावश्यक होते. गोमंतकीय फुटबॉलच्या प्रगतीचेच ध्येय बाळगून आम्ही काम करण्यास सुरवात केली.

आनंदाची बाब म्हणजे, आता चित्र बदलू लागलेय. संघटनेची एकंदरीत तूट आता पाच लाख रुपयांवर आली आहे. ही खूप मोठी आश्वासक आर्थिक प्रगती आहे. वर्षभरात पुरस्कर्त्यांच्या माध्यमातून संघटनेचे उत्पन्नही दुप्पट झाले. सारे काही एका रात्रीत घडत नाही. संयम महत्त्वाचा ठरतो.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळच्या राज्य अर्थसंकल्पात फुटबॉलसाठी सहा कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले. त्यामुळे संघटनेचा मोठा भार हलका झाला आहे. त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभारी आहोत. आता अनुदान लवकर संघटनेकडे हस्तातंरीत व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Goa Football
Blog : कल, आज और कल कपूरगीतांची मैफल

फुटबॉलचा विकास साधताना आम्हाला सरकारकडून आर्थिक आणि साधनसुविधांच्या बाबतीत भरपूर पाठबळाची अपेक्षा आहे. आम्ही जीएफएची सूत्रे हाती घेतल्यानंतर सरकारचा चांगला पाठिंबा मिळत आहे. जीएफएच्या इतिहासात प्रथमच अंदाजपत्रकात राज्य सरकारने सहा कोटी रुपयांची तरतूद केली.

फुटबॉलचा विचार करता, मैदानावरील कामगिरी महत्त्वाची ठरते. गतवेळच्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीत गोव्याच्या वाट्याला दारुण पराभव आले. आमच्यासाठी हा मोठा धक्का होता. खेळाडूंना सर्व सुविधा पुरविल्या, परंतु अपेक्षित निकाल गवसले नाहीत. आता आम्ही फुटबॉलमधील अनुभवी गोमंतकीय मार्गदर्शन मारियान डायस यांची तांत्रिक संचालकपदी नियुक्ती केली आहे.

त्यांना फुटबॉलमधील खाचखळगे पुरते माहीत आहेत. मारियान यांचा अनुभव गोमंतकीय फुटबॉलसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. त्याचवेळी आम्ही माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू, देशातील ज्येष्ठ फुटबॉल मार्गदर्शक सावियो मदेरा यांची संघटनेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती केली आहे, त्यांचा अनुभवही संघटनेच्या कारभारात नक्कीच मोलाचा ठरेल.

Goa Football
Blog : गुणी गायिका उषाताई आमोणकर

यावेळच्या संतोष करंडक स्पर्धेत, गोव्यात घरच्या मैदानावर होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्याचे उद्दिष्ट आहे. महिला फुटबॉलमध्येही भरारी घेण्यासाठी उपाययोजना तयार आहे. तळागाळातील फुटबॉल विकासावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

गोव्यातील सर्वांत जुना जाणता फुटबॉल क्लब साळगावकर एफसीची माघार हा आमच्यासाठी मोठा धक्का ठरला, पण त्यातून आम्ही सावरत आहोत. गोव्यातील फुटबॉलला बळ देण्यासाठी कॉर्पोरेट पुढे येत आहेत ही आश्वासक बाब आहे.

आम्ही आगामी प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेसाठी तीन संघांना थेट प्रवेश दिला आहे. त्यापैकी जीनो स्पोर्टस क्लब व दत्तराज साळगावकर यांच्या संघाची प्रवेशिका कॉर्पोरेट गटातील असून त्यांची बोली प्रत्येकी ५० लाख रुपयांची आहे. जीनो संघ यावेळी, तर दत्तराज यांचा संघ पुढील वेळेस स्पर्धेत सहभागी होईल. पॅक्स ऑफ नागोवा संघही यावेळचा थेट प्रवेश मिळालेला संघ असून त्यांची बोली ३० लाख रुपयांची आहे.

Goa Football
Blog : माध्यमे, अभिव्यक्ती आणि विचार

थेट प्रवेश प्रक्रियेमुळे संघटनेच्या तिजोरीत भर पडत असून हे संघ राज्यातील फुटबॉल प्रगतीसाठी कटिबद्ध राहतील. पायाभूत सुविधा, अकादमी आदींवर भर राहील. राज्यातील ‘कॉर्पोरेट’ गोमंतकीय फुटबॉलमध्ये गुंतवणूक करण्यास पुढे येत आहेत, हे सुचिन्ह आहे. हे नवे संघ स्थानिक गुणवत्तेचा पुरस्कार करणार असून येथील फुटबॉलमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करतील.

येथील फुटबॉलला व्यापक संधी आणि व्यासपीठ मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गतवर्षी उशिरा मोसम सुरू होऊनही आम्ही ८२६ सामने खेळविले. यावर्षी २२०० सामने नियोजित आहेत. २०२३-२४ मोसमापासून राज्यातील फुटबॉल रेफरींच्या मानधनात ३० ते ४० टक्के वाढ केली जाणार आहे.

पंचगिरीच्या उच्च दर्जास प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. संघटनेने मागील चार वर्षे प्रलंबित राहिलेल्या देय रकमेचा प्रश्न निकालात काढला असून रखडलेले बक्षीस वितरणही आम्ही केले. येत्या मोसमात पुरस्कर्ते आणि इतर माध्यमांतून तीन कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करण्याचे संघटनेचे उद्दिष्ट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com