डिचोली, रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत पिळगाव येथे तीन घरांवर दगडफेक करण्याची घटना घडली असून, तोडफोड करण्यात आलेली तिन्ही घरे मुस्लिम बांधवांची आहेत. या दगडफेकीत घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून, एक आठ वर्षीय बालक मात्र सुदैवाने बचावल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना शुक्रवारी (ता.२२) उत्तररात्री एक वाजण्याच्या सुमारास पिळगावमधील न्यू वाडा परिसरात घडली. हे कृत्य कोणी आणि का केले, ते समजू शकले नाही. मात्र, या प्रकारामुळे मुस्लिम बांधवांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
न्यूवाडा-पिळगाव येथील अमनुल्ला खान, अबुद्दीन आणि शुकूर शेख यांच्या घरांवर ही दगडफेक करण्यात आली. पैकी शुकूर शेख यांचे घर सध्या बंद आहे. याप्रकरणी शनिवारी (ता.२३) सायंकाळी संबंधित घरमालकाने डिचोली पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याची माहिती मिळाली आहे.
शुक्रवारी अमनुल्ला खान व अबुद्दीन यांच्या घरातील मंडळी झोपलेली असताना रात्री एक वाजण्याच्या सुमारास काहीतरी फुटल्याचा आवाज कानी पडला. अचानक झालेल्या या आवाजामुळे वीज पेटवली असता, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आणि त्याठिकाणी दगड पडलेले आढळून आले, अशी माहिती सदाफ खान आणि सलमा या गृहिणींनी दिली.
आठ वर्षीय बालक बचावले
अमनुल्ला खान यांच्या घरातील मंडळी हॉलमध्ये झोपली होती. व्हरांड्यातील खिडकीची काच फोडून एक दगड हॉलमध्ये घुसला आणि आणि झोपलेल्या आठ वर्षीय बालकाच्या डोक्याजवळच पडला.
हा दगड बालकाच्या डोक्याला लागला असता, तर मोठा अनर्थ घडला असता, असे या घटनेतून बचावलेल्या बालकाची आई सदाफ खान यांनी सांगितले. त्यांच्या घराच्या बेडरूमच्या खिडक्यांच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत. काचा बेडरूममध्ये सर्वत्र विखुरल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.