Goa Diabetes : गाेवा मधुमेहाच्‍या टाईमबॉम्‍बवर ; 10 रुग्णांपैकी 6 मधुमेही

Goa Diabetes : दहा रुग्णांपैकी सहावा मधुमेही : ६० ते ६५ टक्‍क्‍यांपर्यंत रुग्‍णांची वाढ
Diabetes in Goa
Diabetes in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Diabetes : मडगाव,गोव्‍यात सध्‍या प्रत्‍येक दहाव्‍या रुग्‍णांपैकी सहावा रुग्‍ण हा मधुमेहाचा विकार जडलेला असून ही एक धोक्‍याची सूचना आहे.

मागच्‍या दहा वर्षांत गोव्‍यात मधुमेहाचे रुग्‍ण झपाट्याने वाढत असून यापूर्वी हा विकार जडण्‍याची आयुष्‍य मर्यादा ६०च्‍या नंतरची होती.

आता हे प्रमाण चाळीशीवर आलेले आहे. आणि हीच बाब अधिक चिंताजनक आहे, अशी प्रतिक्रिया गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

गाेवा राज्‍य मधुमेहाच्‍या टाईम बॉम्‍बवर सवार झालेले असून या परिस्‍थितीत जर आताच बदल केला नाही तर येणाऱ्या काळात मधुमेहाचा विकार महामारीच्‍या स्‍वरूपात बळावू शकतो, असा इशारा वैद्यकीय तज्‍ज्ञांनी दिला आहे. मंगळवारी गोव्‍यात ‘जागतिक मधुमेह दिन’ पाळण्‍यात आला त्‍यावेळी हा इशारा देण्‍यात आला आहे.

जागतिक मधुमेह दिनानिमित्त मंगळवारी मडगाव येथे १५० रुग्‍णांची तपासणी करण्‍यात आली होती. त्‍यापैकी ८० टक्‍के रुग्‍ण हाय रिस्‍क गटात मोडणारे होते. मंगळवारी तपासलेल्‍या व्‍यक्‍तींपैकी पाच जणांमध्‍ये मधुमेह सापडला तर शंभर व्‍यक्‍तींना उच्‍च रक्‍तदाबाचा विकार असल्‍याचे दिसून आले.

वाढलेला ताण, बदललेली जीवनशैली आणि बदललेला आहार ही राज्‍यातील मधुमेही रुग्‍णांची संख्‍या वाढण्‍याचे मुख्‍य कारण असल्‍याचे मत मडगावातील ज्‍येष्‍ठ डॉक्‍टर व्‍यंकटेश हेगडे यांनी व्‍यक्‍त केली.

स्‍थूलपणा हे मुख्य कारण

राज्‍यात वाढलेली कॉर्पोरेट संस्‍कृती हे मधुमेह वाढण्याचे मुख्‍य कारण असून हे काम करताना येणारा ताण आणि तणाव यामुळेच आता चाळीशीतील तरुण मधुमेहाच्‍या विकाराचे बळी ठरू लागले आहेत.

बैठे काम संस्‍कृती हेही राज्‍यातील मधुमेहींची संख्‍या वाढण्‍याचे आणखी एक कारण आहे. अगदी लहानपणातच हा स्‍थूलपणाचा विकार विद्यार्थ्यांमध्‍ये भिनू लागला आहे. अवजड वा अंगमेहनतीचे काम करण्याची सवय नसल्यामुळे अंगातील घाम बाहेर पडत नाही व त्याचा त्रास संबंधितांना होतो, अशी माहिती मडगावातील ज्‍येष्‍ठ डॉक्‍टर व्‍यंकटेश हेगडे यांनी दिली.

Diabetes in Goa
Goa Accidental Death: तिसरे काढण्यास गेलेला मुलगा बेतुल येथे बुडाला

सध्‍या गोव्‍यात मधुमेही रुग्‍णांचे प्रमाण ६० ते ६५ टक्‍के एवढे असून त्‍यातील बरेचजण हाय रिस्‍क या कक्षेत मोडणारे आहेत. यामुळे राज्‍यात कार्डिओ व्‍हेस्‍क्‍युलर, मूत्रपिंड विकार आणि डायबेटिक फूट (अंगाला घाव पडणे) हे रुग्‍ण वाढलेले आहेत. गोव्‍यासारख्‍या राज्‍यासाठी ही बाब चिंताजनक आहे. मागच्‍या दहा वर्षात ही वाढ दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे.

- डॉ. राजेश पाटील, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक

बदललेली खाद्यशैली हेही या रोगाचे मुख्‍य कारण आहे. भात, चपाती आणि ब्रेड हा कार्बोहायड्रेट्‌सचा अधिक अंश असलेला आहार गोव्‍यात मुख्‍यत: घेतला जातो. त्‍याशिवाय शीतपेये आणि अन्‍य गोड पदार्थ यांचा आहारात अधिक समावेश असतो. यामुळेच लाेकांमध्‍ये मधुमेहाचा विकार वाढण्‍याचे प्रमाण जास्‍त असून आहारावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

- डॉ. एडी डिमेलो, ज्‍येष्‍ठ फिजिशियन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com