पणजी, मांडवी नदीच्या तीरावरील ‘बिग डॅडी’ या तरंगत्या कॅसिनोचे बोगस प्रवेश पास बेल्ट ग्राहकांना विक्री करून १०,५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी कोल्हापूर येथील तिघांना अटक केली.
कोल्हापूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजय चोडणकर यांनी दिली.
पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे निखिल दिलीप फाळके (३०), चेतन किलकिले (२८) व श्रीनिधी मांडवकर (२७) अशी आहेत. हे सर्वजण कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. या तिघा संशयितांनी २ मार्च २०२४ रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास बिग डॅडी कॅसिनो कार्यालयाच्या रिसेप्शन काउंटरच्या बाहेर काही पर्यटकांना कॅसिनोच्या प्रवेश पास बेल्टची विक्री केली.
जेव्हा हे पर्यटक प्रवेश करण्यासाठी जात होते तेव्हा तेथील कॅसिनोच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता ते बनावट असल्याचे निदर्शनास आले. सुमारे १० हजार ५०० रुपयांचे प्रवेश पास बेल्ट त्यांनी विकले होते. याप्रकरणी अमित गर्ग याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
संशयितांनी हे बनावट प्रवेश पास बेल्ट कोठून तयार केले होते, याचा शोध पोलिस घेत आहेत. याप्रकरणात कॅसिनोमधील काही कर्मचारी सहभागी आहेत का, या अनुषंगानेही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोल्हापूर पोलिसांच्या मदतीने कारवाई
बिग डॅडी कॅसिनो कार्यालयाच्या आत व बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या संशयितांची माहिती मिळाल्यावर तपास सुरू झाला होता. त्यातील दोघा अनोळखी व्यक्तींचे मोबाईल क्रमांकही सापडले होते. त्याच्या आधारे अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने त्यांचा मागोवा पणजी पोलिसांनी घेतला.
त्यानंतर कोल्हापूर येथे पणजी पोलिसांचे एक पथक रवाना झाले. तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन या तिघा संशयितांचा शोध घेतला असता ते जाळ्यात सापडले. गुरुवारी या तिघांनाही पणजीत आणून अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडी घेण्यात आली आहे, अशी माहिती चोडणकर यांनी दिली. याप्रकरणाचा तपास आमिर तरल करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.