Goa Ex Minister Avertano Furtado: गोव्यात आज, मंगळवारी सकाळपासूनच पर्वरीतील एका बारमधील भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. युवक-युवती आणि दुसरा युवकांचा गट अशा भांडणाचा हा व्हिडिओ होता.
हा व्हिडिओ गोव्यातील माजी मंत्र्यांच्या मुलाचा असल्याची अफवा सकाळपासूनच पसरली होती. त्यामुळे त्या बातमीची चर्चाही खूप झाली.
यात तो माजी मंत्री कोण, याविषयी अनेकांना उत्सुकता होती. त्यातून माजी मंत्री अवरतानो फुर्तादो यांचे नाव काहींनी जोडायला सुरवात केली होती. सोशल मीडियात हा व्हिडिओ आणि फुर्तादो यांचे नाव व्हायरल झाले होते. त्यामुळे फुर्तादो यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
तथापि, त्यानंतर फुर्तादो यांनी स्वतः कॅमेऱ्यासमोर येत पर्वरीतील त्या भांडणाशी संबंध नाही, तो माझा मुलगा नाही, असे स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत फुर्तादो म्हणाले की, या व्हिडिओच्या अनुषंगाने मला सकाळपासून अनेक फोन कॉल्स आले. माझा मुलगा माझ्यासोबत बसला आहे. त्यालाही या गोष्टीचा खूप त्रास झाला आहे. मी एक पिता आहे. मलाही या गोष्टीचा त्रास झाला.
माझा मुलगा या भांडणात सहभागी होता का, अशी विचारणा मला होत होती. प्रत्येकालाच तो माझा मुलगा नाही हे समजावून सांगावे लागले. व्हॉट्सअॅपवर एखादी पोस्ट फॉरवर्ड करताना खूप काळजीपुर्वक करा. माझा मुलगा अशा कुठल्याही भांडणात सहभागी नाही. मी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकाराने आम्हाला नाहक त्रास झाला आहे. व्हिडिओ फॉरवर्ड करताना लोकांनी अर्धवट माहितीच्या आधारे करू नये, काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.