PM National Apprenticeship Mela: गोवा राज्यात पर्यटन क्षेत्रात रोजगाराला मोठा वाव आहे. गोव्यात सुरू झालेल्या मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे सुमारे २ लाख ‘व्हाईट कॉलर जॉब’ची निर्मिती होणार असून त्यासाठी गोमंतकीयांची तयारी असणे महत्त्वाचे आहे.
आपल्यातील कौशल्य विकास शिक्षणावर अधिक भर देताना विविध कंपन्यांकडून मिळणाऱ्या ॲप्रेंटिसशीपसची संधी दवडू नये. याच संधीचा लाभ घेत पुढील भविष्य उज्ज्वल बनविण्याची आणखीन एक संधी प्राप्त होणार, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी रवींद्र भवनात केले.
डिचोली व सत्तरी आयटीआय व राज्य कौशल्य विकास व उद्योजकता यांच्या संयुक्त विद्यमाने साखळी रवींद्र भवनात आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान राष्ट्रीय ॲप्रेंटिसशीप मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर साखळीचे उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक ब्रह्मानंद देसाई, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष विठोबा घाडी, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, उपसंचालक एस.एस. गावकर, डिचोली आयटीआयचे प्राचार्य जॉन काल्देरो, सत्तरी आयटीआयचे प्राचार्य नीलेश गावस आदींची उपस्थिती होती.
दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन अल्सिना रिबेलो यांनी केले. या मेळाव्यात ५४ विविध कंपनी व चार सरकारी कार्यालयांनी सहभाग घेतला होता. तर मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवा वर्गाने भाग घेतला होता.
स्वतःचे उदाहरण देत मार्गदर्शन
ॲप्रेंटिसशीपमध्ये आठ किंवा दहा हजारांचेच मानधन आहे म्हणून मागे राहू नका. कारण एक-दीड वर्षाच्या ॲप्रेंटिसशीपनंतरच कोणतीही कंपनी तुम्हाला ट्रेनी म्हणून कामावर घेईल. माझ्या भविष्याची सुरवात केवळ ४ हजार रुपयांमध्ये केली होती.
वैद्यकीय शिक्षण संपताच आपण शिरोडा येथे ॲप्रेंटिसशीप करायला लागलो. त्याचा लाभ भविष्यात झाला. त्यासाठी मुलांनी या संधीचा योग्य लाभ उठवावा, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्वतःचे उदाहरण देत उपस्थित युवांना मार्गदर्शन केले.
"माणसामधील कुशलतेचा विकास साधणे आवश्यक आहे. पण त्यानंतर प्रत्यक्षात कामाची संधी व अनुभव मिळणे गरजेचे आहे. म्हणूनच या कार्यक्रमातून शिक्षण पूर्ण केलेल्या मुलांसाठी ॲप्रेंटिसशीप मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत, त्याचा लाभ घ्या. या आधारावर चांगल्या कंपनीमध्ये नोकरीची संधीही प्राप्त होऊ शकते."
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.