Vasco Jetty : जेटींवर मच्‍छीमारांकडून आवराआवर; १ जूनपासून मासेमारी बंद

Vasco Jetty : मासेमारी बंदीमुळे राज्‍यातील नागरिकांना मासळी मिळणे कठीण होते. त्‍यामुळे काहीजण चिकन, मटण, अंडी यांकडे वळतात किंवा सुक्या मासळीवर निभावून नेतात. काही लोक जवळच्या नद्यांवर, खाडीत गळ टाकून मासे पकडतात.
Jetty
Jetty Dainik Gomantak

Vasco Jetty :

वास्को, राज्‍यात १ जूनपासून दोन महिने मासेमारी बंद राहणार आहे. त्‍यामुळे मच्‍छीमार जेटींवर आवराआवर सुरू झालेली आहे. मासेमारी बंदीची अधिसूचना मच्छीमारी खात्याकडून जारी करण्‍यात आलीय. त्‍यामुळे १ जून ते ३१ जुलै असे दोन महिने खोल समुद्रातील मासेमारी बंद राहणार आहे.

मासेमारी बंदीमुळे राज्‍यातील नागरिकांना मासळी मिळणे कठीण होते. त्‍यामुळे काहीजण चिकन, मटण, अंडी यांकडे वळतात किंवा सुक्या मासळीवर निभावून नेतात. काही लोक जवळच्या नद्यांवर, खाडीत गळ टाकून मासे पकडतात. लहान नद्यांमध्‍ये मासे मारण्यास बंदी नसल्याने किनारी भागांतील मच्छीमार जाळी टाकून मासे पकडतात. पण या मासळीचा दर अव्‍वाच्‍या सव्‍वा असतो.

वास्‍कोतील खारीवाडा मच्छीमार जेटीसह अन्‍य जेटींवरही सध्‍या ट्रॉलरमालक, खलाशांकडून आवराआवर सुरू झाली आहे. अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यांमुळे ट्रॉलर्स जेटीवर नांगरून ठेवण्‍यात आले आहेत. या ट्रॉलर्सवर काम करणारे कामगार हे परराज्यांतील असून, पुढील दोन महिने ते आपल्या गावी जाणार आहेत.

Jetty
Goa Police: गस्त वाढवा, संशयास्पद व्यक्तींची धरपकड करा! वाढत्या चोरींच्या पार्श्वभूमीवर गोवा डिजीपींच्या पोलिसांना सूचना

मत्‍स्‍यप्रिय गोमंतकीयांची होणार गैरसोय

मासेमारी बंदीमुळे गोव्यातील जून व जुलै असे दोन महिने ताजी मासळी मिळत नाही. त्‍यामुळे केरळ, आंध्रप्रदेश या राज्यांतून मासळी गोव्यात आणली जाते. तसेच गोव्यातील मत्‍स्‍यप्रक्रिया केंद्रांत साठवून ठेवलेल्या मासळीवर स्थानिकांना विसंबून रहावे लागते.

या काळात चविष्‍ट गावठी मासळी मिळते, पण तिचा दर खूपच महाग असल्‍याने सर्वसामान्‍यांना तो परवडत नाही.

काटेकोरपणे होणार बंदीची अंमलबजावणी

जून आणि जुलै या दोन महिन्यांच्या काळात मासळीचे प्रजनन होत असते. या काळात मासे किनाऱ्यालगत येऊन मोठ्या प्रमाणावर अंडी घालतात. त्‍यामुळे दरवर्षीप्रमाणे या काळात मासेमारीवर बंदी घातली जाते.

त्‍यामुळेच मासळीचे अस्तित्व टिकून राहते आणि उत्पादन वाढते. म्‍हणूनच ही बंदी काटेकोरपणे अंमलात यावी यासाठी मच्छीमारी खात्यातर्फे गस्तीनौकांना पाचारण करून टेहळणी केली जाते, अशी माहिती या खात्याच्या अधिकाऱ्याने दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com