पूर्वपरंपरेने गोव्यात विविध उत्सव साजरे होत असतात. हरवळेतील जुन्या-जाणत्यांनी राखलेल्या अशाच एका परंपरेची प्रथा युवकांनी आपल्या पध्दतीने कायम ठेवली आहे. डोंगरावरील सहभोजनाची ही प्रथा हरवळे-साखळीत आता ‘बांगडा फेस्टिवल’ या नावाने ओळखली जाते. हा अनोखा असा ‘बांगडा फेस्टिव्हल’ गेल्या रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हरवळेतील जाणते पूर्वीच्या काळी पाडव्याच्या दिवशी डोंगरावर जाऊन तेथे सहभोजन करायचे. नंतरच्या काळात मात्र या प्रथेला लाभणारा प्रतिसाद कमी होऊ लागला. अलीकडच्या काळात माजी पंचसदस्य संजय नाईक यांनी या प्रथेला पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला.
सर्वांच्या आवडीच्या ‘बांगडा’ या माशाचा समावेश या सहभोजनात होऊन ही प्रथा नव्याने साजरी होऊ लागली. या सोहळ्याला आज मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. सुपाचीपुड येथील एका खुल्या जागेत साजरा होणाऱ्या या बांगड्यांच्या फेस्टिवलमध्ये गावातील लहान मुले, तरुण व वृद्धही सहभागी होतात. बलिप्रतिपदेच्या म्हणजे या पाडव्याच्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या या पारंपरिक सहभोजनात आता गवतात भाजलेले बांगडे, उकडा भात, कोळंबीची कडी, चेपणीची कैरी असा मेनू असतो.
८ वर्षांपूर्वी अवघ्या ५० बांगड्यांनिशी पुनर्जीवित झालेल्या या उत्सवाची कीर्ती आज संपूर्ण साखळी शहरात व अन्यत्र पसरली असल्याने दरवर्षी या उत्सवाला येणाऱ्यांची व त्यात भाजल्या जाणाऱ्या बांगड्यांचीही संख्या वाढली आहे. या प्रथेसाठी आता ७०० ते ८०० बांगडे भाजले जातात, असे कृष्णा मळेवाडकर यांनी माहिती देताना सांगितले.
गवतात भाजलेल्या बांगड्यांच्या स्वादाची कल्पना अनेकांना नसेल. गवतात भाजण्यात येणाऱ्या बांगड्यांचा स्वाद न्यारा असतो. कोणत्याही हॉटेलमध्ये (किंवा घरातही) भाजलेल्या बांगड्यांमध्ये हा स्वाद तुम्हाला आढळणार नाही. त्यामुळे या बांगडा फेस्टिव्हलमधील गवतात भाजले जाणारे बांगडे अनेकजण आपल्या घरी पार्सल करून घेऊन जातात.
या सहभोजनासाठी बांगडा साफ करून, त्यात रेशाद मसाला भरला जातो. त्यानंतर हे बांगडे हळदीच्या पानात गुंडाळून गवतात ठेवले जातात. गवताला आग लावून त्यात हे बांगडे भाजले जातात. बांगड्यांचा एक वेगळा आस्वाद अनुभवता येत असल्याने या बांगडा फेस्टिवलची आतुरता लोकांना लागून राहिलेली असते.
या अनोख्या बांगडा फेस्टिवलला यंदा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुपारी आवर्जून उपस्थिती लावली व त्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. बांगडा गवतात कशाप्रकारे भाजला जातो याची प्रत्यक्ष प्रक्रिया मुख्यमंत्र्यांनी पाहिली. आपल्या पूर्वजांची जंगलातील जेवणीची परंपरा एका वेगळ्या पद्धतीने पुढे नेण्याच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुकही केले.
‘पूर्वीच्या काळात आमचे पूर्वज पाडव्याच्या दिनी डोंगरावर जाऊन सहभोजनाचा कार्यक्रम करायचे. पण आताच्या काळात पाडव्याच्या दिवशी अनेकांना इतर कामे असतात. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी ही प्रथा साजरी करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे आता हा बांगडा फेस्टिव्हल दिवाळी झाल्यानंतर येणार्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यादिवशी सर्वजण या फेस्टिवलला आवर्जून उपस्थित राहतात व तिथला उत्साह द्विगुणित करतात.’
संजय नाईक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.