Ranji Trophy Cricket Tournament: गोवा चौथ्या पराभवासह संकटात

Ranji Trophy Cricket Tournament: रेल्वेविरुद्धच्या पराभवामुळे गटात तळाच्या स्थानी
Akash Pandye
Akash Pandye Dainik Gomantak

Ranji Trophy Cricket Tournament: विजयासाठी त्रिशतकी धावांचे कठीण आव्हान असताना गोव्याच्या फलंदाजांनी एकाग्रपणे चिकाटीने खेळणे आवश्यक होते.

त्यात ते कमी पडले आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात सलग तिसऱ्या, तर एकंदरीत चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता गटात तळाच्या स्थानी गेल्याने प्लेट गटातील संभाव्य पदावनतीचेही संकट आहे.

सूरत येथील लालभाई काँट्रेक्टर स्टेडियमवर रेल्वेने सोमवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी उपाहाराचा खेळ अर्ध्या तासाने वाढविल्यानंतर 63 धावांनी विजय मिळविला.

306 धावांच्या आव्हानासमोर गोव्याचा दुसरा डाव २४२ धावांत संपुष्टात आला. रेल्वेचा डावखुरा फिरकी गोलंदाज आकाश पांडे याने दुसऱ्या डावात ७१ धावांत ९ गडी बाद संघाला स्पर्धेतील दुसरा विजय मिळवून दिला.

त्याने सामन्यात १३३ धावांत १३ विकेट मिळवून कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदीत केली. सहा गुणांसह रेल्वेचे आता १८ गुण झाले आहेत. गोव्याचे सहा लढतीतून फक्त चार गुण असून ते शेवटच्या आठव्या क्रमांकावर घसरले.

गोव्याने तिसऱ्या दिवसअखेरच्या 1 बाद 93 वरून पुढे खेळण्यास सुरवात केली. नाबाद अर्धशतकवीर सुयश प्रभुदेसाई सोमवारी सकाळी जास्त वेळ टिकला नाही. आकाश पांडेचा तो दिवसातील पहिला, तर एकंदरीत दुसरा बळी ठरला.

सुयशने 115 चेंडूंत 4 चौकारांसह 67 धावा केल्या. दुसऱ्या विकेटची ७६ धावांची भागीदारी संपुष्टात आल्यानंतर गोव्याची घसरगुंडी सुरू झाली. स्नेहल कवठणकरने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.

त्याला आकाशने त्रिफळाचीत बाद केल्यानंतर गोव्याचा डाव ६ बाद १४८ असा गडगडला. नंतर कर्णधार दर्शन मिसाळच्या ३३ धावा, तसेच दहाव्या क्रमांकावरील हेरंब परब याने ३ षटकार व तेवढेच चौकार लगावत केलेल्या ३४ धावांमुळे गोव्याला पराभवाचे अंतर कमी करता आले.

संक्षिप्त धावफलक

रेल्वे, पहिला डाव ः २९७

गोवा, पहिला डाव ः २००

रेल्वे, दुसरा डाव ः २०८

गोवा, दुसरा डाव (१ बाद ९३ वरुन) ः ६५.२ षटकांत सर्वबाद २४२ (सुयश प्रभुदेसाई ६७, स्नेहल कवठणकर ३७, दीपराज गावकर ५, मंथन खुटकर १७, के. व्ही. सिद्धार्थ २, दर्शन मिसाळ ३३, मोहित रेडकर २०, लक्षय गर्ग ०, हेरंब परब ३४, फेलिक्स आलेमाव नाबाद ६, आकाश पांडे २६.२-५-७१-९, प्रथम सिंग १-५०).

पदावनतीचा धोका कायम

रणजी करंडक स्पर्धेच्या एलिट गट नियमानुसार ३१ व ३२व्या क्रमांकावरील संघाची प्लेट गटात पदावनती होते. मणिपूरचा संघ सर्व सहाही सामन्यांत पराभूत झाल्यामुळे त्यांचे एलिट गटातील स्थान जाणार हे निश्चित आहे.

गोव्याचा शेवटचा सामना शुक्रवारपासून (ता. ९) बलाढ्य गुजरातविरुद्ध पर्वरी येथे होईल. त्या लढतीत गोव्याला एकही गुण मिळाला नाही, तर ते प्लेट गटात जाण्याची शक्यता जास्त आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com