Indian Origin American Nikesh Arora: भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती निकेश अरोरा सध्या चर्चेत आहेत. त्याचे कारण ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात त्यांचे नाव आले आहे. एवढेच नाही तर ते काही अब्जाधीशांपैकी एक आहेत, जे गैर-संस्थापक आहेत. म्हणजेच अरोरा यांनी स्वत: कोणतीही कंपनी सुरु केलेली नाही, तरीही ते अब्जाधीश झाले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, निकेश अरोरा यांची एकूण संपत्ती 1.5 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. भारतीय चलनानुसार त्यांची मालमत्ता 12,495 कोटी रुपये आहे. निकेश अरोरा सध्या टेक कंपनी पाउलो अल्टो नेटवर्कचे सीईओ आणि अध्यक्ष आहेत. या कंपनीचे मार्केट कॅप 91 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. निकेश अरोरा दीर्घकाळापासून अमेरिकन कंपन्यांशी संबंधित आहेत. त्यांनी गुगलमध्येही काम केले आहे. व्यापारी, गुंतवणूकदार आणि उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे.
दरम्यान, त्यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1968 रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथे झाला. त्यांनी एअरफोर्स स्कूलमधून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी आयआयटी बीएचयूमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीमधून एमबीए आणि बोस्टन कॉलेजमधून फायनान्समध्ये एमएस पदवी मिळवली. अरोरा यांनी 1992 मध्ये फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्समधून आपल्या करिअरची सुरुवात केली. इथे त्यांनी तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि वित्त संबंधित पदे भूषवली. 2000 मध्ये, त्यांची फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्समध्ये उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.
त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'जेव्हा ते अमेरिकेत आले तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना 75 हजार रुपये दिले होते.' आपला खर्च भागवण्यासाठी अनेक ठिकाणी काम केल्याचे त्याने सांगितले होते. कधी त्यांनी बर्गरच्या दुकानात सेल्समन तर कधी सुरक्षा रक्षक म्हणूनही काम केले. परंतु अरोरा यांच्या मेहनतीनेच त्यांना या पदापर्यंत पोहोचवले. अरोरा जेव्हा गुगलमध्ये होते, तेव्हा ते तिथे सर्वात जास्त पगार घेणारे कर्मचारी होते. अरोरा 2004 मध्ये गुगलमध्ये रुजू झाले होते. आणि 2012 मध्ये, त्यांना Google कडून वार्षिक 5.1 अब्ज डॉलर्स पगार मिळाला. असे म्हटले जाते की, जेव्हा अरोरा गुगलमध्ये होते तेव्हा त्यांनी 2009 मध्ये नेटफ्लिक्स खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी, Netflix चे मार्केट कॅप $3 अब्ज होते, जे आज $27 बिलियन पेक्षा जास्त झाले आहे. मात्र, गुगलने अरोरा यांची सूचना मान्य केली नाही.
दरम्यान, गुगलचा निरोप घेतल्यानंतर ते सॉफ्ट बँकेचे अध्यक्ष झाले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सॉफ्ट बँकेने 250 दशलक्ष डॉलर्सचा करार केला होता. इतकेच नाही तर सॉफ्ट बँकेने स्नॅपडील, ओला, ग्रोफर्स आणि हाउसिंग डॉट कॉम सारख्या भारतीय स्टार्टअपमध्येही गुंतवणूक केली होती. अरोरा जून 2018 मध्ये पाउलो अल्टो नेटवर्कमध्ये सामील झाले. तेव्हापासून ते त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष आहेत. कंपनीत सामील झाल्यानंतर, त्यांना $125 दशलक्ष किमतीचे शेअर्स देण्यात आले. पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये अनेक पटींनी वाढ झाली, त्यामुळे त्यांची एकूण संपत्तीही 1.5 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.