Goa Update 22 December: गोव्यातील दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

गोव्याला रस्ते अपघातमुक्त राज्य बनवा - नितीन गडकरी
Goa Live Update 22 December 2023
Goa Live Update 22 December 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याला रस्ते अपघातमुक्त राज्य बनवा ः नितीन गडकरी 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग नितीन गडकरी म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी रस्त्यातील ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी १७७.७३ कोटी रूपये मागितले. त्यातील १०० कोटी रूपये तत्काळ देतो. त्यांनी लगेच काम सुरू करावे. कारण रस्ते अपघातात मृत्यू होत असतात. गोवा रस्ते अपघातात एकही मृत्यू न होणारे राज्य झाले पाहिजे. उर्वरीत ७७ कोटीही लगेचच मंजूर करू.

हे पुल बांधताना खूप काळजी घेतली. या पुलाखालून जहाजही जाऊ शकते. येथील टॉवरवरील कॅप्सुल लिफ्ट आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. झुआरी पुल जागतिक रेकॉर्ड बनवले. ६३ हजार टन स्टिलचा वापर झाला आहे. ६० टनाचा ट्रक देखील यापुलावरून जाऊ शकतो.

या पुलाचे उद्घाटन करताना खूप आनंद वाटतो आहे. हे उद्घाटन म्हणजे गोव्याच्या जनतेला नवीन वर्षाची भेट आहे. लोकांना त्रास होत होता म्हणून आपण गतवर्षी एक लेन खुली केली.

या पुलाच्या वर व्हुवर गॅलरी, आर्ट गॅलरी तयार करावी, अशी माझी इच्छा होती. मी प्रमोद सावंत यांना विनंती केली की तुम्ही हे करा. आता हे होत आहे. आपण नावेतून येऊ आणि कॅप्सुलमधून वर टॉवरवर जाऊ. गोव्यात अनेक पर्यटक येतात.

जसा फ्रान्सच्या पॅरिसमध्ये आयफेल टॉवर आहे. तसा हा टॉवरही प्रसिद्ध होईल. पर्यटन मंत्र्यांना माझी विनंती आहे की लाईट अँड साऊंड शोही येथे करावा. या पुलाखालून जगातील कोणतेही जहाज आले तरी ते आरामात जाऊ शकते.

इलेव्हेटेड कॉरिडॉरमुळे वाहतुकीची समस्या दूर होईल. नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा यांना जोडणाऱ्या रस्त्यावर रहदारी होणार नाही. गोव्यातून दोन इकनॉमिक कॉरिडॉर जातात. मुंबईतून-कन्याकुमारी हा चारलेन महामार्ग आहे.

मनोहर पर्रीकर यांनी अटल सेतू गोवा सरकारकडून बांधू असे सांगितले होते. आम्ही केंद्रातून पैसे देऊन ते काम पूर्ण केले. त्यामुळे पणजीतील ट्रॅफिक जॅमची समस्या दूर झाली.

नवीन गोवा निर्माण करण्यावर विचार व्हावा - नितीन गडकरी

गडकरी म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी रिंगरोडचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर विचार करतोय. पर्यटन हे असे क्षेत्र आहे, ज्यात ४९ टक्के गुंतवणूक रोजगार निर्मितीवर खर्च होते. पर्यटन गोव्याच्या प्रगतीत आणि विकासात महत्वाचे आहे. त्यामुळे रिंगरोड बांधण्याआधी न्यू गोवा निर्माण करण्याचा निर्णय घेतल्यास ट्रॅफिकचा प्रश्न मार्गी लागेल. त्यासाठी केंद्र सरकार, गोवा सरकारने एकत्रित विचार करावा.

टॅक्सी चालकांना घेऊन योजना बनवा, गोव्याला प्रदूषण मुक्त बनवा - गडकरी

गोवा महत्वाचे पर्यटन केंद्र आहे. गोव्याला प्रदुषणापासून मुक्त केले पाहिजे. मी हायड्रोजनवर चालणारी गाडी चालवतो. माझी विनंती आहे. टॅक्सी, बसेस डिझेलवरील नको. तर इथेनॉल, हायड्रोजन, बायो सीएनजी, सीएनजीवर असावे. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करा. टॅक्सीचालकांना घेऊन योजना तयार करा.

...तर गोव्याचे मत्स्य उत्पादन ५ ते ७ पट वाढेल - नितीन गडकरी

गडकरी म्हणाले, फिशिंग हे देखील महत्वाचे खाते. प्रॉन्स उत्पादन घ्या. डॉलर्समध्ये कमवाल. शेतीला मर्यादा आहे. गोव्याचे बंदर विकसित करण्याची संधी मिळाली. मच्छिमारांच्या फिशिंग बोटी केवळ १० नॉटीकल मैलापर्यंत जातात. आम्ही कोचीन येथे नवीन ट्रॉलर बनवले.

त्यात बर्फाचे स्टोरेज आहे. त्याची क्षमता १०० नॉटीकल मैल आहे. त्यातून मत्स्य उत्पादन पाच ते सात पटीने वाढेल. गोवा फिश उत्पादनाचे मोठे केंद्र होईल.

आगामी काळात सरकारने मोपा एअरपोर्टला वॉटर ट्रान्सपोर्टने जोडण्याचा विचार करावा. भारत तिसऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी झाला पाहिजे. भारत जर पुढे जाणार असेल तर भारतासोबत गोवाही पुढे जाणार आहे. भारत सरकार पूर्ण शक्तीनिशी तुमच्या मागे उभे आहे.

गडकरी म्हणाले, गोवा सरकारला मी वचन दिले आहे की हे काम चांगले होईल. बाजूच्या जागेवर पार्किंग, रेस्टॉरंट, लँड स्केपिंग हे सर्व होईल. मी ते सर्व पाहिले आहे. तुम्हाला सर्वांना ते पूर्ण झालेले पाहून खूप आनंद वाटेल. मलाही त्याचा खूप आनंद आहे. आमदारांनी केलेल्या मागण्यावर विचार करून त्या सोडविण्याचा विश्वास देतो.

नितीन गडकरींनी २५ हजार कोटींहून अधिक निधी गोव्याला दिला - मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, पूर्वी मडगावातून पणजीत यायला अडीज तास लागायचे. कुठे आहे विचारले की पुलावर आहे, असे उत्तर द्यायचे. पूर्वीचे सरकार केवळ कामांची घोषणा करायचे. पण भाजप सरकार केवळ घोषणा करत नाही तर कामे पूर्णही करते. मोदी जे बोलतात ते करतात. आज कुणाला रस्ते पाहिजे असतील तर ते थेट गडकरींना भेटायला जातो असे सांगतात.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, गोव्यावर नितीन गडकरींचे खास प्रेम आहे. २५ हजार कोटी पेक्षा जास्त पैसे गडकरींनी गोव्याला दिले. छोटी कनेक्टिव्हिटी राहिली आहे. मडगाव ते कारवार ही कनेक्टिव्हिटी करून द्या. तुम्ही आणि तुमचा विभाग खूप हुशार आहे. सरकारकडून ९० टक्के जमिन संपादन झाले आहे.

उर्वरीतही करू. एवढाच रस्ता राहिला आहे. या टेन्युअरमध्ये त्या कामाला मंजुरी द्या. पुढच्या टेन्युअरमध्ये ते काम पूर्ण होईल. याच टेन्युअरमध्ये त्याकामाचेही भूमीपूजन करा. ३०० कोटींचे प्रपोजल पाठवले आहे, त्यालाही मंजुरी द्यावी.

मुरगाव पोर्ट ते नॅशनल हायवे कनेक्टिव्हिटीचे स्वप्न गडकरींनी पाहिले होते. एक आर्म कनेक्ट व्हायचा राहिला आहे. वास्को आणि मुरगाव येथील नागरिकांचे स्वप्न पूर्ण केले आहे. एअरपोर्ट ते हायवे कनेक्टिव्हिटी राहिली आहे. पुढच्या एप्रिलपर्यंत हा रस्ता पूर्ण होत आहे. नवीन एअरपोर्ट तुम्ही हायवेला कनेक्ट करून दिला आहे.

रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बोलला तर बरे होईल. तशा सूचना तुमच्या अभियंत्यांना द्याव्यात. तुमचे गोव्यावरील प्रेम कधीच विसरणार नाही. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात तुम्ही गोव्याला भरभरून दिले.

पत्रादेवी ते पोळे रिंगरोडचा डिपीआर करायला घेतला आहे, त्याबद्दल धन्यवाद. साखळी ते चोर्ला हा केवळ ८० किलोमीटरचा रस्ता आहे. ड्युएल सिंगल लेन असा हा रस्ता कम्प्लीट केला तर गोवा बेळगावला चांगल्या पद्धतीने कनेक्ट होईल.

तुम्हाला आठवत नसेल पण तुम्ही जेव्हा बंदरे मंत्री होता तेव्हा तुम्ही पोर्ट कनेक्टिव्हिटीसाठी जी मदत केली ती आम्ही विसरणार नाही. एमपीटी वर तुम्ही त्यासाठी खूप चांगले काम केले. आम्हाला अलीकडच्या काळात पर्यटनासाठी जे जे पुरस्कार मिळाले, त्याबद्दल मोदीजींचे आणि गडकरी यांचे खूप खूप आभार. मोदीजींचा आशिर्वाद आणि गडकरींजींच्या व्हिजनमुळेच गोव्याचा विकास करता आला.

गोव्याच्या या पुलावर जो टॉवर होणार आहे. तो तुम्ही महाराष्ट्रात पण नाही केला पण गोव्याला दिलात. त्याबद्दल खूप आभार. २०१२ पूर्वीची स्थिती एकदा आठवून पाहा. आणि आत्ताची गोव्याची स्थिती पाहा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नितीन गडकरींच्या हस्ते नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन; 900 कोटींच्या कामांचेही भूमीपूजन

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन झाले. यावेळी 900 कोटींच्या तीन कामांचेही भूमीपूजन यावेळी झाले. यात पर्वरी येथील सहा पदरी फ्लायओव्हर आणि नवीन झुआरी पुलावरील ट्विन टॉवरवरील फिरते रेस्टॉरंट आणि व्ह्युविंग गॅलरीच्या कामांचा समावेश आहे.

गडकरी यांनी रिमोटचे बटण दाबून या कामांचे भूमीपूजन आणि पुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन केले. यावेळी पुलावर मोठी आतषबाजी करण्यात आली.

नितीन गडकरी असे मंत्री आहेत ज्यांनी भारताला पूर्ण बदलून टाकले - मंत्री व्ही. के. सिंग 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री व्ही. के. सिंग म्हणाले की, नितीन गडकरी असे मंत्री आहेत ज्यांनी भारताला पूर्ण बदलून टाकले आहे. भारतात क्रांती आली आहे. त्याचे चित्र सर्वत्र दिसते. गोवा एक चकाकता प्रदेश बनेल.

जो प्रकल्प गोवा सरकारने मागितला तो पूर्ण करण्याचे काम केंद्र सरकारने केले - केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

केंद्रीय बंदरे, जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, गोमंतकीयांच्या वतीने गडकरी, व्ही. के. सिंग तसेच ज्यांनी या पुलासाठी मदत केली त्यांचे आभार आणि स्वागत.

मोदी सरकारने हा पूल केवळ उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्याला जोडणारा पूल नाही तर देशाला जोडणारा हा पूल आहे. जम्मू काश्मिर ते कन्याकुमारीला जोडणार हा पूल आहे. हा पूल आज सुरू झाला आहे.

जो जो प्रकल्प गोवा सरकारने मागितला तो पूर्ण करण्याचे काम केंद्र सरकारने केले. रस्ते म्हणजे विकास. अजूनही चोर्ला-साखळी रोड चांगला नाही. त्याबाबतही गडकरींना विनंती केली आहे.

रोहन खंवटे यांनी मानले नितीन गडकरींचे आभार

नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनच्या उद्घाटन कार्यक्रमात पर्यटन रोहन खंवटे म्हणाले की, मोपा येथील विमानतळ सुरू झाल्यापासून गोव्याकडे पर्यटकांचा ओघ वाढला. गोव्यातील पायाभूत सुविधांचा विकास होत आहे.

गडकरी यांनी गतवर्षी या पुलाच्या पहिल्या लेनच्या उद्घाटनप्रसंगी म्हटले होते की, या पुलावर ट्विन टॉवर आणि फिरते रेस्टॉरंट तसेच व्हुविंग गॅलरी करणार आहे. आज त्याचेही भूमीपूजन होत आहे. नितीन गडकरींचे खूप आभार. पर्वरीतील फ्लायओव्हरचे भूमीपूजन झाले आहे. ही कित्येक वर्षांपासूनची मागणी होती.

नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनच्या उद्घाटन कार्यक्रमाला सुरवात

नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनच्या उद्घाटन कार्यक्रमाला सुरवात झाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, तसेच केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, परिवहन मंत्री माविन गुदिन्हो, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, मंत्री नीळकंठ हळर्णकर, मंत्री आलेक्स सिक्वेरा आमदार, अधिकार उपस्थित आहेत.

घरपट्टी घोटाळा उघड करणे सरपंचांना भोवले?

दोन दिवसांपूर्वी किर्लपाल दाभाळ पंचायतीतील घरपट्टी घोटाळा उघड करणारे सरपंच दामोदर बांदेकरांचा तडकाफडकी सरपंचपदाचा राजीनामा. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याची बांदेकरांची माहिती.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी घेतली सभापती रमेश तवडकर यांची भेट

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज, शुक्रवारी काणकोण येथे गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.

रायबंदर वेश्याव्यवसाय प्रकरणी हेगडे दांपत्यासह तिघा दलालांच्या पोलीस कोठडीत ५ दिवसांची वाढ

रायबंदर येथील एम के पब हाऊस मधील वेश्याव्यवसाय प्रकरणी जुने गोवे पोलिसानी अटक केलेल्या संशयित हेगडे दांपत्यासह तिघा दलालांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ५ दिवसांची वाढ केली आहे. त्यांची ३ दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने आज कोठडी वाढवून घेण्यासाठी न्यायालयात उभे केले होते.

कुडचडेत दुकानातून 1.94 लाखाचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या बहिण-भावाला अटक

कुडचडे येथील सराफ दुकानातून 1 लाख 94 हजार रूपयांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना कुडचडे पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही चोरटे बहिण-भाऊ असून ते मूळचे बागलकोट, कर्नाटक येथील आहेत.

पेडणे पालिकेत विकास भारत संकल्प यात्रेचे जोरदार स्वागत. आमदार प्रवीण आर्लेकर, उपजिल्हाधिकारी दीपक वायगणकर यांची उपस्थिती. बाल कलाकारांनी केले नृत्य सादर.

जामगाळ पुलाच्या कामाबाबत वीरेश बोरकर ॲक्शन मोडमध्ये!

जामगळ-नेत्रावळी पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडले असून याबाबत गोमंतक टीव्हीने आवाज उठवल्यावर आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. पुलाचे काम त्वरित करण्याची केली मागणी.

2 जानेवारीपासून ऊस उत्पादकांचे पुन्हा आंदोलन!

सरकारने इथेनॉल प्रकल्पा संबंधी धोरण स्पष्ट केले नसल्याने संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोर 2 जानेवारी पासून धरणे आंदोलन करण्याचा ऊस उत्पादक शेतकरी संघटनेचा निर्णय.

सत्तरीचे ग्रामीण जीवन आपल्या कथा कादंबऱ्यांमधून चितारणाऱ्या प्रकाश पर्येकर या सत्तरी सुपूत्राला साहित्य अकादेमीचा पुरस्कार लाभणे ही भूषणावह बाब आहे- विश्वजित राणे, आरोग्य मंत्री

खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ गोवा कॉंग्रेसचे धरणे!

लोकसभेत खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ गोवा कॉंग्रेसचे लाक्षणीक धरणे. आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार), शिवसेनाही सहभागी

वागातोर समुद्रात पर्यटकाचा बुडून मृत्यू; हणजूण पोलीस घटनास्थळी दाखल

एका पर्यटकांचा वागातोर समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची बातमी हाती येतेय. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव जीवन दत्ता असे असून त्याचे वय 32 वर्षे आहे. सदर व्यक्तीला परदेशी नागरिकाने पाण्यातून बाहेर काढले असल्याचेही समजतेय. सदर मृत व्यक्तीने भरपूर दारू प्यायली असून त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे समजतेय.

घटनास्थळी हणजूण पोलीस पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे.

देसाईनगर साखळीत पुन्हा जलवाहिनी फोडली

देसाईनगर साखळी येथे सध्या सुरू असलेल्या भुमीगत वीज केबल घालण्याच्या कामात जमिनीखालून ड्रिलींग करताना मुख्य जलवाहिनी फोडली गेली आहे. त्यामुळे आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला.

बहुप्रतीक्षित झुआरी केबलस्टेड पुलाच्या दुसऱ्या लेनचे आज लोकार्पण

 राज्यात बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या झुआरी केबलस्टेड पुलाची दुसरी लेन आज म्हणजेच 22 डिसेंबरला सुरु होत आहे. तसेच पर्वरी येथे बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाची पायाभरणी सोहळाही आज होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या लेनचे लोकार्पण करण्यात येणार आहे. याप्रकरणी वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे. दक्षिण व उत्तर गोव्याला जोडणारा नवा झुवारी पूल हा महत्वाचा दुवा असून वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने नव्या झुआरी पुलाची नितांत गरज होती.

कळंगुट, बार्देशमधील बेकायदेशीर नाईटक्लबवर पोलिसांची धडक कारवाई; तब्बल 11 नाईटक्लब सीलबंद

गेल्या काही दिवसांपासून राज्यात चालणाऱ्या बेकायदेशीर नाईटक्लबचा मुद्दा गाजत होता. सरकारने पोलीस आणि संबंधित खात्याला या प्रकरणी कडक कारवाईचे आदेशही दिले होते.

याच आदेशाच्या अनुषंगाने कलेक्टर, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांनी कळंगुट- बार्देश येथे बेकायदेशीरपणे चालणारे 11 नाईट क्लब बंद केले आहेत. गुरुवारी रात्री 10 च्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

जाणून घ्या गोव्यातील 22 डिसेंबरचे पेट्रोल आणि डिझेलचे दर

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.54

Panjim ₹ 97.54

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.10

Panjim ₹ 90.10

South Goa ₹ 89.68

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com